computer

असा निषेध केला तर रस्त्यावरचे खड्डे लवकर बुजवले जातात!!

मंडळी, भारतात रस्त्यांसोबत खड्डे फ्री मिळतात. सध्या तर अशी परिस्थिती आहे की रस्त्यात खड्डे नसतील तर लोक तक्रार करतील. आपण सगळ्यांनीच खड्ड्यांसोबत छान जुळवून घेतलं आहे.

....पण रस्त्यातले खड्डे फक्त भारतातच आहेत का ? अहो ते अमेरिकेत पण सापडतात. अमेरिकेतल्या कॅन्सस सिटी भागातल्या रस्त्यात पण असाच एक खड्डा होता. तो गेली ३ महिने झाले दुरुस्त केलेला नव्हता. फ्रँक सेरेनो या स्थानिक रहिवाश्याने त्याबद्दल वारंवार तक्रार केली होती. त्याची तक्रार कोणी ऐकून घेतली नाही. शेवटी वैतागून त्याने एका अनोख्या ढंगात निषेध नोंदवला आहे. त्याने चक्क रस्त्यातल्या खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलाय.

मंडळी, फ्रँकने फेसबुक इव्हेंट तयार करून ३ महिने पूर्ण झाल्याबद्दल खड्ड्याचा वाढदिवस साजरा केलाय. त्याने लिहिलं की “मी केक आणि मेणबत्त्या आणल्या आहेत. खड्ड्याच्या जन्मदिनानिमित्त छोटीशी पार्टी पण अरेंज केली आहे.”

राव खड्ड्याचा बड्डेच त्याचा अखेरचा दिवस पण ठरला. फ्रँकचा बड्डे सेलिब्रेशन व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी त्वरित तो खड्डा बुजवला. फ्रँक म्हणतो की ‘एक खड्डा बुजवायला जर एवढं सगळं करावं लागत असेल तर कामं कधी वेळेवर होणारच नाहीत.’

मंडळी, फ्रँकरावांनी एकदा भारतात येऊन जावं मग ते कधीही रस्त्यातल्या खड्ड्यांबद्दल तक्रार करणार नाहीत. खरं की नाही ?