computer

कथा गुप्तहेरांच्या - भाग ७ : चक्क राष्ट्राध्यक्षांचा उजवा हात बनलेला मोसादच्या इतिहासातला सर्वात धाडशी आणि पराक्रमी गुप्तहेर !!

आजवर आपण अनेक गुप्तहेरांच्या कथा वाचल्या आहेत. पण आज आपण अशा गुप्तहेराची गोष्ट बघणार आहोत ज्याच्या आयुष्यापुढे थरारक शब्द सुद्धा फिका वाटेल. एका गुप्तहेराच्या जीवावर एखादा देश एक दोन नाही,तर तब्बल ५ देशांना हरवतो त्याची ही गोष्ट!!!

सहसा ज्या लोकांवर सिनेमे म्हणजेच बायोपिक तयार होतात, त्यात सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्या व्यक्तीला प्रत्यक्षापेक्षा जरा जास्तच हिरो बनवून दाखवतात. अतिरंजक कथांचा भडीमार हा बायोपिकमध्ये असतोच असतो. पण जगात काही लोक असेही आहेत की खुद्द त्यांच्या आयुष्यावर बनवलेला सिनेमासुद्धा फिका वाटावा इतके त्यांचे आयुष्य थ्रिलिंग असते. काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सची एक सिरीज चांगलीच गाजली. 'द स्पाय' हे तिचे नाव! साचा बॅरन कोहेन नावाच्या अत्यंत ताकदीच्या अभिनेत्याने त्याचा रोल केला आहे. या सिनेमाचा नायक अली कोहेन हाच आपल्या आजच्या लेखाचा विषय आहे.

गुप्तहेरांचे कामच परदेशी संस्थांमध्ये घुसखोरी करून आपल्या देशाला माहिती पुरवण्याचे असते. पण हा गडी थेट शत्रू देशाच्या म्हणजेच सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा उजवा हात बनला होता. अली कोहेन हा इस्रायली गुप्तहेर होता. इस्रायली गुप्तहेर संस्थेची-मोसादची- जगभर हवा आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्या संस्थेच्या इतिहासातला सर्वात धाडशी आणि पराक्रमी गुप्तहेर अशी अली कोहेनची ओळख आहे. यावरून एकंदर हे रसायन काय आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल. हा भाऊ इस्रायली गुप्तहेर होता तरी त्याचा जन्म इस्रायलमध्ये झाला नव्हता. तो जन्मला इजिप्तमध्ये. १९२४साली एका सिरियन ज्यू घरात तो जन्माला आला. इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा त्याचा परिवार इस्रायलमध्ये दाखल झाला. पण शिक्षणासाठी अली इजिप्तमध्येच थांबला.

१९५७ साली तो इस्रायलला आला. काही वर्षे त्याने अकाऊंटंट म्हणून काम पाहिले. या दरम्यान त्याचे लग्न देखील झाले, नादिया मल्जाद नावाच्या इराकी- ज्यू मुलीसोबत. अलीची भक्कम बाजू अशी की त्याला अरबी, इंग्रजी, फ्रेंच भाषा चांगल्या अवगत होत्या. हेच कारण होते की त्याला मोसादमध्ये भरती करण्यात आले.

१९६० मध्ये त्याला सहा महिने कठोर प्रशिक्षण देण्यात आले. याच दरम्यान सिरिया आणि इस्रायल दरम्यान तणाव वाढत होता. अलीला एक व्यापारी बनवून आधी अर्जेंटिनामध्ये आणि नंतर सिरियाला पाठवण्यात आले. तो तेथे कामील अमीन थामेत बनून राहू लागला. पुढे १९६२ साली त्याने सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये बस्तान मांडलं.

अली तेथे मोठमोठ्या पार्ट्या देऊ लागला. ज्यांच्या माध्यमातून त्याची ओळख तिथल्या बड्या असामींसोबत होऊ लागली. तेही आपल्यासारखाच हाही एक उच्चभ्रू आहे हे समजून त्याला बरंच काही सांगत असत. ही सगळी माहिती एली इस्रायलला पाठवत असे. हा गडी सिरीयन सिस्टीमच्या एवढा आत घुसला होता की, अमीन अल हफ्ज हे राष्ट्रपती झाले त्यावेळी त्यात अलीचा महत्वाचा वाटा होता असे म्हटले जाते. इतकंच काय, तो सिरियाचा भावी पंतप्रधान होईल असेही त्याच्याबद्दल म्हटले जात असे.

साहजिकच एखाद्याला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचण्यात जर कुणी मदत करत असेल तर त्याची परतफेड पण त्याला भरभक्कम मिळते. अल हफ्ज यांनी अलीला थेट उप संरक्षण मंत्री बनविण्याचे नियोजन केले होते. विचार करा, एक इस्रायली गुप्तहेर सिरीयाचा उपसंरक्षण मंत्री झाला असता तर काय झाले असते!!

१९६७ साली इस्रायल आणि मध्य आशियातले देश म्हणजेच लेबनॉन, इजिप्त, सिरिया, जॉर्डन, इराक यांच्यादरम्यान युद्ध सुरू झाले. तेव्हा अलीने सिरीयन सैनिकांच्या बचावाचे कारण दाखवून निलगिरीची झाडे लावण्याचा सल्ला दिला. याच झाडांमुळे इस्रायलला सिरियन सैनिकांचा ठावठिकाणा कळला आणि या पांचही देशांचा या युद्धात दारुण पराभव झाला. एका अर्थाने म्हणायचे झाल्यास इस्रायलच्या सैन्य शक्तीबरोबरच सिरीयात काम करत असलेला त्यांचा हेर अली कोहेन याच्या असामान्य रणनितीमुळे इस्रायल एकाच वेळी ५ देशांचा पराभव करू शकला.

सत्तेच्या मुख्यस्थानी पोचलेल्या अलीचा आत्मविश्वास आता गगनात होता. याच आत्मविश्वासाने त्याचा घात केला. एलीजवळ एक रेडिओ ट्रान्समिशन होते. त्याला कडक ताकीद होती की दिवसातून फक्त दोन वेळा याचा उपयोग करायचा. पण त्याने हा सल्ला ऐकला नाही. १९६४ च्या शेवटी कोहेन इस्रायलला गेला होता. सिरीयाला परतल्यावर पुन्हा तो ट्रान्समिशनचा वापर सुरू केला. सिरियाच्या मुख्य सैन्य अधिकाऱ्याला एलीच्या या रेडिओ ट्रान्समिशनच्या वापरावरून त्याच्यावर संशय यायला लागला. त्याने त्याच्यावर पाळत ठेवली. या दरम्यान एक चूक झाली आणि सिरियन काउंटरइंटेलिजन्सने त्याचा छडा लावला.

एके दिवशी ट्रान्समिशनद्वारे इस्रायलला माहिती पुरवत असताना सिरियन सैनिक दरवाजा तोडून त्याच्या घरात घुसले आणि गडी रंगेहाथ पकडला गेला. त्याला वाचविण्यासाठी इस्रायलने जंग जंग पछाडले, एवढेच काय पोपनेसुद्धा त्याच्या सुटकेसाठी आवाहन केले.पण अलीने जेवढे नुकसान केले होते ते पाह्यलं तर त्याला माफी मिळणं अशक्यप्राय होतं.

आता सुरू झाला होता अलीचा छळाचा प्रवास!!! या दरम्यानचे अनेक व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहेत. सिरीज बघितली तर त्यात प्रत्यक्षपणे कशा पद्धतीने हे सगळे घडले याचे वर्णन आले आहे. १९६६ साली आधी हालहाल करून आणि नंतर भर चौकात त्याला फासावर चढवण्यात आले. फासावर लटकवण्यापूर्वी त्याच्या गळ्यात एक फलक टांगला होता आणि त्यावर लिहिले होते, 'सिरीयात राहणाऱ्या अरबी लोकांकडून'...

आज अली कोहेन जिवंत नसला तरी त्याच्या कामामुळे फक्त इस्रायलीच नाही, तर इतर देशांच्या गुप्तहेरांसाठीही एक प्रेरणा म्हणून ओळखला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required