f
computer

असगार्डीया : अंतराळात तयार झालाय नवीन देश...नागरिकत्व कसं मिळवायचं पाहा !!

तुम्हाला माहीत आहे का? एक नवीन देश जन्माला आलाय… अनेक लोकांनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. या देशाचे संविधान सुद्धा तयार झाले आहे. इतकेच नाही तर, देशाचे राष्ट्रागान सुद्धा आहे! तो देश कुठे आहे असा प्रश्न पडला असेल तर उत्तर वाचून चक्रावून जाऊ नका… तो देश आहे चक्क अंतराळात! 

काय मंडळी? खरं सांगा, तुम्हाला ही चेष्टा वाटत आहे ना? पण ही चेष्टा अजिबात नाही… खरोखरीच असा देश अस्तित्वात आला आहे. तुम्हाला सुद्धा त्याचे नागरिक होता येईल… ते कसं? चला तर मग जाणून घेऊया…

या देशाची संकल्पना आहे मध्य एशिया मधील अझर बैजान येथील इगोर आशुरोबेली या गर्भश्रीमंत उद्योगपतीची. हे इगोर साहेब स्वतः त्या नवीन देशाचे अध्यक्ष आहेत बरं का. आणि त्यांनी आपल्या स्वतंत्र देशाचे नाव ‘असगार्डीया’ असे ठेवले आहे. आतापर्यंत 2 लाख 46 हजार लोकांनी इथले नागरिकत्व घेतले आहे. या लोकांमधून तिथली संसद सुद्धा स्थापन झाली आहे. आता हे वाचून जर तुम्हाला सुद्धा त्या देशावर जाण्याची इच्छा झाली तर थोडं थांबा मंडळी! आधी या देशाचे क्षेत्रफळ तरी जाणून घ्या. तर हा देश आहे अवघ्या काही सेंटीमीटर्सचा. याचे वजन 2.7 किलो आहे. परत चेष्टा वाटते ना? अहो खरंच हे सत्य आहे! हा एक छोटासा उपग्रह असून तो पृथ्वीभोवती भ्रमण करतोय. भविष्यात तयार होणाऱ्या देशाचे हे एक ‘प्रोटोटाईप’ मॉडेल आहे. 

(असगार्डीयाचे प्रक्षेपण)

आता ज्या महाशयांची ही संकल्पना आहे त्यांनी असे जाहीर केले आहे की, भविष्यात एक मोठे यान घेऊन पृथ्वीवरील लोकांना तिकडे पाठवले जाईल. या नवीन देशाचे कायदे आणि नियम पृथ्वीपेक्षा पूर्णतः वेगळे असतील. इतकंच नव्हे तर त्या देशाचे चलन सुद्धा तयार आहे आणि अर्थातच त्यावर इगोर साहेबांचा फोटो छापला आहे. 

मंडळी, ही माहिती वाचून तुम्हाला जर असे वाटत असेल की ही इगोर नावाची व्यक्ती येडचॅप असून भलाबक्कळ पैसा गाठीशी असल्याने तिला असे वेडेचाळे सुचत असतील. पण त्यांचा इतिहास तपासला तर तुम्हाला परत एकदा विचार करावा लागेल. इगोर हे पूर्वी ‘अलमाज-अंते’ नामक रशियन कंपनीचे यशस्वी सीईओ होते. ही कंपनी मिसाईल्स आणि रक्षा साधने बनवते. 

इगोर आशुरोबेली

ता असगार्डीया विषयी थोडं अधिक जाणून घेऊया. असगार्डीया हा शब्द स्कैंडिनेवियन देशाची भाषा नोर्स मधून आला आहे. याचा अर्थ होतो, देवतांचे घर. पण या देशात राहणाऱ्या लोकांचा कुठलाही धर्म असणार नाही. हा धर्मविरहित देश असणार आहे. पृथ्वीवरील धार्मिक भांडणांना कंटाळून इगोर यांनी हे पाऊल उचलले आहे. प्रथम अध्यक्ष जरी स्वतः इगोर असले तरी निवडणुका नंतर दुसरा कुणीही अध्यक्ष होऊ शकतो. इथे लोकशाही असणार आहे आणि संसद ज्याला निवडेल तो व्यक्ती राष्ट्रप्रमुख बनू शकतो. 

आता बघूया या देशाचे नागरिक बनण्याची काय प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया एकदम साधी सोपी आहे. एखाद्या सोशल नेटवर्किंग साईट वर जसे रजिस्ट्रेशन करावे लागते तसेच इथे रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही असगार्डीया देशाचे नागरिक होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की https://asgardia.space/en या वेबसाईट वर जाऊन तिथे जॉइनिंगचा फॉर्म भरून द्यायचा! बस्स! 

काही म्हणा मंडळी, अंतराळातील देशात राहण्याची कल्पना कितीही रोमांचित करणारी असली तरी इगोर यांचे हे स्वप्न भविष्यात कितपत खरे होईल ते येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत तुम्ही अश्याच नवनवीन माहिती साठी बोभाटा वाचत रहा आणि आमचे लेख शेअर करायला विसरू नका.

 

लेखक : अनुप कुलकर्णी.

सबस्क्राईब करा

* indicates required