एका अपघाताने पुनीत इस्सारला आयुष्यभर खलनायक बनवले!

पूर्वी सिनेमा म्हटलं की लोकांना सर्व काही खरं खरं वाटायचं.  मग त्यात हिरो असेल, तर तो एक आदर्श पुरुष असायचा, हिरोईन म्हटलं, की एक आदर्श प्रेयसी वाटायची आणि व्हिलन म्हटलं की जगात जेवढं म्हणून वाईट आहे ते सगळं त्याच्या आत कुटून भरलेलं असायचं. म्हणून म्हटलं जातं की पूर्वीचे लोक खूप भाबडे होते.

आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. त्यांच्या आयुष्याचा एक न विसरता येण्यासारखा प्रसंग म्हणजे कुली सिनेमाच्या शुटींग दरम्यान झालेला अपघात. या अपघाताने बिग बी चे चाहते चांगलेच हादरले होते. बिग बी नी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याबद्दल अनेकदा सांगितलं आहे.

स्रोत

या प्रसंगात ज्या व्यक्तीमुळे बिग बी नां दुखापत झाली ते म्हणजे ‘पुनीत इस्सार’. हा माणूस त्या दिवसानंतर सरळ सरळ ‘रियल लाईफ’ व्हिलन मध्ये गणला जाऊ लागला. लोकांच्या मनात पुनीत यांच्या विषयी प्रचंड राग होता. याच माणसाने अमिताभ सारख्या नटाला मारलं हा आरोप त्यांच्यावर सतत झाला.

....पण नेमकं काय घडलं होतं त्यावेळी ?

एका मुलाखतीत पुनीत यांनी त्यावेळी काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. मनमोहन देसाई हा सीन अशा अँगलमधून शूट करत होते की सीन खरा वाटण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी स्वतः हून पोटात खरोखर ठोसा मारण्याची सूचना केली.

स्रोत

यावेळी चित्रात दिसत असल्या प्रमाणे जो मागे बोर्ड दिसत आहे, त्याला अमिताभ जाऊन धडकले, उसळी मारून  पुढे आले आणि त्याचवेळी पुनीत यांचा ठोसा त्यांच्या पोटात लागला. यावेळी गंभीर असं काही घडलं नाही.  पण दुसऱ्याच दिवशी त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं. पुनीत यांच्या ठोशानं अमिताभ बच्चन यांची आतडी फाटली होते.

या घटनेनंतर पुनीत हे व्हिलन म्हणून कुप्रसिद्ध झाले. त्यांना अमिताभ यांच्याच ‘मर्द’ सिनेमातून काढण्यात आलं, कोणीही त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार नव्हतं, लोक त्यांना धमकीवजा पत्र पाठवायचे.  एवढंच काय,  खुद्द रेखा सुद्धा त्यांच्यावर राग धरून आहेत.

याउलट अमिताभ मात्र पुनीत यांना म्हणाले होते की "तुझी यात काही चूक नाही". यासाठी अमिताभ यांनी विनोद खन्ना यांचा एक प्रसंग सांगितला, ज्यात त्यांनी फेकलेला काचेचा ग्लास विनोद खन्ना यांच्या चेहऱ्याला लागला आणि त्यांना ६-७ टाके पडले होते. एकदा तर स्वतः अमिताभ पुनीत यांना हॉस्पिटलच्या बाहेर सोडण्यास आले जेणेकरून लोकांना दोघांमध्ये वैर नसल्याचं दिसून येईल. पण लोकांनी पुनीत यांची व्हिलनची भूमिका मनातून काढून टाकली नाही. 

पुढे चालून पण त्यांना बी. आर. चोप्रांच्या महाभारतातही दुर्योधनाचीच भूमिका मिळाली. मात्र त्यातून त्यांची इमेज सुधारायला थोडीफार मदत झाली असं म्हणायला हरकत नाही..

एक माणूस कसा कायमचा व्हिलन बनतो त्याचाच हा किस्सा...

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required