१४ एप्रिल राष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून का पाळला जातो !!

८० वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एक घटना घडली. ते साल होतं १९४४. १४ एप्रिल १९४४ ची संध्याकाळ मुंबईकरांसाठी वेगळी होती. मुंबईच्या गोडीत ४ वाजून ५ मिनिटांनी एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात तब्बल ८०० माणसं मारली गेली. त्यापैकी २३१ लोक हे गोदीत काम करणारे कामगार आणि अग्निशमन दलाचे जवान होते. या स्फोटाने माणसांचा जीव घेतला असला तरी काहींना मात्र त्याने मालामाल केलं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने सोन्याचा पाऊस पडला होता.

आज जाणून घेऊया त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ज्याने मुंबईला १४ एप्रिल कायमचा लक्षात राहिला.

‘फोर्ट स्टिकिन’ ही मालवाहू बोट कराची बंदरातून ९ एप्रिल रोजी मुंबईला यायला निघाली. १२ एप्रिल रोजी ती मुंबईला येऊन पोहोचली. या जहाजात कापूस, तेलाची पिंपे, भंगार, तांदूळ, लाकूड, १ हजार टन स्फोटके, दारूगोळा, सिग्नल रॉकेटस्, टॉर्पेडोज आणि तब्बल १ कोटी किमतीचे सोने लादलेले होते.

या जहाजाला मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक नं. २ येथील बंदरात नांगरून ठेवण्यात आलं. १३ एप्रिल रोजी जहाजातील समान उतरवण्याचं काम सुरु झालं. १४ तारखेच्या दुपार पर्यंत हे काम सुरळीत सुरु होतं. १ वाजेच्या सुमारास काही कामगारांनी २ क्रमांकाच्या फाळक्यात आग लागलेली पाहिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. अग्निशमन दलाच्या बंबगाड्यांनी पाणी मारण्यास सुरुवात केली पण आग आटोक्यात येईना. ३.३० मिनिटापर्यंत जवळजवळ ९०० टन पाणी २ क्रमांकाच्या फाळक्यात मारण्यात आलं होतं. धुरांच्या लोटांनी वातावरण भरून गेलं. ही आग नेमकं कोणत्या कारणांनी लागली आहे ते कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. त्यामुळे कितीही पाणी मारलं तरी आग आटोक्यात येत नव्हती.

स्रोत

पाण्याचा मारा आणि वाढत जाणाऱ्या आगीमुळे जहाजातील पाणी तापू लागलं होतं. त्याच बरोबर जहाजाचा पत्रा देखील तापला होता. आग आता चांगलीच पसरली होती. आगीच्या ज्वाळांनी तब्बल २५-३० फुटांपर्यंत उंची गाठली. शेवटी ३ वाजून ५० मिनिटांनी जहाज सोडून देण्याचे आदेश देण्यात आले. पण हा आदेश अग्निशमन दलाच्या काही जवानांपर्यंत पोहोचला नाही. ते आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न करतच राहिले. बरोबर ४ वाजून ५ मिनिटांनी जहाजात मोठा स्फोट झाला. आणि सगळं सुन्न झालं.

स्रोत

जहाजाचे तुकडे तुकडे झाले, ११ बंबगाड्या उडाल्या, जवळजवळ १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीच्या खिडक्यांना हादरा बसला.. आजूबाजूला असलेली तब्बल १३ जहाजं उडाली. या स्फोटामुळे शिमला पर्यंत जमिनीचा थरकाप उडाला होता. हा त्याकाळातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानला जात होता. अमेरिकेच्या हिरोशिमा नागासाकी वरील अणुबॉम्बने(१९४५) या स्फोटाचा रॉकॉर्ड मोडला

या अग्नितांडवात आजूबाजूच्या झोपडपट्ट्या जाळून खाक झाल्या. जहाजातील माल अक्षरशः हवेत उडाला. यात आधीच म्हटल्या प्रमाणे खरोखर सोन्याचा पाऊस पडला होता. जहाजात असलेली १ कोटी किमतीची सोन्याची बिस्किटे १०-१२ किलोमीटरच्या परिसरात उधळली गेली. ही बिस्किटे घराचं छप्पर तोडून आत शिरली होती. काहींनी ती सरकार जमा केली तर काहींनी त्याच्यातून आर्थिक लाभ करून घेतला. पण याच बरोबर जहाजातील अवजड गोष्टी, सामान, जहाजाचा पत्रा या सारख्या गोष्टींनी लोकांचा जीव देखील घेतला.

स्रोत

आग आटोक्यात येण्यासाठी ३ दिवसा लागले आणि गोदी पुन्हा कार्यरत होण्यासाठी तब्बल ७ महिने. ८०० माणसांच्या मेहनतीतून गोदी पुन्हा पूर्ववत झाली. एकूण वित्त हानी आणि जीवित हानी प्रचंड झाली.

या सर्व घटनेत अग्निशामक दलाचे तब्बल ६६ जवान शहीद झाले. त्यांच्याच आठवणीत १४ ते २१ एप्रिल हा संपूर्ण आठवडा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.

या स्फोटाची करणं काय होती ?

स्रोत

स्फोटके असलेल्या जहाजावर लावण्यात येणारा लाल झेंडा जहाजावर लावण्यात आलेला नव्हता. जहाजात कापूस ठेवलेल्या जागेच्या वरच स्फोटके ठेवण्यात आलेली होती. त्याच बरोबर स्फोटकांना जहाजातून उतरवण्यात उशीर झाला होता. या सर्व कारणांनी हे अग्नितांडव घडले.

मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात या घटनेने मोठी उलतापालथ झाली. अनेकांना जीव गमवावा लागला, कारखाने बंद पडले, जवळजवळ ५०,००० लोकांची नोकरी गेली, अनेकांना नेसलेल्या कपड्यानिशी घर सोडावं लागलं. तत्कालीन सरकारने या घटनेची जबाबदारी घेऊन पीडितांना मदत केली होती.

मंडळी, आज या घटनेला ८० वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईच्या इतिहासातील हा एक न विसरता येण्यासारखा दिवस होता.

सबस्क्राईब करा

* indicates required