computer

तृतीयपंथीयांचे शिलेदार: किन्नर आखाड्याचे आचार्य ते फॅशन आयडल....लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी गाठलेली उंची प्रेरणादायी आहे !!

तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. पण अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. अशाच काही कर्तृत्ववान तृतीयपंथीयांची ओळख करून देण्यासाठी बोभाटा नवीन लेखमालिका घेऊन येत आहे.

आजच्या भागात एका चौफेर व्यक्तिमत्वाला भेटूया.

लक्ष्मी नारायण त्रिपाठी हे नाव भारतात सर्वांना माहीत आहे. अनेक ठिकाणी त्या व्याख्याने तसेच इतर गोष्टींच्या निमित्ताने दिसत असतात. किन्नर आखाड्याचे आचार्य असल्याने त्यांचा अध्यात्मिक स्वभाव देखील अनेकांना प्रभावित करतो. तृतीपंथीयांमध्येच नाहीतर सर्वच ठिकाणी त्यांच्याबद्दल आदर पाहायला मिळतो.

आज लक्ष्मी यांनी एक उंची गाठली असली तरी त्यांचा संघर्ष सोपा नव्हता. त्यांची कहाणी अनेक तृतीयपंथीयांप्रमाणेच संघर्षाची कहाणी आहे. त्या सांगतात की, 'आपल्याला स्त्री किंवा पुरुष म्हणून जगायचे नव्हते. माझ्या जन्म दाखल्यावर जरी पुरूष लिहिले असले तरी, मला पुरुष किंवा स्त्री म्हणून जगायचे नव्हते. सर्व बंधने झुगारून लावल्याने मला मोठी हिंमत मिळाली आहे.' त्रिपाठी यांचे शिक्षण बघितले तर हरखून जायला होते.

मुंबई येथील सिंघानिया महाविद्यालयातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण घेतले तर पुढे थेट आयआयपीएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. लहानपणी त्यांनी नृत्याचे प्रशिक्षण देखील घेतले होते. मोठे झाल्यावर याच आवडीमुळे त्यांनी भरतनाट्यमचे अधिकृत शिक्षण घेतले.

लक्ष्मी यांनी अनेक क्षेत्रात मुशाफिरी केली आहे. एकच व्यक्ती किती वैविध्यपूर्ण आयुष्य जगू शकतो, याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे लक्ष्मी नारायण त्रिपाठी या आहेत. त्यांनी स्वतःला एक फॅशन आयडल म्हणून सिद्ध केले आहे. त्यांचे अनेक राजकीय पक्षांशी आणि त्यांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. २०१४ साली तर त्रिपाठी या लोकसभा निवडणूक लढवणार या बातमीने तर चर्चेला उधाण आलं होतं.

लक्ष्मी यांचे तृतीपंथीयांच्या हक्कासाठी केलेल्या गोष्टी या खरोखर तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठा हातभार लावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी लिहिलेले 'मी हिजडा, मी लक्ष्मी' हे पुस्तक समाजाला आरसा दाखवण्याचे काम करत असते. बॉलिवूड आणि लक्ष्मी नारायण त्रिपाठी हे नाते देखील सर्वांना माहीत आहे. मध्यंतरी तृतीयपंथीयांच्या हक्कांवर बेतलेल्या लक्ष्मी सिनेमावरून झालेल्या वादात त्यांनी या सिनेमाची पाठराखण केल्यावर स्वतः अक्षय कुमारने त्यांचे आभार मानले होते.

त्या विविध रियालिटी शोजमध्ये देखील दिसत असतात. बिग बॉस या देशातील एका मोठ्या रियालिटी शो मध्ये देखील त्या सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर ‘सच का सामना’, सलमान खानचा शो ‘दस का दम’, ‘राज पिछले जन्म का’ या शोजमध्ये देखील त्यांनी हजेरी लावली आहे. २०१६ सालच्या उज्जैन येथे भरलेल्या कुंभमेळ्यात त्यांना किन्नर आखाड्याचे पहिले महामंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली होती. या गोष्टी बघितल्या तर एक तृतीयपंथीय व्यक्ती आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर किती मोठी मजल मारू शकते, याचा अंदाज येतो.

लक्ष्मी यांचे आपल्या आई वडिलांसोबतचे नाते देखील प्रेमाचे आहे. जेव्हा समाजात तृतीयपंथीयांना आई-वडीलच सोडून देतात तिथे आई-वडिलांच्या सोबत टीव्हीवर येणाऱ्या लक्ष्मी या पहिल्या तृतीयपंथीय आहेत. आपल्या याच अनुभवावरून त्या सांगतात की तृतीयपंथीयांना त्यांच्या आई-वडिलांनी प्रेमाने वागवल्यास त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी कमी होऊ शकतील.

 

त्रिपाठी यांच्या आयुष्यात प्रेमाला देखील विशेष स्थान आहे. त्यांच्या सुरुवातीला विक्की थॉमस नावाचा व्यक्ती आला. दोघांमध्ये चांगले प्रेम बहरले. पण काही वर्षांनी मात्र त्यांच्यात पटेनासे झाले. शेवटी दोघे वेगळे झाले. मात्र त्रिपाठी यांना प्रेमाची उणीव जास्त काळ भासली नाही. त्यांच्या आयुष्यात आर्यन पाशा नावाचा ट्रान्समेल बॉडीबिल्डर आला. आर्यन त्यांच्या पेक्षा १४ वर्ष लहान असला तरी दोघांमधल्या प्रेमसंबंधात मात्र वयाचा अडथळा येऊ शकला नाही. २०१९ साली त्यांनी साखरपुडा केला तसेच पुढे लग्न थाटून जगापुढे मोठे उदाहरण ठेवले. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आयुष्यातील या सर्व गोष्टी बघून तृतीयपंथीयांबद्दल समाजाचा दृष्टीकोण मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. त्यांचे हे योगदान खरोखर कौतुकास्पद आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required