computer

विचित्र नाही, पण संदर्भासह असलेल्या बिहारमधल्या आगळ्यावेगळ्या नावाच्या लोकांचे किस्से!!

प्रत्येकाला आपल्या मुलाचं नाव काहीतरी वेगळं आणि हटके असावं असं वाटतं. त्यातून मग पौराणिक नावं ठेवतात तिथपर्यंत ठीक आहे, पण कधीकधी अशी विचित्र नावं ठेवली जातात की बोलायची सोय नाही.
तरी शेक्सपिअर म्हणून गेला, "नावात काय आहे?’ पण हे त्याचं वाक्य काही सर्वांपर्यंत पोचलं असावं असा काही नियम नाही. म्हणूनच आज आम्ही भारतातल्या काही लोकांनी ठेवलेल्या मुलांच्या अतरंगी नावांची यादीच घेऊन आलो आहोत.

तर ही नावांची आणि किश्शांची लांबलचक यादी आहे बिहारमधली.

बिहारमधल्या भोजपूर गावात कायमनगरमध्ये एक दुकानदार राहतात. नाव आहे धर्मात्मा शर्मा. या शर्मांवर १९१७ मध्ये झालेल्या रशियन क्रांती आणि साहित्याचा खूप परिणाम झाला. धर्मात्मा शर्मा आणि त्यांच्या पत्नी मीना देवी यांना चार मुले आहेत. चौघांची नावे रशियन क्रांती आणि साहित्यामधील पात्रांच्या नावावरून ठेवली आहेत. त्यांच्या मुलांची नावं आहेत निकोलाय, पॉवेल, ज्युलिअस फुचीक, क्लारा जेटकीन आणि झोऊ एनलाई शर्मा. निकोलाय ओस्त्रोवस्की एक प्रसिध्द कादंबरीकार होते. ते ‘हाऊ द स्टील वॉज टॅम्पर्ड’ या कादंबरीमुळे ते जगभरात प्रसिध्द झाले. निकोलाय शर्मा हे आता पटणा युनिवर्सिटी मधून वकिलीचा अभ्यास करत आहेत. पॉवेलचे नाव आले आहे मॅक्सिम गॉर्की यांच्या 'आई' प्रसिध्द कादंबरीमधल्या प्रमुख पात्रावरुन. सत्यघटनेवर बेतलेल्या या 'आई'चा जगातल्या जवळजवळ सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. ज्युलिअस फुचीकही कादंबरीकार आहेत. ज्युलिअस यांची कादंबरी ‘नोट्स फ्रॉम द गॅलोव्ज’ वाचकांमध्ये खूप प्रसिध्द आहे. त्यांचा चौथा मुलगा झोऊ एनलाई आत्ता नववीत शिकत आहे. झोऊ एनलाई हे स्वतंत्र चीनचे पहिले प्रधानमंत्री होते. धर्मात्मा आणि मीनादेवींच्या मुलीचे नाव क्लारा जेटकीन जर्मनीमधल्या एक समाजवादी क्रांतिकारकावरून ठेवले होते. दुर्दैवाने तीचा मृत्यू झाला. गंमत म्हणजे अशी परदेशी नावांवरून प्रेरित होऊन ती नावे आपल्या मुलांना देणाऱ्या धर्मात्मांचे खूप शिक्षण झाले आहे असेही नाही. त्यांनी हिंदीत आपल्या मुलांची नावे तर लिहिली. पण इंग्रजीमध्ये लिहिणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी गावातल्या सगळ्यात जास्त इंग्रजी येणाऱ्या एका व्यक्तीकडून ही नावे इंग्रजीमध्ये लिहून घेतली.

नावांच्या या अजब गजब जगात काही लोकांनी त्यांच्या मुलांची नावे राजांच्या नावावरून ठेवली आहेत. रोहतासमधल्या कैमूर जिल्ह्यातील कुदारा बाजार मध्ये राहणाऱ्या अनुराधा रस्तोगी यांनी आपल्या चारही मुलांची नावे चंद्रगुप्त, स्कंदगुप्त, हर्षगुप्त आणि समुद्रगुप्त अशी ठेवली आहेत. चंद्रगुप्त, स्कंदगुप्त आणि समुद्रगुप्त हे गुप्त वंशाचे प्रमुख राजे होते. गुप्त कालीन भारताला प्राचीन इतिहासाचे सुवर्णयुग म्हणतात. कारण याच काळात विज्ञान साहित्य आणि कला यांचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. अनुराधा म्हणतात, “आम्ही मुलांची नावे राजांच्या नावावरून यासाठी ठेवली की त्यांचे यश या सर्व राजांसारखे जगभर पसरावे.”

अनुराधा यांना जसे आपल्या मुलांना यश आणि ताकद मिळावी असे वाटते तसेच बिहारच्या पश्चिमी भागातील चंपारण जिल्ह्यातील सिसावा बसंतापूर गावातील हवालदारांच्या घरात पाच देश राहतात. अमेरिका, आफ्रिका, रुस (रशिया), जपान आणि जर्मनी. यामधील रुस शर्मा यांचा मृत्यू वयाच्या ५२ व्या वर्षी झाला, तर त्यांचे भाऊ जर्मनी शर्मा यांचा मृत्यू वयाच्या ५५ व्या वर्षी झाला. या भावांतील सुतार असणारे जपान शर्मा असे सांगतात की त्यांचे काका अकलू शर्मा हे १९५० मध्ये फौजेत भारती झाले. फौजेत राहून त्यांनी बऱ्याच देशांविषयी ऐकले व गावी येऊन आपले मोठे भाऊ चंनर शर्मा यांच्या मोठ्या मुलाचे नाव अमेरिका ठेवले. याच प्रमाणे त्यांनी पुढील मुलांचीदेखील नावे ठेवली. या नावांमुळे हे कुटुंब त्यांच्या गावात प्रसिध्द आहे. या भावांविषयी एक मजेदार किस्सा सांगितला जातो. गावात त्यांचे काही लोकांबरोबर भांडण झाले तेव्हा काही लोक या भावांविरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले. पण पोलिसांनी या देशांविरोधात तक्रार नोंदवून घ्यायला साफ नकार दिला. ते म्हणाले आम्ही या देशांविरोधात कोणतीच कारवाई करू शकत नाही.

असे तर बिहारच्या ग्रामीण भागात ‘अमेरिका’ हे नाव खूप लोकप्रिय आहे. बिहारमधील एका नेत्याचे नाव अमेरिका महातो आहे. तसेच मधुबनी जिल्ह्यातील एका महिला पुढारीचे नाव अमेरिका देवी आहे. २००५ मध्ये एका महिलेला नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केले होते तिचे नाव देखील अमेरिका देवी असे होते. तसे तर पटनामधील तीन भावांची नावे सलमान, फिरोज आणि फवाद खान आहेत.

समाजशास्त्र संशोधक नावांच्या इतिहासाचाही अभ्यास करतात. त्याच्यामते नावांच्या संस्कृतीमध्ये खूप बदल झाला आहे. पूर्वी माणसाची नावे त्याच्या जातीवरून किवा कामावरून ठेवली जायची पण आता त्यांची नावे टी.व्ही, सिनेमा, पेपर, वेगवेगळ्या कथेतील नायक नायिका यांच्या नावावरून ठेवली जातात.
हे संशोधक काही म्हणोत, तुम्ही ऐकलेली-वाचलेली अशी आगळीवेगळी नावे आम्हांलाही सांगा..

सबस्क्राईब करा

* indicates required