व्हिडीओ ऑफ दि डे: धरमशालामध्ये हा लहानगा मोठ्यांची शाळा का घेतोय? व्हिडीओ पाहून घ्या!!

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलेली असली तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. यासाठी पूर्णपणे काळजी घेऊनच राहावे असे सगळेच सांगत आहेत. तरीदेखील लोकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. मनाली, मसुरी, नैनिताल या ठिकाणी झालेल्या गर्दीचे फोटो तुम्ही बघितले असतील.

एकाने उपहासात्मक पद्धतीने लिहिले की, "आधी बेड मिळत नव्हते, आता हॉटेलमध्ये रूम मिळत नाहीत". पण या सर्व बेजबाबदार वर्तनाची कल्पना इतर कुणाला नसली तरी एका लहान मुलाला आहे. धरमशाला येथील एक व्हिडिओ कालपासून वायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ८ ते १० वर्षांचा एक लहान मुलगा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना काठी दाखवून मास्क घाला म्हणून सांगत आहे. ज्यांनी मास्क घातला नाही त्यांना तुमचा मास्क कुठे आहे असा प्रश्न तो विचाराताना दिसतो.

आता हा व्हिडीओ वायरल झाल्यावर लोकांनी त्या लहानग्याचे कौतुक तर केलेच आहे, पण बेजबाबदार वर्तन करणाऱ्या लोकांचे कान पण पकडले आहेत. तिसरी लाट थोपवायला कोणी दुसरे येणार नसून ती आपल्यालाच थोपवावी लागेल हे स्पष्ट असताना हे बेजबाबदार वागणे तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरू शकते. आतातरी हा लहान मुलाचा व्हिडीओ बघून लोकांमध्ये जागृती होईल अशी आशा आपण करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required