पावसाचं पाणी वाचवण्यासाठी या मुंबईकराने शोधून काढली आहे एक भन्नाट आयडिया !!

मंडळी, मान्सूनचं आगमन झालंय तरी भारतातला काही भाग हा पाणीटंचाईला सामोरं जातोय. याविरुद्ध मुंबईत पात्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत एवढा पाऊस पडला की सुट्टी जाहीर करावी लागली. मुंबईत एवढं पाणी का भरतं असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला दरवर्षी पडतो. याचं मुख्य कारण आहे पावसाच्या पाण्याचं न होणारं जलसंधारण.

स्रोत

मुंबईत एवढा पाऊस पडूनही ते पाणी नाल्यात वाहून जातं. या पाण्याचा उपयोग मुंबईला होत नाही. उलट मुंबईच ठप्प पडते. यावर एका मुंबईकराने एक सोप्पा आणि मोफत उपाय शोधून काढलाय. त्याने असा मार्ग शोधून काढला आहे ज्याच्या आधारे मुंबईकर पावसाचं पाणी सोप्प्या पद्धतीने वाचवू शकतात.

सुभजीत मुखर्जी असं या मुंबईकराचं नाव आहे. त्यांनी शोधून काढलेला हा भन्नाट मार्ग समजून घेऊया.

सुभजीत यांच्या या आयडिया मध्ये फक्त एका ड्रमची गरज आहे. करायचं एवढंच की, या ड्रमला जागोजागी भोक पडायचे. त्यानंतर जमिनीत ४ फुट खोल खड्डा खणून त्यात हा ड्रम पुरायचा. या ड्रमच्या झाकणातून एक पाईप थेट इमारतीच्या टेरेसशी जोडायचा. छतावर पडणारं पावसाचं पाणी ड्रम मध्ये जमा होईल. ड्रमला भोक असल्याने ते पाणी मातीत मुरेल. त्यामुळे जमिनी खालची पाण्याची पातळी वाढेल. तसेच ड्रम मध्ये पाणी जमा होत असल्याने वेळ पडल्यावर त्याचा वापरही करता येईल. कार धुण्यासाठी, झाडांना पाणी घालण्यासाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो. या ड्रम मध्ये जवळजवळ ७ दिवस पाणी टिकून राहतं.

मंडळी, सुभजीत मुखर्जी यांना ही जलसंधारण प्रणाली प्रत्येक शाळेत मोफत बसवायची आहे. यात त्यांना मुलांना सहभागी करून घ्यायचं आहे जेणेकरून लहान वयातच त्यांना पाणी वाचवण्याचे धडे मिळतील. सुभाजित मुखर्जी यांच्या मते या कामाला केवळ ३ तास लागतात. त्यांनी सामान्य नागरिकांनाही हा प्रयोग करण्याचं आव्हान केलं आहे.

मंडळी, सुभजीत मुखर्जी यांची ही कल्पना स्वस्त आणि फायदेशीर आहे. भारतातल्या इतर भागातही ती करता येऊ शकते. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली आम्हाला नक्की सांगा !!

सबस्क्राईब करा

* indicates required