बरीच अपयशं, नर्वस ब्रेकडाऊन आणि ३०० हून अधिकवेळा नाकारला गेलेला मिकी माऊस पचवून उभा राहिलेला ॲनिमेशनचा जादूगार-वाॅल्ट डिस्ने!!
त्याचे वडील अत्यंत रागीट आणि दबंग स्वभावाचे होते. त्याचा कार्टून काढण्याचा व्यवसाय इतका अयशस्वी झाला की डोक्यावर बॅंकेचं कर्ज चढलं. त्याच्या "ओस्वाल्ड द रॅबिट" या कार्टूनची कल्पना एका स्टुडिओने चक्क चोरली आणि ह्याला धक्क्याला लावलं. त्याने अभिनय क्षेत्रात जायचं ठरवलं, पण तिथे देखील त्याला अपयश आलं. बॅंकेकडून कर्ज घेऊन काही करावं तर बँकर्सनी त्याच्या प्रसिद्ध माऊसची संकल्पना ३०० हून अधिकवेळा नाकारली. माऊस म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की ही कहाणी कुणाची आहे.
वाॅल्ट डिस्ने. एक प्रचंड क्रिएटिव्ह माणूस. याने २०व्या शतकातील थोर ॲनिमेटर, फिल्ममेकर आणि थीम पार्क डेव्हलपर म्हणून नांव कमावले. खरं सांगायचं तर वाॅल्ट डिस्ने यांनी मनोरंजनाची व्याख्याच बदलली.
यश हे नेहमी हिमनगाच्या टोकासारखं असतं. आपल्याला दिसतं ते यशाचं टोक असतं, लपून रहातात त्या असतात हाल अपेष्टा, वेदना, अपमान आणि अपयशाच्या गाथा. इतकं यश रातोरात मिळणं शक्य नाही. वाॅल्ट डिस्नेच्या पार्श्वभूमीमध्ये थोडं खोलात गेलं की त्याच्या यशाचा मार्ग व्यावसायिक अपयश आणि अडथळ्यांच्या काट्यांनी भरलेला होता हे लक्षात येतं.
१९०१ मध्ये शिकागो येथे जन्मलेला आणि मिसूरी येथे वाढलेला वाॅल्ट डिस्ने हा पाच भावंडांपैकी चौथा मुलगा होता. त्याचे वडील इलियास हे प्रचंड रागीट आणि दबंग स्वभावाचे होते. तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं शक्य नसल्याने ते आपला सगळा राग मुलांवर काढत आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देत. अशा तणावपूर्ण वातावरणातून सुटण्यासाठी आणि चार क्षण विरंगुळा म्हणून छोटा वाॅल्ट चित्रं काढत असे. वडिलांच्या जाचाला कंटाळून त्याची मोठी भावंडं एकेक करत घर सोडून जाऊ लागली आणि लवकरच तो देखील पहिल्या महायुद्धात ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर होण्यासाठी आपलं खरं वय लपवून दाखल झाला. अनेक वर्षांनंतर जेव्हां त्याचे वडील मरण पावले, तेव्हा डिस्ने कामात इतका व्यस्त होता की काम सोडून जाण्यास त्याने नकार दिला. परिणामी त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी तो हजर राहू शकला नाही.
पहिलं महायुद्ध संपलं. डिस्ने युद्धावरून परतला आणि कॅन्सास शहरातल्या एका व्यावसायिक आर्ट स्टुडिओमध्ये शिकाऊ चित्रकाराची नोकरी करू लागला. त्याचं मन मात्र नोकरीत रमत नव्हतं. त्याला स्वतःचा काही व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती. पण काय आणि कसं करता येईल याबाबत त्याच्या मनांत साशंकता होती. शेवटी एक दिवस त्याने आणि त्याचा मोठा भाऊ रॉय यांनी १९२० मध्ये लाफ-ओ-ग्राम स्टुडिओ हा स्वतःचा कार्टून व्यवसाय सुरू केला. काही वर्ष धंदा बरा चालला होता, परंतु काही वर्षांनी कंपनी दिवाळखोर झाली.
पहिल्या व्यवसायात अपयश आल्यानंतर, वॉल्ट डिस्नेने सरळ बॅगा भरल्या आणि खिशात फक्त ४० डॉलर्स असताना अभिनयात नशीब आजमावण्यासाठी लॉस एंजेलिसला येऊन पोहोचला. पण त्यातही अपयशाने त्याची पाठ सोडली नाही. एक दिवस अचानक अंधारात वीज चमकावी, तशी त्याच्या मनांत एक कल्पना चमकून गेली. त्याच्या लक्षात आलं की कॅलिफोर्नियामध्ये कोणताही ॲनिमेशन स्टुडिओ नाही. आपणंच एखादा ॲनिमेशन स्टुडिओ सुरू केला तर? वॉल्टने आपल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या भावाला, म्हणजेच राॅयला गळ घातली आणि स्वतःचा ॲनिमेशन स्टुडिओ सुरू केला. काही काळानंतर डिस्नेला ओसवाल्ड द लकी रॅबिटच्या निर्मितीमुळे त्याचे पहिले मोठे यश मिळाले.
ओस्वाल्ड हे स्वतःचं असं व्यक्तिमत्व असणारं पहिलंच कार्टून. स्वत: डिस्ने याने सांगितल्याप्रमाणे "आम्ही ओस्वाल्डला तरुण, आकर्षक, सतर्क, आणि साहसी बनवण्याचे ध्येय ठेवणार आहोत, त्याला नीटनेटकं बनवणार आहोत." ओस्वाल्डला डिस्नेने मानवी स्वरूपात सादर केले आणि व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं. या ॲनिमेशनमध्ये कार्टून पात्रांची व्याख्या केवळ त्यांच्या रचनेद्वारे न करता त्यांच्या हालचाली, वागण्याच्या पद्धती आणि अभिनयाद्वारे व्यक्ती म्हणून करण्यात आली होती. याच काळात डिस्ने म्हणाला होता की, "मी निर्माण केलेली पात्रे कोणीतरी विशिष्ट असावीत अशी माझी इच्छा आहे. त्यांनी फक्त एक रेखाचित्र बनावे असे मला वाटत नाही." डिस्नेने शारीरिक विनोद, तसंच परिस्थितीजन्य विनोद सादर केला आणि व्यंगचित्रात निराशाजनक विनोद उत्तम प्रकारे दाखवला.
डिस्नेसाठी ओस्वाल्ड हे पात्र खूपचं भाग्यवान ठरले. वन-रील ॲनिमेशनमध्ये तर ते एक मोठा स्टार बनले होते, परंतु काय नशीब आहे पहा, डिस्नेला त्याच्या नशिबाने इथे पण दगा दिला. त्याच्या करारात वाढ करण्यासाठी तो न्यूयॉर्कला जात असताना त्याला समजले की त्याच्या निर्मात्याने त्याची अॅनिमेटर्सची टीम ताब्यात घेतली आहे आणि त्याच्याकडे ओसवाल्ड द लकी रॅबिटचे कोणतेही कायदेशीर अधिकार उरलेले नाहीत.
झालेला तोटा भरून काढण्यासाठी एखादा निर्मात्याशी भांडला असता. पण डिस्नेच्या मृदु स्वभावामुळे तसं काही घडलं नाही. उलट त्याने जिद्दीने पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियाला परत येत असतानाच त्याच्या डोक्यात मिकी माऊस तयार झाला होता.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि कर्जबाजारी झाल्यानंतर, डिस्नेने १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात मिकी माऊसला चित्रपटाद्वारे जिवंत केले आणि त्याच्या व्यवसायात यशस्वी होण्याच्या मार्गावर पाऊल ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बँकर्सनी त्याच्या प्रसिद्ध माऊसची संकल्पना ३०० पेक्षा जास्त वेळा नाकारली होती. मिकी माऊसच्या यशानंतरही डिस्नेला त्याचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आव्हानांचा सामना करावा लागला. केवळ तो सतत काम करत होता म्हणून नव्हे, तर व्यवसायाबरोबर येणाऱ्या इतर कटकटींमुळे डिस्नेला नर्व्हस ब्रेकडाउन झाला.
तणावमुक्त होण्यासाठी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर डिस्नेला एक धाडसी कल्पना सुचली; पूर्ण-लांबीचा ॲनिमेशन चित्रपट. १९३७ मध्ये त्याने "स्नो व्हाईट आणि सेव्हन ड्वार्फ्स" हा चित्रपट काढला आणि तो सुपर हिट झाला. तरीही त्यानंतर आलेले १९४० मधील "पिनोचियो", त्याच वर्षातील "फॅन्टासिया" आणि १९४२ मधील "बांबी" हे तितकेसे चालले नाहीत.
डिस्नेची लढाई अजून संपलेली नव्हती. दुसरे महायुद्ध सुरू असताना त्याचे ॲनिमेटर्स संपावर गेले आणि त्याचे कर्ज ४ दशलक्ष डॉलर्सच्या वर गेले. या काळात डिस्नेने मोठ्या पडद्यावरच त्याचे चित्रपट प्रदर्शित करावेत यासाठी फिल्म स्टुडिओने टाकलेल्या दबावाला न जुमानता टेलिव्हिजनकडे वळून आपल्या व्यवसायात वैविध्य आणण्यास सुरुवात केली.
डिस्ने त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ड्रीम प्रोजेक्ट उभारण्यासाठी सज्ज झाला होता- डिस्नेलँड.
१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्निया येथे पहिले डिस्नेलँड उघडले. डिस्नेच्या बर्याच उपक्रमांप्रमाणे याची सुरुवात देखील अडखळत झाली. बनावट तिकिटांमुळे अपेक्षेपेक्षा जास्त लोक येत होते. त्यामुळे सात मैल लांब रांगा लागल्या होत्या. तापमान वाढल्याने महिलांच्या उंच टाचांचे बूट रस्त्यावरील डांबरामध्ये रूतत होते, प्लंबरच्या संपामुळे पिण्याच्या पाण्याचे फाऊंटन निकामी झाले होते आणि काही राइड्स खराब झाल्या होत्या. समीक्षकांनी डिस्नेलँडच्या उद्घाटनाला "ब्लॅक संडे" म्हटले.
परंतु नेहमीप्रमाणेच डिस्नेचे अथक परिश्रम आणि चिकाटीमुळे डिस्नेलँडने प्रचंड यश मिळवले आणि त्याची सगळ्या कर्जातून मुक्तता केली.
अपयशाच्या फायद्यांबद्दल भाष्य करताना डिस्ने एकदा म्हणाला, "माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व संकटांनी, सर्व अडचणी आणि अडथळ्यांनी मला बळ दिले आहे. आणि माझ्या यशाचं श्रेय मी माझ्या अपयशाला देईन".




