प्राचीन सोनलपूर ते आजचे सोलापूर. विविधतेने नटलेल्या या जिल्ह्याची ही सारी वैशिष्ट्ये तुम्हांला माहित आहेत का?
सोलापूर जिल्हा म्हटले म्हणजे समोर येते ती सोलापुरी चादर. काहीच दिवसांपूर्वी निक जोनास सोलापुरी चादर कपडे म्हणून घालून फिरतानाचा फोटो वायरल झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील चादर आणि रुमाल जगभर प्रसिद्ध आहेत. सोलापूर जिल्हा हा अजूनही अनेक विशेष गोष्टींनी नटलेला आहे. या लेखात आपण तेच बघणार आहोत.
जिल्ह्याच्या नावाबद्दल सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे आधी सोन्नलागी आणि सोन्नलापूर या नावांनी जिल्हा परिचित होता. एक गोष्ट अशीही सांगितली जाते ती म्हणजे आधी इथे सोळा गावे होती म्हणून या गावाला सोलापूर नाव पडले. सोलापूर (प्राचीन काळी सोन्नलागी म्हटल्या जाणार्या) जिल्ह्यावर आंध्रभ्रत्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव आणि बहामनी अशा विविध राजवंशांचे राज्य होते. जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कामटी येथे १२३८ सालचा संस्कृत एक शिलालेख सापडला आहे. त्यावरून हे शहर सोनालीपूर म्हणून ओळखले जात असल्याचे दर्शवितो. सोलापूर किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखावरूनही असे दिसून येते की या शहराचे नाव सोनलपूर होते. हे देवगिरी यादवांचे मुख्य व्यापारी केंद्र आणि एक महत्त्वाचे व्यापारी शहर होते. देवगिरीच्या यादवांच्या काळापर्यंत हे शहर सोनलगी म्हणून ओळखले जात असे.
सोलापूर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असला तरी इथे कन्नड आणि तेलगू या दोन भाषांही बऱ्यापैकी प्रमाणात बोलल्या जातात. १९५६ साली हा जिल्हा मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला होता. महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यावर हा जिल्हा महाराष्ट्रात आला. एकेकाळी हा जिल्हा सूतगिरण्यांमुळे कापडाची राजधानी म्हणून विशेष ओळख मिळवून होता.
जिल्ह्याच्या भौगोलिक भागाचा विचार करायचा म्हटल्यास इथे डोंगराळ भाग जवळपास नाही आहे. भीमा ही जिल्ह्याची महत्वाची नदी आहे. हीच भीमा नदी पुढे पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. जिल्ह्यातून सीना, नीरा, हरणी, बोटी, माण, भोगावती या इतर नद्या वाहतात. भीमा आणि सीना या दोन नद्या हत्तरसग-कुडल येथे मिळतात तर भीमा आणि नीरा या माळशिरस तालुक्यात मिळतात.
जिल्ह्याचा बराच भाग पठारी आणि सपाट आहे. पश्चिम आणि नैऋत्य भागात महादेवाचे डोंगर आहेत तर उत्तर पूर्व भागात बालाघाट डोंगररांग आहे. ज्वारी उत्पादनात सोलापूर राज्यात अग्रेसर आहे. तसेच कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस हे पिके घेतली जातात. मागील काही काळात इथे फळझाडांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. मोहोळला ज्वारी संशोधन, तर अकलूज येथे ऊस संशोधन केंद्र आहे. सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारताचे डाळिंबावरील राष्ट्रीय संशोधन केंद्र (NRCP) सोलापूर येथे आहे.
सोलापूरमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि आशियातील सर्वात मोठी सूतगिरणी होती. जिल्ह्यातील केगाव येथील विज्ञान केंद्र ही महाराष्ट्रातील तिसरी सर्वात मोठी आणि प्रमुख वैज्ञानिक संघटना आहे. सोबतच रायचूर-सोलापूर पॉवर ट्रान्समिशन लाइन 765 केव्ही पॉवर क्षमतेची पॉवर ग्रिड ऍक्सेस करण्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांची पुरेशी गरज भागवत आहे. महाराष्ट्रातील पहिला कचऱ्यापासून ऊर्जेचा वीज प्रकल्प सोलापूर येथे आहे.
सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आले आहे. राज्यात यशवंतसागर म्हणून प्रसिद्ध धरण हेच आहे. या धरणाला जिल्ह्याची तहान भागवणारे धरण म्हटले जाते. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, साखर कारखान्यांना पाणी पुरवून विद्युतनिर्मितीसाठी देखील पाणी पुरवणारे हे धरण आहे. या धरणभागात फ्लेमिंगो नावाचा पक्षी आढळतो.
सोलापूर शहराबद्दल बोलायचं तर इथले प्रमुख आराध्य दैवत सिद्धेश्वर आहे. तसेच पंढरपूर येथे असणाऱ्या विठ्ठल मंदिरामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे एकदा तरी सोलापूर जिल्ह्यात येणे होतच असते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. सोलापूरपासून जवळच असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या पावन स्पर्शामुळे या ठिकाणाचा मोठा लौकीक आहे.
सोलापूर जिल्हा अनेक महामार्ग आणि रेल्वेमार्ग यांनी विविध शहरांना जोडलेला आहे. सोलापूरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९, १३, २११ गेलेले आहेत. माळढोक या पक्षासाठी संरक्षित असलेले नान्नज अभयारण्य मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यात पसरले आहे. महाराष्ट्रातील आकारमानाने हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.
सोलापूर जिल्ह्याला असलेली मोठी ओळख म्हणजे हुतात्म्यांचा जिल्हा!! स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या कामामुळे मलाप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, किसन सारडा यांना फाशीवर चढविण्यात आले होते. या चार क्रांतिकारकांचा आजही सोलापूरकरांना अभिमान आहे.
सोलापूर जिल्ह्यात देशभर आपल्या कर्तृत्वाने अजरामर असे अनेक कर्तृत्ववान लोक होऊन गेले. वालचंद हिराचंद यांनी देशातील पहिले आधुनिक शिपयार्ड तयार केले. तसेच देशातील पहिली एअरक्राफ्ट आणि पहिली कार फॅक्टरी तयार केली. त्यांनी त्याकाळात अनेक मोठ्या संस्था उभ्या केल्या, या संस्थांनी देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले.
केदार जाधव हा भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटू पॉली उमरीगर हे देखील मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहेत. तसेच देशभर आपल्या वादग्रस्त चित्रशैलीसाठी प्रसिध्द झालेले एम. एफ. हुसेन हे देखील सोलापूर जिल्ह्यातीलच आहेत.
अभिनेता अतुल कुलकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, जब्बार पटेल, प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले सोलापूरचे आहेत. यासर्वांबरोबर ज्यावेळी १९३८ साली दुसऱ्या सिनो जपानीज युध्दावेळी भारतातून चीनला ज्या काही मेडिकल तज्ञांची टीम पाठविण्यात आली होती, त्या टीममधील एक सदस्य द्वारकानाथ कोटणीस हे सुध्दा सोलापूरचे आहेत. आपल्या भन्नाट व्हिडिओ शैलीसाठी देशभर प्रसिद्ध असलेला जस्ट सल(Just Sul) नावाचा अवलिया देखील सोलापूरचा आहे.
असा आहे विविधतेने नटलेला आपला सोलापूर जिल्हा!! लेख आवडला, तर नक्कीच शेअर करा. सोलापूरबद्दल एखादी महत्त्वाची माहिती आमच्याकडून राहून गेली असे वाटत असेल तर आमच्यासोबत आवर्जून शेअर करा .
उदय पाटील




