computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग १ : शत्रूसेनेचे ७ रणगाडे उध्वस्त करणारे अब्दुल हमीद.

देशाचे सीमेवर रक्षण करणारे सैनिक हे देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती असतात. या सैनिकांना विविध सन्मान देऊन त्यांचा गौरव सरकारकडून केला जात असतो. यात क्रांती चक्र, परमवीर चक्र अशा पदकांचा समावेश असतो. यांपैकी  थेट शत्रूच्या उपस्थितीत रणमैदानावर शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना परमवीर चक्र प्रदान करण्यात येत असते. या वीरांना आदरांजली अर्पण करत बोभाटा आजपासून एक नवी मालिका सुरू करत आहे. या मालिकेत आपण परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या पराक्रमाचा ठाव घेणार आहोत. 

आजचा पहिला लेख हा १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या अब्दुल हमीद यांच्याबद्दल आहे. १९६५ च्या युद्धात त्यांनी शत्रूसेनेचे ७ रणगाडे उध्वस्त केले होते. या युद्धातील त्यांच्या पराक्रमाचे किस्से आजही देशभर चर्चिले जातात. शत्रूशी लढताना त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले होते. 

अब्दुल हमीद यांचा जन्म १ जुलै १९३३ रोजी उत्तर प्रदेशातल्या गाझीपुर जिल्ह्यातला. त्यांचे वडीलही सैन्यात होते.  ते लान्स नायक म्हणून कार्यरत होते. अब्दुल हमीद यांनी १९५४ साली सैन्यात ४ ग्रेनेडीयर्समध्ये प्रवेश केला होता. त्यांनी गाजवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र, सैन्य सेवा पदक, द समर सेवा पदक आणि रक्षा पदक देण्यात आले होते. 

१९६५ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केले. ८ सप्टेंबरला पाकिस्तानने खेमकरन सेक्टरमध्ये उसल उताड गावात मोठा हल्ला केला. पाकिस्तान पूर्ण ताकदीने युद्धात उतरला होता. त्यांनी सोबतीला मोठे पॅटन टॅंक आणले होते. दुसरीकडे भारताकडे मात्र थ्री नॉट थ्री रायफल आणि एलएमजी होते. याव्यतिरिक्त फक्त गन माउंटेड जीप होती. त्यावेळी अब्दुल हमीद त्याच भागात तैनात होते.

(ऑपरेशन जिब्राल्टर)

पॅटन रणगाडे घेऊन आलेल्या पाकिस्तानी सेनेची पूर्ण रेजिमेंट बघून कुणीही घाबरले असते, पण भारतीय सेनेची हिंमत जराही कमी झाली नाही. अब्दुल हमीद यांनी मनातल्या मनात हे रणगाडे उडवण्याचे ठरवले. त्यांनी रणगाड्यांचे सर्व बाजूंनी निरीक्षण केले. चपळाईने आपली माउंटेड गन जीप सुरू केली आणि त्यात लावण्यात आलेल्या लाईट मशीन गनच्या माध्यमातून रणगाड्यांच्या कमकुवत बाजूवर हल्ला करण्यास सुरूवात केली.  

युद्ध ऐन भरात असतानाच पाकिस्तानचा एक रणगाडा जोरदार स्फोट होऊन उडालेला दिसला. पाकिस्तानी सैन्यासाठी हा मोठा धक्का होता. हा रणगाडा अब्दुल हमीद यांनी उडवला होता. या धक्क्यातून पाकिस्तान सावरत नाही तोवर दुसरा दुसरा रणगाडा हवेत दिसला. एका मागोमाग एक पाकिस्तानी रणगाडे फुटले होते. पाकिस्तान याच अमेरिकन रणगाड्यांच्या जीवावर युद्धात उतरली होती. या ताकदवान रणगाड्यांना आपल्या अब्दुल हमीदने साध्या मशीन गनने मातीमोल केले होते.

अब्दुल हमीद यांनी तब्बल ७ पॅटन रणगाडे उध्वस्त केले होते. त्यांनी पाकिस्तानचे आणखी नुकसान करून युद्धात योगदान दिले असते. पण जे नको व्हायला तेच घडले. ९ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याचा पाठलाग करत असताना त्यांनी फेकलेला एक बॉम्ब अब्दुल हमीद यांच्या जीपवर येऊन धडकला. या हल्ल्यात जखमी होऊन ते शहीद झाले. पण हौतात्म्य येण्याआधी त्यांनी पाकिस्तानच्या पराभवाचा पाया खोदला होता. त्यांच्या असामान्य शौर्यासाठी त्यांना भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्र पदक देऊन गौरव केला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required