computer

ही आहे तब्बल २०,००० वर्षांसाठी बंद असलेली जागा....या जागी नेमकं काय घडलं होतं ?

युक्रेनमधल्या ‘चर्नोबिल न्युक्लिअर पॉवर प्लांट’ येथे ३२ वर्षांपूर्वी झालेल्या आण्विक स्फोटाने जगाला हादरवून सोडले. हा स्फोट इतका जबरदस्त होता की त्यातून मोठ्या प्रमाणात रेडियेशन पसरले होते. रेडियेशनमुळे शेवटी ही जागा मानवी वस्तीसाठी घातक म्हणून घोषित करण्यात आली. त्यामुळे या पॉवर प्लांटच्या आसपासची लोकवस्ती आणि बाजूला वसलेलं शहर ‘प्रिपायट’ रातोरात खाली करण्यात आलं. आजही ही जागा माणसासाठी राहण्यालायक नाही.

मंडळी, आज या स्फोटाला ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्या दिवशी नेमके काय घडले होते ते...

१. चर्नोबिल नेमकं कुठे आहे ?

चर्नोबिल युक्रेनच्या राजधानीपासून १०० किलोमीटर अंतरावर वसलं आहे, म्हणजे आता 'होतं'. हा स्फोट झाला त्यावेळी युक्रेन रशियाचा भाग होता. चर्नोबिलच्या अणुभट्टीत काम करणाऱ्या कामगारांसाठी ‘प्रिपायट’ शहर वसवलं गेलं होतं. स्फोटाच्या वेळी हे शहर जवळजवळ ४० ते ५० हजार लोकांचं घर होतं.
 

२. काय घडलं होतं त्या दिवशी ?

२६ एप्रिल, १९८६ रोजी एका चाचणी दरम्यान ४ पैकी एका अणुभट्टीमध्ये स्फोट झाला. कमीत कमी उर्जेत अणुभट्टी थंड करण्यासाठी हा प्रयोग केला जात होता. यावेळी सर्व सुरक्षा यंत्रणा बंद करण्यात आल्या होत्या. प्रयोगादरम्यान टप्प्याटप्प्याने विद्युत पुरवठा वाढवला जात होता. पण अचानक विद्युत पुरवठा आश्चर्यकारकरीत्या वाढला. विद्युत पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात विजेचे प्रमाण अजून वाढले आणि भयानक स्फोट झाला.

३. ९ दिवसांची आग

स्फोटानंतर रेडियेशन संपूर्ण वातावरणात पसरला. हवा आणि स्फोटातून बाहेर पडलेला कार्बन मोनोक्साईड यांच्या मिश्रणातून प्रचंड आग उसळली. या आगीने चर्नोबिल परिसर तब्बल ९ दिवस जळत होता.

४. आग विझवण्याचे प्रयत्न

आग उसळल्यानंतर अग्निशमन दल तिथे हजर झालं. पण हा सगळा प्रकार एकट्या अग्निशमन दलाच्या हातून आवरता येण्यासारखा नव्हता. त्यामुळे सैन्याला बोलावण्यात आलं. सैन्याने आकाशातून २४०० टन शिसे आणि १८०० टन माती टाकून आग विझवण्याचा आणि रेडियेशन कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा संपूर्ण भाग सैन्याने आपल्या ताब्यात घेतला.

५. स्फोटाची तीव्रता

अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही ४०० टक्के जास्त रेडियेशन चर्नोबिलच्या दुर्घटनेतून तयार झालं. 

६. चर्नोबिल भागात जाण्यावर कायमची बंदी

चर्नोबिलच्या आजूबाजूचा ३० किलोमीटरच्या भागात कोणालाही येण्यापासून बंदी घालण्यात आली. हा संपूर्ण किलोमीटरचा भाग ‘The Chernobyl Nuclear Power Plant Zone of Alienation’ (वर्जित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला. या भागात जवळजवळ १,१६,००० लोक राहत होते. पुढे जाऊन हा ३० किलोमीटरचा भाग आणखी वाढवण्यात आला आणि तब्बल २,३०,००० लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. 

७. किती माणसांचा जीव गेला ?

सुरुवातील स्फोटानंतर आण्विक वाफांची गळती बंद करण्याच्या प्रयत्नात ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. पुढे रेडियेशनच्या तीव्रतेने प्लांटच्या आजूबाजूची १३० माणसे मरण पावली. आजच्या घडीला बेलारूस, रशिया, युक्रेन परिसरातले ५० लाख लोक रेडियेशनच्या प्रभावाखाली जगत आहेत.

८. स्फोटाचा परिणाम

रेडियेशनमुळे मोठ्या प्रमाणात थायरॉईड कॅन्सर पसरला. जवळ जवळ ५००० कॅन्सरचे रुग्ण युक्रेन, रशिया आणि बेलारूसमध्ये आढळून आले. हा कॅन्सर पसरण्याचं मोठं कारण होतं गाईचं दूध. गाईच्या चाऱ्यातून तिच्या पोटात रेडियेशन बाधित आयोडीन गेले होते.

९. सध्याची परिस्थिती.

जगातील सर्वात मोठ्या किरणोत्सर्ग बाधित ठिकाणांमध्ये चर्नोबिलचा समावेश आहे. तज्ञांच्या मते चर्नोबिल परिसर मानवासाठी राहण्यालायक होण्यासाठी आणखी १०० ते २०,००० वर्ष जावी लागणार आहेत. 

१०. पर्यटनस्थळ

आजच्या घडीला चर्नोबिलचं वर्जित क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. एकट्या २०१७ मध्ये ५०,००० माणसांनी या भागाला भेट दिली. पर्यटकांशिवाय जवळ जवळ २०० वृद्ध माणसे या भागात कायमचे वास्तव्य करून आहेत. त्यांनी स्फोटानंतर कायमचं स्थलांतरित व्हायला नकार दिला होता.

 

आणखी वाचा :

मुंबईत या ११ ठिकाणी माणसांबरोबर भूतं सुद्धा राहतात !!

सबस्क्राईब करा

* indicates required