computer

सोलापुरातल्या शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी योजलाय साधा-सोपा-टिकाऊ आणि सहज पर्याय!!

आज शिक्षक दिवस आहे. कदाचित पहिल्यांदा असे होत असेल की शिक्षकदिनी शाळा बंद आहेत. कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यात शाळा बंद असणे ही खूप मोठी अडचण ठरत आहे. अशा वातावरणात सगळ्यांना मोबाईल घेऊन ऑनलाईन लेक्चर करणे जमत नाही.

पण अडचणीतून मार्ग काढणार नाही तो हाडाचा शिक्षक कसा? मुलांकडे मोबाईल नाही म्हणून ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सोलापूरमधील शिक्षकांनी जी डोक्यालिटी लढवली आहे ती भन्नाट आहे. 

सोलापूरमधल्या नीलम नगर परिसरात जवळपास ३०० घरांच्या भिंतींवर ग्राफिटीच्या माध्यमातून १ ली ते १० वीचा अभ्यासक्रम या शिक्षकांनी लिहून काढला आहे. ज्याला जे शिकायचं आहे, त्या मजकुराच्या भिंतीजवळ उभे राहायचे आणि सगळा अभ्यास उभा उभाच करू टाकायचा. आहे ना भन्नाट आयडिया!!! येता जाताना किंवा खेळताना संपूर्ण अभ्यासक्रम डोळ्यासमोर असेल. 

याचा उपयोग परिसरातील तब्बल २,००० मुलांना होणार आहे. सोबत  आजूबाजूच्या परिसरातील मुलेसुद्धा येऊन हे सगळे वाचू शकतात. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. घरे कुठेच जात नसल्याने त्यांच्या भिंतीवरचा मजकूर कधीही जाऊन वाचता येईल. सोबत सोशल डिस्टन्सिगचे पालन देखील आपोआप होईल. 

या भागात बरेच मजूर राहतात. साहजिकच स्मार्टफोन, इंटरनेट वगैरे त्यांना न कळणारी आणि न परवडणारी प्रकरणं आहेत. म्हणून शाळेच्या काही शिक्षकांनी ही आयडीया काढली आहे. १०वी पर्यंतचा सगळा अभ्यास सोपा करून त्यांनी या भिंतींवर मांडला आहे. या ग्राफीटींमध्ये गणिताची समीकरणे, भाषा व्याकरण, आकडेवारी, सामान्यज्ञान वगैरे बऱ्याच विषयांचा सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या मुलांकडे मोबाईल आहेत ते ऑनलाईन लेक्चर करतील, पण ज्यांच्या कडे मोबाईल नाहीत ते या ग्राफीटींच्या माध्यमातून अभ्यास करू शकणार आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required