computer

त्याने ‘केळं’ वापरून चक्क ८८ हजार रुपये लुटले? कुठे घडलाय हा अतरंगी प्रकार??

शोलेमधला तो सीन आठवतोय का ? जय आणि विरू बंदूक म्हणून लाकडाचा तुकडा वापरतात आणि जेलमधून पळून जातात. हा सीन फक्त सिनेमात शोभतो, कारण प्रत्यक्ष आयुष्यात असं घडणं शक्यच नाही. खोटं!! इंग्लंडमध्ये एका माणसाने तर चक्क एक केळ वापरुन बँक लुटली आहे.

राव मस्करी नाही, खरोखर हे घडलंय.

‘लॉरेन्स जेम्स वाँडरडेल’ या ५० वर्षांच्या माणसाने हा कारनामा केलाय. त्याने इंग्लंडच्या बार्कलेज बँकेच्या एका शाखेत दरोडा घातला होता. राव, हा प्रकार सिनेमाला शोभेल असा आहे. तो कॅशियर जवळ गेला आणि त्याने सांगितलं की त्याच्या हातात जी पिशवी आहे त्यात बंदूक आहे. खरं तर त्यात केळं होतं. आश्चर्य म्हणजे कॅशियरसहित तिथल्या सगळ्यांनाच त्याच्यावर विश्वास बसला. मग काय, चोराने तब्बल १००० पाउंड्स (जवळजवळ ८८ हजार रुपये) एवढी रक्कम लंपास केली.

...पण त्याचा प्लॅन पैसे चोरण्याचा नव्हता. खरी गोष्ट तर पुढे आहे. दरोडा टाकल्यानंतर थोड्याच वेळात लॉरेन्सने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याने सगळी रक्कम पण पोलिसांना दिली. तपासात असं समजलं की तो नुकताच बेघर झाला आहे. त्याला कुठे तरी आसरा पाहिजे होता. म्हणून त्याने मुद्दाम गुन्हा केला जेणेकरून निदान जेलमध्ये तरी राहायला मिळावं !!

त्याची इच्छा पूर्ण झालेली दिसत आहे, कारण कोर्टाने त्याला १४ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावलाय. एकंदरीत एका केळ्याने या सरकारी पाहुण्याची राहण्याची आणि खाण्याची सगळीच सोय केलीय राव.

सबस्क्राईब करा

* indicates required