f
computer

बोभाटा बाजार गप्पा : अग्रहक्काचे शेअर्स आणि गुंतवणूक! सध्या कशामध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल?

कंपन्यांना शेअर बाजारात भांडवल उभे करण्यासाठी एक खात्रीचा मार्ग म्हणजे ‘राईट्स शेअर्स’. आता राईट्स म्हणजे हक्क हे वेगळे सांगायला नकोच. कंपनीच्या सध्याच्या समभागधारकांना (Existing Shareholders) जे समभाग म्हणजे शेअर्स दिले जातात त्या समभागाची विक्री म्हणजे राईट्स इश्यू. शुद्ध मराठीत आपण याला अग्रहक्काचे समभाग असेही म्हणता येईल.

या समभागाची विक्री करण्यापूर्वी जे आधीच समभागधारक आहेत त्यांची परवानगी घेतली जाते. कंपनीच्या अग्रहक्काचे समभाग देऊन भांडवल जमा करण्याचा उद्येश्य काय आहे हे स्पष्ट केले जाते. किती समभाग धारण करणाऱ्याला किती अग्रहक्काचे समभाग दिले जातील याचे प्रमाण ठरवले जाते. याखेरीज दर्शनी मूल्यापेक्षा अधिक रक्कम म्हणजे प्रिमियम किती घ्यावा हे ठरवले जाते. त्यानंतर सरकारकडून त्याची परवानगी घेऊन कोणत्या तारखेपर्यंतच्या समभागधारकांना अग्रहक्काचे समभाग मिळतील हे निश्चित केले जाते. याला ‘रेकॉर्ड डेट’ असे म्हणतात.

यानंतर समभागाचे विक्रीचे अर्ज समभागधारकांना पाठवले जातात. जे समभाग देऊ केले जाऊ शकतात तो आकडा या अर्जामध्ये नमूद केला जातो. अशी शक्यता असते की समभागधारकाला या अग्रहक्काच्या समभागात रस नसेल तर तो अर्ज कचऱ्याच्या टोपलीत फेकेल. पण यातून एक मार्ग उपलब्ध असतो ज्याला “राईट्स रिनाउंसेशन” असे म्हणतात. म्हणजे समभाग धारक आपले हक्क दुसऱ्याला देऊ शकतो. हा हक्क देण्याचे किती पैसे आकारावेत हे समभागधारक खाजगी व्यवहारात ठेरवू शकतो. याखेरीज देऊ केलेल्या समभागाच्या जास्त समभाग हवे असतील तर त्याची पण तरतूद अर्जात केलेली असते. पण असे अतिरिक्त समभाग देणे न देणे हे किती अर्ज येतात यावर अवलंबून असते.

फार पूर्वी अग्रहक्काच्या समभागाच्या विक्रीच्या नावाखाली बऱ्याच कंपन्या मोठ्याप्रमाणात पैसे जमा करायच्या. समभाग दिल्यानंतरही उरलेले पैसे बरेच दिवस म्हणजे काहीवेळा सहा सहा महिने देखील परत न देता बिनव्याजी वापरायचा. सेबीची स्थापना झाल्यावर अशा सर्व गैरव्यवहाराला आळा बसलेला आहे.

आता प्रत्यक्ष उदाहरण म्हणून काल सुरु झालेली वोडाफोन-आयडियाची अग्रहक्काची विक्रीचे उदाहरण घेऊया.

१. कंपनीचे नाव – वोडाफोन-आयडिया लिमिटेड.

२. उभे केले जाणारे भांडवल – २५,००० कोटी.

३. एकूण समभागाची संख्या – २,००० कोटी.

४. अग्रहक्काचे प्रमाण – जर अर्जदाराकडे ३८ शेअर्स असतील तर ८७ शेअर्ससाठी अर्ज करता येईल.

५. प्रोमोटरचा हिस्सा : वोडाफोन तर्फे ११,००० कोटी आणि आदित्य बिर्ला ग्रुप तर्फे ७२५० कोटी.

६. शेवटची तारीख – २४ एप्रिल २०१९.

ही झाली सर्वसाधारण माहिती. बोभाटा तर्फे बाजाराचा कानोसा घेण्यात आला तेव्हा असे लक्षात आले की एका समभागाची किंमत रुपये १२.५० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत असल्याने हे अग्रहक्काचे शेअर्स सहज विकले जातील.

एका वर्षापूर्वी ७० रुपयापेक्षा जास्त भाव मिळत असताना आज हा भाव १६ रुपयांपर्यंत घसरला आहे. तरीपण समभागधारक अर्ज का करतील ?

१. १ वर्षापूर्वी वोडाफोनने आयडिया सेल्युलर ही कंपनी ताब्यात घेतली. त्यानंतर लगेच रिलायन्सच्या जिओचा प्रभाव बाजारात वाढला त्यामुळे गुंतवणूकदारांनी या समभागाची सतत विक्री केली. अर्थातच विक्रीच्या दबावाखाली भाव कमी झाले.

२. मोबाईलच्या क्षेत्रात आता फक्त तीनच मोठे स्पर्धक शिल्लक आहेत - रिलायन्स जिओ, ऐअरटल आणि वोडाफोन-आयडिया. सध्याच्या बाजारात वोडाफोनचा वाटा पुन्हा एकदा वाढतो आहे.

३. रुपये १२.५० ही किंमत एन्ट्री लेव्हल म्हणून फारच स्वस्तात वाटते म्हणून ही विक्री यशस्वी होईल असे वाटते.

 

बोभाटाच्या वाचकांना अग्रहक्काची विक्री समजावून सांगावी या हेतूने हा लेख लिहिला आहे. बोभाटाचे गुंतवणूक या समभागात नाही. अग्रहक्काचा अर्ज भरणे हा वाचकाचा स्वतःचा निर्णय असेल. बोभाटाची कोणतीही जबाबदारी या लेखासोबत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required