आफ्रिकेतील या महिलेने चार पाच नाही तर एकाचवेळी १० मुलांना जन्म दिलाय...

जुळे किंवा तिळे मुले पाहण्यात आपल्या सर्वाना खूप कुतूहल असते. तिळे तसे क्वचितच दिसतात, पण जुळी मुलं तशी सहज पाहायला मिळतात. अशा भावंडांमधील सारखेपणा पाहून गंमत वाट्ते. भारतात तर एक अख्खे गाव जुळ्यांचे आहे.
आज जुळ्या तिळ्यांचा विषय का काढला हा प्रश्न पडला ना. त्या आधी एका प्रश्नांचं उत्तर द्या. एकाच वेळी किती बाळ जन्माला येऊ शकतात? २, ३, ४? कोणी सांगितले जर सांगितले १०, तर विश्वास बसेल काय? पण हे खरोखरच घडले आहे! दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने एकाचवेळी १० बाळांना जन्म दिला आहे.
आपल्या आजच्या लेखाचा विषय हाच आहे. चला तर सविस्तर माहिती घेऊ.
३७ वयाच्या गोसिआम थामारा सिथोले हिने नुकताच १० बाळांना जन्म दिला आहे. नवजात बाळांपैकी सात मुले आणि तीन मुली आहेत. आणि विशेष म्हणजे तिला याआधी २ जुळ्या मुलीही आहेत. त्या आता सहा वर्षांच्या आहेत.
सिथोलेने प्रिटोरिया रुग्णालयात या बाळांना जन्म दिला. सात महिने आणि सात दिवसांची गरोदर असतानाच तिने बाळांना जन्म दिला. सिझेरियन पध्दतीने तिची प्रसूती करण्यात आली. सर्व मुले आणि आई सुखरूप आहेत.
ती आणि तिचा नवरा टेबोहो त्सोतेसी यांना जेव्हा कळाले की ते दहा मुलांचे पालक झाले आहेत तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले, कारण स्कॅनमध्ये त्यांना ८ बाळांचा जन्म होईल हे कळाले होते. जेव्हा त्या बाळांना पाहिले तो क्षण एक आई म्हणून सिथोलेसाठी खूप आनंदाचा आणि भावनिक होता. कोणतीही गुंतागुंत न होता सर्व मुले गर्भाशयात सुखरूप राहिली त्याबद्दल तिने देवाचेही आभार मानले. तिचे डॉक्टर सांगतात ही गर्भधारणा नैसर्गिक होती, कोणतीही आधुनिक गर्भधारणा उपचार पद्धती तिने वापरली नव्हती डॉक्टरांना हा दैवी चमत्कारच वाटला.
सिथोलेने हलीमा सिसचा एकाचवेळी ९ बाळांना जन्म द्यायचा विक्रम मोडला आहे. माली येथील २५ वर्षीय महिला हलिमा सिसने मे महिन्यात नऊ बाळांना जन्म दिला होता. तिने मोरोक्कोमध्ये पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला. त्याआधी २००९ मध्ये अमेरिकेच्या नादिया सुलेमानने यशस्वीरित्या ८ सुदृढ बाळांना जन्म दिला होता.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रवक्त्याने या विक्रमाची नोंद लवकरच केली जाईल असे सांगितले आहे. सध्या तरी आई आणि बाळांना आराम करायची खूप गरज आहे.
मानवी इतिहासात असे चमत्कार दुर्मिळच असतात. काही महिन्यांपूर्वी अशीच एक चमत्कारिक घटना घडली. युकेमधील रिबेका नावाच्या महिलेला गरोदर असतानाच पुन्हा दिवस गेले. तीन आठवड्यांच्या अंतराने दुसऱ्या बाळाचा जन्म झाला.
अशा काही घटना आजही विज्ञानाला कोड्यात टाकतात. भविष्यात कधीतरी या घटनांचा नेमका उलगडा होईल असं आपण गृहीत धरूया.
लेखिका: शीतल दरंदळे
आणखी वाचा: