computer

कर्नाटक पर्यटन विभागाने कचरा फेकणाऱ्या तरुणांना असा शिकवला धडा!!

चालत्या गाडीतून कचरा बाहेर फेकणे भारतात नवीन नाही. खाण्याचे पदार्थ, जंक फुडचे रॅपर्स, बाटल्या, ग्लास अशा कित्येक गोष्टी लोक गाडीबाहेर सहज फेकून देतात. मागे एकदा कचरा फेकणाऱ्या अशाच एका भावाला अभिनेत्री अनुष्का शर्माने झापले होते. तो व्हिडीओ वायरल झाल्यावर त्याने उलट अनुष्का शर्मावर केस करण्याची धमकी दिली होती.

बऱ्याच वेळा असे कचरा फेकणे निभावून जात असते. पण कधी कधी ही कृती महागात पडू शकते, याचा अनुभव नुकताच कर्नाटकात दोन तरुणांना आला आहे. भावांना जालीम गडी भेटला ज्याच्यामुळे कचरा फेकल्यावर चक्क ८० किलोमीटर परत येऊन तो कचरा उचलावा लागला.

दोन तरुण कुर्गची सफर करण्यासाठी गेले असताना त्यांनी कोडागू या ठिकाणी पिझ्झा ऑर्डर करून खाल्ला. खाऊन झाल्यावर कचरा हा कचरा पेटीत टाकायचा असतो याचा कदाचित त्यांना विसर पडला असावा. त्यांनी पिझ्झाचे पॅकेट आणि बॉक्स रस्त्यावर फेकले. आणि आपला पुढचा प्रवास सुरु केला. आता योगायोग बघा. त्यांच्या मागे त्या ठिकाणी गाडी आली कोडागु टुरिझम असोसिएशनचे सचिव मदीतिरा थिमैय्या. विशेष गोष्ट म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी ती जागा स्वतः साफ केली होती. स्वतःच्या हाताने नुकतीच साफ केलेली जागा असे कुणी खराब करत असेल तर साहजिकच वाईट वाटेल.

थिमैय्या यांना त्या पॅकेटवर बिल आणि त्या बिलमध्ये मुलाचा नंबर मिळाला. त्यांनी आधी प्रेमाने सांगितले की परत येऊन कचरा उचला, पण दोन्ही मुले ऐकत नाहीत हे बघून त्यांनी कचऱ्याचा व्हिडीओ आणि मुलांचे नंबर सोशल मीडियावर पोस्ट केले. पोलिसांना देखील कळवले.

दोन्ही तरुणांना आता सतत लोकांचे फोन येऊ लागले होते. शेवटी दोन्ही मुले यु-टर्न मारून ८० किलोमीटर परत आली आणि त्यांनी कचरा साफ केला. बेंगलोर मध्यचे खासदार पीसी मोहन यांनी देखील थिमैय्या यांनी टाकलेला व्हिडीओ शेयर केला आणि त्यांचे कौतुक केले.

कचरा पसरवू नये हे आपल्या सगळ्यांनाच वेळोवेळी सांगण्यात येते पण बेजबाबदारपणा आणि आळसामुळे आपण हातातला कचरा सहज रस्त्यावर सोडून देतो. या दोन तरुणांनीही तेच केलं आणि त्यांना त्याची शिक्षा मिळाली. लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देण्यासाठी अधूनमधून असे झटके देणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? 

सबस्क्राईब करा

* indicates required