computer

७ महिन्यात २ इंच उंची वाढवणारी लिंब लेंथनिंग सर्जरी काय आहे भाऊ ?

लोक आपली उंची वाढविण्यासाठी अनेक प्रयोग करतात.  पण हा प्रकार लोक एका विशिष्ट वयापर्यंत करत असतात. त्यानंतर जास्त प्रयत्न सहसा कोणी करत नाही. अधूनमधून वयाच्या एका टप्प्यानंतर देखील उंची वाढविता येते अशा थेअरीज येत असतात. पण त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे.

पण अमेरिकेतील टेक्सास येथे राहणाऱ्या अल्फान्सो फ्लोरेस यांच्याबद्दल मात्र नाद केला पण वाया नाही गेला असे म्हणावे लागेल. २८ वर्षीय अल्फान्सोने वेगळे पाऊल टाकत कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग स्विकारला.

अल्फान्सो लहानपणापासून उंच व्हायची हौस बाळगून होता. ५ फूट ११ इंच असलेला अल्फान्सोची मायकल जॅक्सन, कोबे ब्रायन्त यांच्याप्रमाणे ६ फूट उंची हवी अशी इच्छा होती. शेवटी इच्छा तेथे मार्ग या म्हणीप्रमाणे त्याने मार्ग शोधूनच काढला.

अल्फान्सो फ्लोरेसची उंची आधी ५ फूट ११ इंच होती. आता त्यांनी लिंब लेंथनिंग म्हणजेच पाय लांबवण्याची सर्जरी करवून दोन इंच उंची वाढवून घेतली. ही सर्जरी यशस्वी झाली आहे. जेवढी उंची आहे त्यात सुखी राहावे आणि सर्जरी करू नये असा सल्ला त्याला दिला गेला होता. पण त्याने तो ऐकला नाही.

अल्फान्सो फ्लोरेसची ही सर्जरी लास वेगास येथील लिंबप्लान्ट एक्स इन्स्टिट्यूटचे डॉक्टर केविन देवीप्रसाद यांनी केली आहे. या ऑपरेशनचा खर्च जवळपास ५५ लाख रुपये एवढा आला आहे. याहून अधिक उंची वाढवायची असेल तर अजून जास्त खर्च करावा लागेल.  सर्जरी होऊन आता जवळपास ७ महिने होऊन गेले आहेत आणि त्याला आता लांब पायांची सवयदेखील झाली आहे.

लिंब लेंथनिंग सर्जरीमध्ये फिमर म्हणजे मांडीचे हाड काढून टीबीया म्हणजेच खालच्या पायाच्या हाडात बसवले जाते. यात पायात ५ ते ६ चिरा केल्या जातात. यामुळे हाडाच्या पोकळ भागापर्यंत पोहोचता येते. या प्रक्रियेनंतर व्यक्तीची उंची वाढत असते. असे करून ही हाईट ७ इंचापर्यंत वाढवता येऊ शकते. 

तर वाचकहो, ह्या पद्धतीने उंची वाढवता येऊ शकते. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली?

सबस्क्राईब करा

* indicates required