computer

तृतीयपंथीयांचे शिलेदार: वेळेस कायदाही बदलायला लावून आई झालेल्या गौरी सावंत यांची गोष्ट!!

तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. पण अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. अशाच काही कर्तृत्ववान तृतीयपंथीयांची ओळख करून देण्यासाठी बोभाटा नवीन लेखमालिका घेऊन येत आहे.

 

आजचा भाग स्पेशल आहे, कारण कालपासून LGBT समुदायाच्या स्वाभिमानासाठी सुरु झालेल्या 'प्राईड मंथ'ला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आज एका अशा तृतीयपंथीय व्यक्तीला भेटूया जिला समाजाने सांगितले होते की तू आई होऊ शकत नाही. पण तिने सर्व बंधने झुगारून एक परिपूर्ण आई होऊन दाखवले आहे.

ही गोष्ट आहे गौरी सावंत यांची. सावंत यांना विविध व्यासपीठांवर तुम्ही पाहिले असेल. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत एवढीच त्यांची ओळख नाही. त्यांनी स्वतःसाठी आणि एका मुलीला सख्या आईप्रमाणे प्रेम देण्यासाठी जो त्रास सहन केला तो प्रचंड आहे. 

जन्माआधीच त्यांच्यामागील शुक्लकाष्ठ सुरू झाले होते. पोटात असतानाच त्यांचा भ्रूणहत्या करण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांनी करून बघितला. पण डॉक्टरांनी तसे होऊ दिले नाही. पुढे गौरी यांचा जन्म झाला. सुरुवातीला ते पुरुष वाटत असल्याने त्यांचे नाव गणेश ठेवण्यात आले होते. शरीर मुलाचे पण भावना मुलीच्या अशी त्यांची गत झाली होती. यामुळे त्यांना सातत्याने हीन वागणूक मिळत असे. शाळेत असताना देखील त्यांचे मुलीसारखे वागणे बघुन शिक्षक त्यांना चांगली वागणूक देत नसत. एवढेच काय शिक्षकांनी त्यांच्या वडिलांना तुमच्या मुलात मुलीचे गुण आहेत असे देखील सांगितले होते. याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या वडिलांनी गौरीला वाईटसाईट बोलणे सुरु केले. तुला रस्त्यावरून टाळ्या वाजवत फिरायचे आहे का? या प्रकारच्या शब्दात त्यांची हेटाळणी झाली.

गौरी सर्व प्रकाराला प्रचंड विटल्या होत्या. त्यांनी शेवटी घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तसे करूनही दाखवले, पण त्यांचे आई वडील मात्र तरीही बधले नाहीत. त्यांनी जिवंतपणी गौरीचे अंत्यसंस्कार करून टाकले. घर सोडून तर गौरी गेल्या पण आता राहायचे कुठे हा मोठा प्रश्न यांच्यासमोर होता. योगायोगाने तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने त्यांना राहायला जागा दिली. गौरी सावंत यांना आता तृतीयपंथी समुदायाला किती त्रासाला सामोरे जावे लागते याची जाणीव झाली होती. त्यांनी पुढील आयुष्य तृतीयपंथी समुदायासाठी खर्ची करायचे ठरवले. 

याच काळात त्यांची ओळख गायत्री नावाच्या मुलीसोबत झाली. गायत्रीच्या आईचा एड्स रोगामुळे मृत्यू झाला होता. आईच्या मृत्युनंतर गायत्रीला विकण्याचा निर्णय काही लोकांनी घेतला होता. पण एका असहाय मुलीचा अशाप्रकारे बळी दिला जाणे गौरी यांना पचले नाही. त्यांनी तिचा सांभाळ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गायत्रीला गौरी यांच्यापासून दूर करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण गायत्री आणि गौरी यांच्यामध्ये मायलेकीचे नाते निर्माण झाले होते. त्यांनी न्यायालयात गौरीला दत्तक घेण्याचा केलेला अर्ज देखील फेटाळण्यात आला. पण त्यांनी हार मानली नाही. 

सुप्रीम कोर्टात तृतीयपंथी व्यक्तींच्या मुल दत्तक घेण्याच्या हक्काबद्दल याचिका दाखल करणाऱ्या त्या भारतातल्या पहिल्या व्यक्ती होत्या. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर सुप्रीम कोर्टाने गौरी सावंत यांची मागणी मान्य करून तृतीयपंथीयांना तिसऱ्या लिंगाचा दर्जा दिला. 

गौरी सावंत यांची आज तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून जगभर ओळख आहे. त्यांनी कलम 377 रद्द करण्याचा लढा तसेच तृतीयपंथीयांना आधारकार्ड मिळवून देणे अशा अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला आहे.

गौरी सावंत यांची समाजाच्या हेटाळणीला सामोरं जाऊन कायद्यासमोर हार न मानता आपलं म्हणणं मांडण्याची ताकद अफाट आहे. त्यांनी केलेल्या कामाचा फायदा पुढील अनेक पिढ्यांना होत राहील आणि अनेकांना प्रेरणाही मिळेल.

 

आणखी वाचा:

तृतीयपंथीयांचे शिलेदार: भेटा भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील सत्यश्री शर्मिला यांना!!

सबस्क्राईब करा

* indicates required