computer

सोशल मिडियामुळे डोक्याला शॉट लागू द्यायचा नसेल तर या ६ गोष्टी नक्की करा !!

सोशल मिडिया हा आजच्या काळात जगण्याचा भाग झाला आहे. ऑर्कुटच्या जमान्यापासून ते आजच्या व्हॉट्सॲप पर्यंत बरंच काही बदललंय. सोशल मिडिया हा वेगाने पसरला आहे आणि त्याने आपल्या दैनंदिन आयुष्याचा ताबा मिळवलाय. सोशल मिडीयावर घडणाऱ्या गोष्टी आता फक्त एक टाईमपास म्हणून उरलेल्या नसून त्या आपल्या जगण्यावर परिणाम करतायत.

मंडळी, आज आम्ही सोशल मिडीयावर टीका करणार नाही आहोत. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत सोशल मिडिया वापराताना आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं ते. हे ६ मार्ग बघून घ्या.

१. सोशल मिडीयाच्या वापरावर नियंत्रण आणा.

हे फारच कठीण आहे राव. आपल्याला सारखं नोटीफीकेशन बघण्याची सवय झालेली आहे. हात नुसते मोबाईल हातात घ्यायला शिवशिवत असतात. लोक तर बाथरूम मध्ये पण फोन घेऊन जातात. मग कंट्रोल कसं करायचं ?

मंडळी, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुम्ही सोशल मिडिया वापरणं पूर्ण करा असा याचा अर्थ होत नाही. तुम्हाला एवढंच करायचं आहे की दिवसातल्या एका ठराविक वेळेत मोबाईलला हात लावायचा नाही. याखेरीज महत्वाची बाब म्हणजे जवळच्या माणसांसोबत असल्यावर मोबाईलकडे बघायचं नाही. तुम्ही जेवढं ‘खऱ्याखुऱ्या’ माणसांमध्ये वावराल तेवढंच तुमचं मानसिक स्वास्थ्य सुरळीत राहण्यास मदत होईल.

२. ब्रेक घ्या

ही आहे दुसरी स्टेप. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की ५ दिवस किंवा आठवडाभर सोशल मिडीयापसून लांब राहिल्यास माणूस तणावापासून लांब राहतो. हे एव्हरेस्ट चढण्याइतकं कठीण वाटत असेल तर दुसरा एक मार्ग पण आहे. ३ आठवडे दिवसातून केवळ १० मिनिटे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट वापरा. सोशल मिडीयामुळे येणारा एकटेपणा, निराशा कमी होण्यास मदत होईल. हे एकट्याने ठरवण्यापेक्षा मित्र किंवा घरच्यांना आपण ब्रेकवर असल्याचं सांगितल्यास तेही तुमच्या मदतीला येतील.

३. प्रयोग करा

तुम्ही एक प्रयोग करू शकता. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळात,  तुमच्या आवडत्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स वापरून पाहा. वापरण्यापूर्वी आणि नंतर काय फरक जाणवतो हे स्वतःच पाहा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, की तासतासभर फेसबुक फीड बघत बसण्यापेक्षा काही मिनिटासाठी फेसबुक बघणं कमी डोकेदुखीचं काम असतं.

बऱ्याच लोकांना फेसबुकची फीड रात्री उशिरापर्यंत पाहत बसण्याची सवय असते. या सवयीने आपण स्वतःलाच दोष देतो, कारण आपण वेळ वाया घालवला ही गोष्ट मनाला टोचत राहते. ही सवय सोडवायची असेल तर रात्री १० नंतर फेसबुक उघडायचं नाही असं स्वतःशीच ठरवा. जमेल का ?

४. स्वतःला प्रश्न विचारा

तुम्ही जर सकाळी उठल्यावर लगेचच फेसबुक किंवा व्हॉट्सॲप चाळत असाल तर त्यावेळी स्वतःलाच प्रश्न विचारा. ‘मी हे का करत आहे ?’ काही महत्वाचं आहे म्हणून आपण बघत आहोत की नुसतं रोजची सवय म्हणून ?

अवघड काम समोर आलं आणि ते सोडवता नाही आलं की आपला हात लगेचच मोबाईलकडे जातो. हा अनुभव तुम्हालाही आला असेलच. अशावेळी हातात घेतलेला मोबाईल सगळे ॲप्स चाळून झाल्यावरच खाली ठेवला जातो. ही पळवाट बरोबर आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारा.

५. सोशल मिडीयावर कात्री फिरवा.

कात्री लावायची म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकायच्या. वाचकांपैकी बरेच लोक फेसबुक, इन्स्टाग्रामचे जुने रहिवाशी असतील. आपण फार पूर्वी लाईक केलेले पेजेस, फ्रेंडलिस्ट मधले लोक, इत्यादी आजच्या घडीलाही तेवढेच महत्वाचे असतील असं नाही. अशा अनावश्यक गोष्टी काढून टाकणं कधीही चांगलं. एका सर्वेक्षणनुसार फेसबुक फ्रेंड्स आपल्यावर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम करत असतात. अशा मित्रांना सर्वात आधी बाहेर काढा राव.

६. सोशल मिडियाला खऱ्या आयुष्याची जागा घेऊ देऊ नका

बऱ्याच लोकांना आपण महिनोन्महिने भेटत नाही, पण त्यांच्याशी फेसबुक, व्हॉट्सॲपवर तासंतास बोलत असतो. हा मार्ग तसा वेळ वाचवणारा आहे, पण त्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. लोकांना भेटणं, त्यांच्याशी समोरासमोर बोलणं आणि फेसबुक इन्स्टावर त्यांच्याशी बोलणं यात खूप फरक असतो.

मंडळी, योग्य प्रकारे वापरल्यास सोशल मिडिया हा आपल्याला उपयोगाचाच आहे, पण अतिरेक झाल्यास स्वतःचंच नुकसान होतं. सोशल मिडिया हा आपल्याला जगाशी जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही.

या ६ टिप्स कशा वाटल्या ते आम्हाला नक्की सांगा.  

 

आणखी वाचा :

रोजच्या व्यस्त जीवनात मेंदू फ्रेश ठेवण्यासाठी करा ही सोप्पी ट्रिक !!

मोबाईल जास्त वापरला म्हणून लोकांना शिंग फुटत आहे ?? काय आहे हे प्रकरण ??

या मुलीने २ वर्ष फुल ब्राईटनेसवर मोबाईल वापरला....डोळ्याचं काय झालं पाहा !!

टेन्शन आल्यावर लघवीला का लागते ? वाचा त्या मागचं वैज्ञानिक कारण !!!