भोपळा कोरून त्यात दिवे लावायची काय भानगड आहे बुवा ?

साधारणपणे ऑक्टोबर संपायला आला की चित्रविचित्र मेक-अप केलेले आणि लोकांनी भोपळे कोरून त्यात दिवे ठेवलेले फोटो बघायला मिळतात. त्यात नुकत्याच परदेशात गेलेल्या लोकांच्या उत्साहाबद्दल तर विचारूच नका. पण या भोपळ्याचे घारगे, भरीत नाहीतर गेलाबाजार भाजी करण्यापेक्षा हे लोक तो कोरून त्यात दिवे लावतात, ही काय भानगड आहे ?

वाचा तर मग...

ही परंपरा चालू झाली आयर्लंडमधल्या एका लोककथेवरून  किंवा लोकसमजुतीवरून.. पण गंमत म्हणजे आयर्लंडमध्ये तर भोपळेच नसायचे. जेव्हा ही परंपरा अमेरिकेत गेली, तिथं हे मोठाले लाल भोपळे आले. जुन्या काळी आयर्लंडमधले लोक दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी "ऑल हॅलो'ज इव्ह" च्या वेळी म्हणजे ३० ऑक्टोबरच्या रात्री  नवलकोल कोरून त्यात दिवे ठेवायचे.


स्रोत

कथा अशी आहे की, तेव्हा आयर्लंडमध्ये जॅक नावाचा एक मनुष्य राहात होता. पक्का दारूडा. कुठे लांड्यालबाड्या कर, लोकांना त्रास दे, उगीचच त्यांची मस्करी कर.. हे त्याचे नेहमीचे आणि आवडते उद्योग. त्याच्या तावडीतून खुद्द सैतानही सुटला नाही म्हणे.

या जॅकने एकदा लबाडी करून सैतानाला सफरचंदाच्या झाडावर चढायला लावलं. सैतान झाडावर चढल्यावर या जॅकने खाली सगळीकडे क्रॉस लावून ठेवले. सैतानच तो. मग तो हिंदी सिनेमातला असो की आयर्लंडमधला. तो क्रॉसला घाबरला. त्यानं जॅकच्या गयावया केल्या. शेवटी मी मेल्यावर माझा आत्मा तू नेणार नाहीस असं वचन घेतल्यावरच जॅकने झाडाखालचे क्रॉस काढले. म्हणजेच, सैतान ज्याचा रक्षक आहे, अशा नरकात त्यानं जॅकला घ्यायचं नाही. आपसूकच मग जॅकला स्वर्गात स्थान मिळालं असतं. हे वचन सैतानानं त्याला दिलं आणि एकदाचा तो झाडावरून उतरला.


स्रोत

यथावकाश हा जॅक मेला. ख्रिश्चन समजुतीनुसार स्वर्गाचं  फाटक मोत्यांचं असतं आणि तिथं सेंट पीटर आपल्या पापपुण्याचा हिशेब ठेवत असतो.  या पीटरने जॅकच्या पाप-पुण्याचा पाढा वाचला आणि पृथ्वीवर इतकी पापं केल्यामुळं त्याला स्वर्गात जागा नाही हे ही सांगितलं. त्यानं जॅकला नरकात पाठवलं. पण तिथं सैतानानं आपलं वचन पाळलं आणि त्याच्या आत्म्याला नरकात जाता आलं नाही.

आता जॅकबाबा घाबरले. मृत्यू तर झालाय. पण स्वर्ग आणि नरक कुठंच जागा नाही अशी त्रिशंकू अवस्था त्याला प्राप्त झाली होती. अंधारात त्याचा आत्मा भटकत होता. आता तो सैतानाला शरण गेला आणि "आता मी काय करू? कुठं जाण्यासाठी अंधारात मला काही दिसतही नाही" अशी त्याची याचना केली. सैतानानं त्याला नरकातल्या आगीतले निखारे दिले. जॅकला नवलकोल खायला खूप आवडायचे. त्याच्याकडं एखादं तरी नवलकोल नेहमीच असे. त्यानं तो नवलकोलाचा गड्डा कोरला आणि त्यात सैतानाकडून मिळालेली आग किंवा निखारे ठेवले. तेव्हापासून हा जॅक त्याचा नवलकोलाचा कंदिल घेऊन सगळीकडे फिरू लागला, आणि त्या कंदिलाला लोक 'जॅक -ओ- लँटर्न' म्हणू लागले.

तेव्हापासून आयर्लंडमधले लोक वेगवेगळे दुधी भोपळे, बटाटे, बीट्स असं जे काही मिळेल ते कोरून त्यात हे दिवे ठेवू लागले आणि या लबाड जॅकला आपल्या घरांपासून दूर ठेवू लागले. इथून या प्रथेला सुरुवात झाली.


स्रोत

१८००च्या काळात काही मंडळी स्थलांतर करून अमेरीकेत गेली. त्यांनी ही परंपरा आपल्यासोबत तिकडेही नेली. तिथं त्यांना लाला भोपळे दिसले. आकाराने मोठे, कोरायला सोपे आणि त्यात जास्त आगही ठेवता येत होती. अशी पडली ही भोपळे कोरून जॅक-ओ-लँटर्न बनवण्याची प्रथा..

सबस्क्राईब करा

* indicates required