जाणून घ्या या व्हायरल फोटोमागचं सत्य..

काल-परवापासून हा फोटो व्हॉटसॲपच्या जवळजवळ प्रत्येक ग्रुपमध्ये आलाय. एका लहानशा स्कूटरवर एक माणूस, दोन बायका आणि दोन मुलं इतका सारा फौजफाटा बसलाय. एकाच्याही डोक्यावर हेल्मेटही नाहीय.   आजवर बाईकवर एकाच वेळेला सात-आठ माणसांना बसलेलं पाह्यलंय, पण स्कूटरवर इतक्या लोकांना बसलेलं सहसा पाहिलं नाही. एवढं होऊन हा पोलिस त्यांना दंडवत घालतोय..  इथे काय घडलं याचा द न्यूज मिनिटने तपास काढलाय.  पाहूयात मग नक्की काय झालं ते..


ही घटना घडलीय आंध्रातल्या अनंतपूर जिल्ह्यात.  फोटोत दिसणाऱ्या पोलिसाचं नांव आहे बी. शुभकुमार.  सोमवारी जेव्हा ते आपल्या ड्यूटीवर जात होते, तेव्हा त्यांना के. हनुमंतरायडू स्कूटरवरून जाताना भेटले. त्यांची दोन्ही मुलं पेट्रोलच्या टाकीवर बसली होती, मग ते स्वत:, त्यांची बायको आणि पाठीमगे त्यांची एक नातेवाईक कशीबशी बसली होती.. 

शुभकुमारना आता यांना काय बोलावं हाच प्रश्न पडला. हनुमंतरायडूनी वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी तर केलीच होती, पण सोबत आपल्या कुटुंबियांचा जीवही धोक्यात घातलाच होता. नुकतंच शुभकुमार यांनी रस्त्यांवरची सुरक्षितता आणि वाहतूकीचे सुरक्षा नियम न पाळल्यानं काय काय होऊ शकतं, यावर दीड तासाचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात तिडिक गेली आणि त्यांनी हनुमंतरायडूंना चक्क हात जोडून नमस्कारच केला!!

बाकी, हनुमंतरायडूंची हे असं करण्याची पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांना कडक शब्दांत समज देण्यात आलीय. तरीही हा माणूस काही म्हणून सुधारत नाही. उलट त्यांनी चुकीचं काय केलंय हे सांगायची वेळ शुभकुमार यांच्यावर आली. भरीसभर म्हणजे हनुमंतरायडूंकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं. 
शुभकुमार जाम भडकले होते, पण हनुमंतरायडू कुटुंबियांसोबत मंदिरात चालले होते. म्हणून त्यांना दंड न घेता सोडण्यात आलं. परंतु शुभकुमारांनी त्यांच्या बायकोमुलांसाठी रिक्षा बघून दिली.

धन्य तो घरधनी आणि धन्य त्या स्कूटरवर बसलेली जनता!!
 

सबस्क्राईब करा

* indicates required