computer

मिर्झापूर आवडला? आता पंकज त्रिपाठी यांच्याबद्दल या १० गोष्टी जाणून घ्या !!

प्रचंड वाट पाहिल्यानंतर मिर्झापूर-२ सिरीज रिलीज करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे जबरदस्त हिट ठरत ही सिरीज केंद्रस्थानी आली आहे. या सिरीजच्या दोन्ही पार्ट्समध्ये सर्वाधिक भाव कुणी खाल्ला असेल तर तो म्हणजे कालीन भैयाचे काम केलेल्या पंकज त्रिपाठी या कसदार अभिनेत्याने.

पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. त्यांचा मानेचे एक्सप्रेशन्स दाखवणारा एक व्हिडिओदेखील वायरल झाला आहे. नेटकऱ्यांच्या मते पंकज त्रिपाठी यांच्या मानेचा अभिनय हा बॉलिवूड सुपरस्टार्सपेक्षा सरस आहे. पण त्रिपाठी यांचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. बॉलीवूडमध्ये जागा निर्माण करणे म्हणजे संघर्ष आलाच, पण त्यातही पंकज त्रिपाठी यांचा प्रवास अधिक खडतर होता. शेती, स्वयंपाकी, चप्पल विकणे अशी अनेक कामे करून ते इथवर पोहोचले आहेत. आज त्यांच्याबद्दल अशाच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

1) शेती करत असलेल्या पंकज यांना खरंतर डॉक्टर व्हायचे होते. पण दोन वेळा मेडिकल प्रवेशपरिक्षेत नापास झाल्यावर त्यांनी डॉक्टर होण्याचा नाद सोडला आणि ते अभिनयाकडे वळले.

2) पंकज त्रिपाठी यांनी जेलची हवा देखील खाल्ली आहे. कॉलेजला असताना विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना ७ दिवस कारावासात राहावे लागले होते.

3) पंकज त्रिपाठी यांचा प्रेमविवाह झाला आहे. अर्थात प्रेमविवाह व्हावा ही काही नवी गोष्ट नाही. १९९३ ते २००४ असे तब्बल ११ वर्षं हे प्रेमप्रकरण चालले आणि शेवटी दोघांनी लग्नाची गाठ बांधली. या काळात ते स्वयंपाकी म्हणून काम करत होते. पण ही गोष्टही त्यांच्या प्रेमाच्या आड आली नाही.

4) पंकज लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. म्हणजेच त्यांची प्रेयसी कोलकात्यात, तर ते पाटणाला राहत असत. ते मग कोलकाताहुन चप्पल, बूट आणून पाटण्यात विकू लागले. अशा प्रकारे प्रेयसीची भेट देखील होत असे आणि त्यांना दोन पैसे देखील मिळत असत.

5) त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकल्यावर पूर्ण भारत भ्रमण केले होते. भारत समजून घेतल्यामुळे आपल्या अभिनयाला धार आली असे त्यांचे मत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील १२वी झाली की एकदा भारत भ्रमण करावे असा सल्ला ते देतात.

6) स्ट्रगलिंगच्या दिवसात एकदा पंकज त्रिपाठी यांची राम गोपाल वर्मा यांनी ऑडीशन घेतली. ऑडीशनमध्ये पंकज समोर बसले होते, तर राम गोपाल वर्मा त्यांचे निरिक्षण करत होते. वर्मा यांनी पंकज यांना दुसऱ्या दिवशी चार्ल्स शोभराजचा गेटअप करून यायला सांगितले. खिशात दमडी नसूनही एवढा मोठा निर्माता सांगतोय म्हणून त्यांनी ३,५००रुपये खर्च करून भूमिकेसाठीचे कपडे घेतले. दुसऱ्या दिवशी परत वर्मा त्यांचे निरीक्षण करत राहिले. तुम्हाला वाटत असेल, राम गोपाल वर्माने त्यांना काम दिले असेल. पण त्रिपाठी यांची आणि वर्मा यांची नंतर कधीच भेट झाली नाही.

7) पंकज सिनेमांमध्ये काम मिळविण्यासाठी धडपड करत असताना त्यांचे घर बायको मृदुला चालवत होती. मृदुला एका शाळेत शिकवून घरातील सर्व खर्च करत असे तर पंकज सातत्याने ऑडीशन देत असत.

8) आज प्रचंड यशस्वी दिसत असलेल्या पंकज यांनी सुरुवातीला अनेक सिरीयल आणि जाहिराती केल्या आहेत. पहिल्यांदा विकत घेतलेली स्प्लेंडर गाडी ते रात्रभर बघत बसत.

9) पंकज यांचा पहिला सिनेमा म्हणजे रन. यात त्यांचा फक्त एक सीन होता. या प्रसंगात ते बिर्याणी खाणाऱ्या विजय राजला ती चिकन बिर्याणी नसून कौव्वा बिर्याणी आहे असे सांगतात.

10) लक्ष सिनेमावेळी त्यांना एक रोल देण्यात आला होता. त्याने खुश झालेल्या पंकज यांनी ही बातमी स्थानिक पेपरमध्ये देखील दिली. सिनेमा पाहण्यासाठी सर्व परिवाराला ते थेटरमध्ये घेऊन गेले. पण पूर्ण सिनेमात ते कुठेच दिसले नाहीत. त्यांचे पूर्ण पात्र सिनेमातून कट करण्यात आले होते. यावेळी मात्र प्रचंड अपमानित वाटून पंकज यांनी प्रचंड मेहनत घेतली. पुढे काय झाले ते सगळ्यांना माहीत आहे.

पंकज त्रिपाठी सांगतात की माणूस जे काही बनतो तो खूप साऱ्या अपयशांचा प्रवास असतो. पंकज त्रिपाठी यांचा आजचा अभिनय बघितला तर हा सर्व प्रवास हाच त्यांना अभिनयात कस निर्माण करण्यासाठी साधन ठरला असे म्हणावे लागेल.

सबस्क्राईब करा

* indicates required