मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग एक - ‌‌‍पडतर मालाचा व्यापार!!!

पडतर मालाचा व्यापार.

हा व्यवसाय करण्यासाठी 25 ते 50 हजाराचं भांडवल पुरेसं आहे. कमीत कमी अनुभव किंवा शिक्षण असणं आवश्यक नाही. शोरुमही आवश्यक नाही. मात्र विक्री व्यवसाय असल्यामुळं बोलण्याची हुशारी अत्यावश्यक आहे.

पडतर मालाचा व्यापार म्हणजे नक्की काय ?

हा व्यापार सरप्लस स्टॉक लॉट किंवा एक्सपोर्ट लॉटचा धंदा या नावानं ओळखला जातो. उत्तम दर्जाची उत्पादने - उदाहरणार्थ ब्रांडेड रेडीमेड कपडे - लॉटमध्ये उचलून त्याची किरकोळीत विक्री करणं हे या धंद्याचं स्वरुप आहे.

असे लॉट स्वस्तात का मिळतात ?

मेहता एक्सपोर्ट ही कंपनी यूरोपमध्ये रेडीमेड जीन्स पाठवते. समजा, या कंपनीला दोन लाख जीन्सची ऑर्डर मिळालीय. ऑर्डर दोन लाख नगांची असली तरी  दोन लाख पंचवीस हजार जीन्स तयार केल्या जातात.  ऑर्डरप्रमाणं माल युरोपात गेल्यावर रिजेक्शन / रीप्लेसमेंट साठी २५,०००पीस बनवले जातात. तीन महिन्यानंतर कंपनीची जबाबदारी संपते आणि उरलेले सगळे पीस कंपनीच्या गोडाऊनमध्ये पडून राहतात . कंपनीच्या हिशोबात आधीच कॉस्टिंग झाल्यामुळं हा माल शून्य किमतीचा असतो.

सिझन संपला की हा उरलेला रुपयाचा माल चार आण्यात विकला जातो.

नफ्याचं प्रमाण ( मार्जीन ) किती असतं ?

असा लॉट विकत घेऊन किरकोळीत विकला तर खर्च बाद करूनही 40 ते 50 टक्क्याचं मार्जीन मिळतं. गेल्या महिन्यातच डोल्स एंड गबाना (D&G) चा लॉट बाजारात आला होता . मूळ किंमत २८००रुपये होती पण बाजारात ९००रुपयात लॉट विक्रीला आला होता. या महिन्यात झाराचे टी शर्ट्स बघण्यात आले .मूळ किंमत २२०० रूपयांच्या आसपास पण  लॉटमध्ये 750 फ़क्त!

 

हे लॉट मिळवायचे कसे ?

अर्थात गारमेंट कंपन्याकडून. या कंपन्यांची यादी गारमेंट एक्स्पोर्ट एसोसिएशनकडून मिळते . या कंपन्याना भेट देऊन लॉट मिळवणे ही खरी मेहेनत असते . आधी छोटा लॉट घेऊन विक्री करून पुन्हा कंपनीच्या दारात गेलं की पुढचे लॉट लवकर मिळतात.

आणि काही सोपा मार्ग आहे का ?

वेळ वाचवण्यासाठी दलालाच्या माध्यमातून पण जाता येतं.  फ़सवणूक होऊ नये अशी खबरदारी घ्यावी लागते. तिसरा मार्ग लॉटच्या होलसेलरकडून माल घेणं.   यामध्ये मार्जिन कमी होतं पण व्हरायटी मिळते आणि गुंतवणूक कमी करावी लागते. हे व्यापारी संबंध चांगले ठेवले तर एक महिन्याचं क्रेडिट पण देतात . असे होलसेलर मार्केट कुर्ला इथं शिवाजी कुटीर उद्योग मंडल कुर्ला डेपोजवळ आहे.

आणखी काही माहिती कुठे मिळेल ???

बोभाटाच्या वाचकांसाठी एक संदर्भ देतो आहोत. Oh Man! दुकान सरप्लसचे मोठे होलसेलर आहेत. जर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता.

70/72, Sheth Motisha Lane,

(Love Lane), Mazagaon,

Mumbai - 400010.

Contact :

Moiz or Mustafa - 8879327597

आता याच व्यवसायाचा दूसरा एक पैलू बघायला हवा तो म्हणजे 'इंडस्ट्रियल नॉन मूविंग इन्वेंटरी'चा.  जो आपण दुसरया भागात बघू या!!!

 

(तळ टीप : बोभाटाचा या व्यवसायाशी किंवा भविष्यात होणाऱ्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. हा लेख मार्गदर्शनपर आहे याची नोंद घ्यावी !)

सबस्क्राईब करा

* indicates required