computer

रोजच्या वापरातल्या कोणत्या छोट्याछोट्या गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला कारणीभूत आहेत?

जगभरात काही माणसं बहुतेक वेळा उपहासाची शिकार होतात. त्यापैकीच एक जमात म्हणजे पर्यावरणवादी. आपल्याकडे तर या लोकांचा सहजपणे 'लोकांना शहाणपणा शिकवणारे' म्हणत उद्धार केला जातो. विकासाच्या आड येणारा घटक म्हणजेच पर्यावरण अशी सरधोपट समजूत बहुसंख्य लोकांची असते. पण पर्यावरण हा विषय तेवढ्यापुरता मर्यादित नाही. त्याला अनेक पैलू आहेत. आणि आपल्या रोजच्या जगण्याशी ते गुंतागुंतीच्या स्वरूपात बांधलेले आहेत. आपल्या नकळत कितीतरी गोष्टी पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला कारणीभूत ठरत आहेत. ५ जून या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने यावर एक नजर टाकूया...

कल्पना करा, तुम्ही सुट्टीची मौजमजा करायला एखाद्या शांत, निवांत, माणसांची अजिबात गर्दी नसलेल्या समुद्रकिनारी गेला आहात. सूर्यास्ताची वेळ आहे. किनाऱ्याच्या मऊशार वाळूतून तुम्ही निवांत फिरत आहात आणि अचानक तुमच्या पायाला कशामुळे तरी गुदगुल्या होतात. काय ते पाहण्यासाठी तुम्ही खाली वाकता, तेव्हा खालच्या वाळूत काहीतरी चमकताना दिसतं. हातात घेतल्यावर लक्षात येतं, की ही चकाकणारी गोष्ट म्हणजे गोटी किंवा सुंदरसा शंख नाही, तर तो प्लॅस्टिकचा एक तुकडा आहे.

नवल आहे की नाही!
एवढ्या सुंदर स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिकचा तुकडा कुठून आला? तर समुद्राच्या पोटातून. आकड्यांच्या भाषेत बोलायचं तर पृथ्वीवरच्या महासागरांच्या पोटात आज ५.२५ ट्रिलियन प्लास्टिकचे तुकडे आहेत. ऊन, पाऊस, वारा यांचा मारा सहन करत यातले बरेचसे तुकडे झीज होऊन अगदी सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या तुकड्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. असं असलं तरी अगदी १९४० मध्ये गिळलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या समुद्र कधीकधी परत समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने आणून सोडतो. याव्यतिरिक्त मातीत फेकलं जाणारं प्लॅस्टिक, नद्यांच्या पात्रात कचऱ्याच्या रुपाने वाहत येणारं प्लॅस्टिक हेही आहेच.
पण मुळात प्लॅस्टिकचा एवढा वापर का? तर ते वाहतूक करायला सोपं, वजनाने हलकं आणि त्याच वेळी मजबूत व टिकाऊ असल्याने अनेक उत्पादनं बनवण्यासाठी प्लॅस्टिकला आजही पहिली पसंती असते.

आपण रोज घरात वापरतो त्यातल्या बऱ्याचशा वस्तू प्लास्टिकमध्ये ठेवल्या जातात. विशेषतः द्रव स्वरूपात असलेले पदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिक हाच पर्याय जास्तीत जास्त वापरला जातो. रोजच्या वापरातल्या तेल, शाम्पू, लिक्विड सोप यांच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या असतात. त्यासाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्नही झाले आहेत. त्यातूनच शाम्पू साबणाप्रमाणे वड्यांच्या स्वरूपात बाजारात दाखल झाले, जेणेकरून त्यांच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकची गरज पडणार नाही. काही दशकांपूर्वी साठवणीसाठी धातू, काच, माती यांचा वापर होत असे. त्यांची जागा मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकने घेतली आहे. प्लॅस्टिकचे वरील गुणधर्म हे यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण. पण सध्या आपली सोय पाहताना आपण पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी करत आहोत.

दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू अशा आहेत, ज्या किती घातक आहेत हे आपल्याला माहित नसतं. उदाहरणार्थ स्त्रियांच्या मेकअपच्या सामानात वापरलं जाणारं ग्लिटर म्हणजे प्रत्यक्षात पॉलिप्रोपीलिन नावाच्या रसायनापासून तयार झालेले बारीक कण असतात. इतरही अनेक सौंदर्यप्रसाधनं पर्यावरणासाठी आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी घातक असतात. त्यातून अस्थमा, ॲलर्जी, आणि क्वचित कर्करोग यांसारख्या समस्या उद्भवतात. त्याला पर्याय म्हणून ऑरगॅनिक किंवा वनस्पतीज द्रव्यांपासून तयार केलेली सौंदर्यप्रसाधनं आज बाजारपेठेत येत आहेत. तरीदेखील त्यामुळे पर्यावरण खरोखर वाचवलं जात आहे का, हा प्रश्न उरतोच. कारण त्यांच्या निर्मितीच्या निमित्ताने अनेक वेळा झाडांवर संक्रांत येते.

प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी असलेला एक पर्याय म्हणजे रिफिलिंग. अमेरिकेसारख्या देशात आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये डिपार्टमेंटल स्टोअर्स, सुपरमार्केट अशा ठिकाणी आजकाल रिफिलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आपण घरी वापरत असलेल्या वस्तू वापरून संपल्या की त्या साठवण्याची प्लॅस्टिकची बाटली घेऊन जायचं आणि ती रिफिल करून आणायची. मग फक्त केलेल्या रिफिलच्या वजनाएवढे पैसे द्यायचे, अशी पद्धत इथे हळूहळू रुजत आहे. हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.

पर्यावरणाच्या ऱ्हासाला आपण नकळत किती जबाबदार आहोत हे दाखवून देणारं एक उदाहरण म्हणजे तमाम पुरुष वर्ग दाढीसाठी वापरतो तो आयता साबणाचा फेस. पूर्वी दाढीच्या साबणावर ब्रशने घासून फेस तयार केला जायचा. आजकाल त्यासाठी एक बाटली मिळते त्याचं वरचं बटन प्रेस केल्यावर आयता फेस बाहेर येतो. सकाळच्या गडबडीत हे सोयीस्कर वाटतं खरं, पण प्रत्येक वेळी फेस बाहेर येताना त्यापासून एक घटक सुटा होऊन थेट हवेत मिसळतो आणि वातावरणाच्या वरच्या थरात जातो. यामुळे ओझोनच्या थराला धोका निर्माण झाला आहे. त्यातूनच सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येऊन घातक दुष्परिणाम होत आहेत. याशिवाय मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॉल या ठिकाणी डेअरी प्रॉडक्ट्स, नॉनव्हेज आयटम्स साठवण्यासाठी मोठाले फ्रिज वापरले जातात. त्यापासून फ्रेऑन हा वायू सुटा होऊन तो हवेत मिसळतो. त्यामुळेदेखील पर्यावरणाची हानी होत आहे.

आपल्याला माहिती नाहीत किंवा जाणवतही नाहीत असे कितीतरी बदल आपण जीवनशैलीचा भाग म्हणून सहज स्वीकारले आहेत. पण म्हणून ते बदल आपल्याला योग्य दिशेने नेत आहेत का? आजच्या क्षणिक सुखासाठी आपण आपला उद्या धोक्यात आणत आहोत, याची अजूनही जाणीव झालेली नाही. त्यामुळे सध्यातरी हा छुपा धोका ओळखून त्यानुसार योग्य ते बदल घडवून आणणं हाच खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन असेल‌.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required