computer

दिल्लीच्या तख्तावर राज्य करणारी एकमेव स्त्री आणि एक पराक्रमी वीरांगणा: रझिया सुलतान!

स्त्रियांना सहसा सुलताना म्हटलं जातं. पण रझिया स्वत:ला सुलतान म्हणून घेत असे. गुणसंपन्न, पण फ्रक्त स्त्री असल्याने आपल्याच सरदारांकडून नाकारल्या गेलेल्या आणि राजसत्तेसाठी संघर्ष केलेल्या रझिया सुलतानची ही कहाणी!!

आज मुलगा आणि मुलगी दोघांनाही वडिलांच्या संपत्तीत समान वाटा दिला जात असला तरी, मुलीची सासरी बोळवण करताना तिला हुंडा दिला जातो आणि याबदल्यात तिच्याकडून संपत्तीवरील हक्काचे सोडपत्र लिहून घेतले जाते. अनेक मुली आजही संपत्तीतील आपला वाटा उघडपणे मागू शकत नाहीत किंवा त्यांना त्यांचा वाटा देणे अनिवार्य आहे असेही समजले जात नाही. एकविसाव्या शतकात जर अजूनही मुलींना आपले वारस म्हणून स्वीकारले जात नसेल तर, तेराव्या शतकात काय अवस्था असेल जरा विचार करा. त्याकाळी तर मुलींना समाजात किती दुय्यम स्थान असेल? हो ना? पण अशाही सामाजिक परिस्थितीत एका पित्याने आपल्यानंतर आपल्या राज्याचा कारभार आपली मुलगीच सांभाळेल असा विचार करून तिच्याकडे राज्याची सूत्रे सुपूर्द केली होती. ही गोष्ट जगाच्या कुठल्यातर दूरच्या कोपऱ्यात नाही, तर आपल्या भारतात आणि तीही दिल्लीत घडलेली आहे.

१३व्या शतकात दिल्लीवर कुतुबुद्दीन ऐबकाचे राज्य होते. कुतुबुद्दीन ऐबकने ११९०च्या दरम्यान इल्तुमिश नावाचा एक गुलाम विकत घेतला होता. इल्तुमिश गुलाम म्हणून दिल्लीत आला असला तरी आपल्या कर्तृत्वाने ऐबकच्या राज्यात त्याने एवढी मोठी झेप घेतली की त्याला संपूर्ण प्रदेशाचा राज्यपाल बनवण्यात आले. कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये माजलेल्या बंडाळीचा फायदा घेत इल्तुमिशने स्वतःलाच दिल्लीचा राजा घोषित केले. अशा प्रकारे एक गुलाम दिल्लीचा सुलतान बनला. राजा इल्तुमिशला दोन मुले आणि एक मुलगी अशी एकूण तीन अपत्ये होती. इल्तुमिश यांनी मुलगा मुलगी भेद न करता तिघांनाही समान शिक्षण दिले. आपल्या तिन्ही मुलांचा विचार करता त्यांना आपल्या पश्चात आपली मुलगीच राज्याचा कारभार समर्थपणे चालवू शकते असा विश्वास वाटल्याने तिलाच आपला वारस घोषित केले. पितृसत्ता आणि पुरुषप्रधान संस्कृतीला इल्तुमिश राजाचा हा निर्णय पचनी पडणे कदापीही शक्य नव्हते. राजानंतर गादीवर बसण्याचा अधिकार मिळालेल्या या मुलीला निव्वळ पुरुषप्रधानतेचा रोष म्हणून आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागले. आपले हक्क मिळवण्यासाठी या मुलीला आपल्याच भावांशी लढावे लागले. आपल्या हक्कासाठी तिने लढाही दिला आणि आपले ध्येयही साध्य केले. ही कथा आहे, भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची मुस्लीम महिला शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रझिया सुलतानची!

वडील इल्तुमिश यांनी आपल्या कर्तृत्वाने मिळवलेल्या राजगादीचा रझियाला खूप अभिमान होता. उदारमतवादी विचारांच्या इल्तुमिश यांनी रझियाला इतर मुलींप्रमाणे बंधनात वाढवले नाही. उलट तिला औपचारिक आणि राजकीय शिक्षण देऊन राज्यकारभार चालवण्यायोग्य बनवले. रझियाचे बालपण जास्तीत जास्त तिच्या वडिलांच्या सहवासातच गेले. त्यामुळे इतर महिलांप्रमाणे ती लाजरी-बुजरी, पडदा ओढणारी अशी नाजूक कळी बनली नाही. तलवारबाजी, घोडेस्वारी, राजकीय कामकाजात वडिलांना सल्ला देणारी अशी रझिया बेधडक स्वभावाची होती. तिने कधीच बुरखा घालून आपला चेहरा लपवला नाही. उलट राजदरबारात वावरतानाही ती चेहरा खुला ठेवून वावरत असे. तिची वेशभूषाही स्त्रियांप्रमाणे नव्हती. तिचे हे वागणे दरबारातील सरदारांना अजिबात पसंत नव्हते.

३० एप्रिल १२३६ रोजी शमशुद्दीन इल्तुमिश यांचे निधन झाले. आपल्या सर्व मुलांमध्ये राजगादीची उत्तराधिकारी म्हणून रझियाच योग्य असल्याचा त्यांना विश्वास होता. म्हणून त्यांनी आपल्या मरणापूर्वीच तिला आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. तरीही सत्तासोपान चढण्याचा राझियाचा मार्ग तितकासा सुकर अजिबात नव्हता. एका महिलेने आपल्यावर हुकुमत गाजवावी हे सरदारांना अजिबात मान्य नव्हते. राजाची इच्छा काहीही असली तरी त्यांना एक पुरूष हुकुमशहाच हवा होता. म्हणून त्या सर्वांनी मिळून रझियाला एकटे पडले आणि तिच्या जागी तिचा भाऊ रुक्नुद्दिन फिरुझ याला सुलतान बनवले.

एक सत्ताधीश म्हणून रक्नुद्दिन पुरता अपयशी ठरला होता. त्याच्याऐवजी त्याची विधवा आई शाह तुरकानच राज्याचे सगळा कारभार पाहत असे. तो फक्त नावाचा सुलतान होता. सुलतानपदाचा उपभोग घेण्यात मश्गुल असलेल्या या राजाला राज्यव्यवहार कशाशी खातात हेही माहीत नव्हते. सहा महिन्यांतच दरबारातील काही सरदारांनी त्याचा आणि त्याच्या आईचा काटा काढला.

त्यानंतर प्रचंड संघर्ष करून १० नोव्हेंबर १२३६ रोजी रझियाने जलालुद्दीन रझिया या नावाने, राजकारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. ती स्त्रियांप्रमाणे पेहराव न करता पुरुषी पेहराव करून राजदरबारात येत असे. ती स्वत:ला सुलताना हे स्त्रीलिंगी विशेषण न लावता सुलतान हे पुल्लिंगी विशेषण लावून घेणे पसंत करत असे. कारण सुलताना हे बिरूद सुलतानच्या पत्नीला किंवा रखेलीला लावले जाते. ती कुठल्या सुलतानची पत्नी नव्हती, तर स्वतः त्या राज्याची सत्ताधीश होती म्हणजेच ती सुलतान होती आणि तिला त्याच नावाने उल्लेख करून घेणे आवडत असे. तिचा हा थाट तिच्या सरदारांना अजिबात मानवत नव्हता.

राझियाने आपल्या नावाची नाणी देखील पडली होती. त्यावर “शमशुद्दीन अल्तुमिश यांची मुलगी, महिलांचा आधारस्तंभ, काळाची राणी सुलतान रझिया’, अशी अक्षरे कोरली होती.

तिने लहानपणापासून राजकारभार चालवण्याचे शिक्षण घेतले होते. वडिलांसोबत अधिकाधिक काळ घालवला असल्याने तो अनुभव आता तिला उपयोगी पडत होता. ती स्वतः युद्धभूमीत उतरून आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होती. नवनवे प्रदेश पादाक्रांत करत होती. एक प्रशासक म्हणूनही ती अतिशय उत्कृष्टरित्या कारभार हाताळत असे. तिच्या आधी दिल्लीवर ज्यांनी ज्यांनी राज्य केले त्या सर्व राजांच्या तुलनेत रझिया सुलतान कांकणभर सरस असल्याचेच दिसत होते.

रझिया सुलतानने आपल्या राज्यात अनेक नव्या शाळा बांधल्या, वाचनालये उभारली. या शाळात कुराण शिकवण्यासोबतच इतर विषयांचे ज्ञान देण्यावरही भर दिला जात असे. कुठल्या तरी एकाच धर्माचे शिक्षण देण्याचा तिने कधीच आग्रह केला नाही. विज्ञान, साहित्य यांसोबतच विविध संस्कृतींचा अभ्यास या शाळातून केला जाईल याकडे तिने कटाक्षाने लक्ष दिले.

तुर्किश सरदारांचा मात्र रझियाला कायमच विरोध होता. एका स्त्रीने आपले नेतृत्व करणे म्हणजे आपला घोर अपमान आहे असा त्यांचा समज होता. मलिक इख्तीयारुद्दिन ऐतीगीन नावाच्या एका सरदाराना रझियाविरुद्ध कारस्थान रचले. रझिया आणि तिचा एक गुलाम याकूत यांची घनिष्ठ मैत्री होती. याकूतने रझियाला अल्तुनिया विरुद्धच्या लढाईत मदत केली होती आणि याच लढाईत तो मारला गेला होता. याकूत आणि राझीयाचे प्रेमसंबंध आहेत अशी आवई उठवून तिची बदनामी करण्यात आली.

आश्चर्य म्हणजे राझियाचा बालमित्र इख्तीयारुद्दिन अल्तुनिया यानेच तिच्या विरोधात बंड पुकारले. दोघांत युद्धाची ठिणगी पडली. पण रझियाचा त्याच्यासमोर निभाव लागला नाही आणि त्याने तिला राजकीय बंदी बनवले. अर्थात या बंदिवसाच्या काळातही रझियाची एखाद्या राणीप्रमाणेच काळजी घेण्यात आली. अल्तुनिया तिचा बालमित्र होता आणि प्रियकर देखील. काही काळानंतर राझियाने त्याच्या विवाहाच्या प्रस्तावाला होकार दिला. तिने हे दबावाखाली केले की खरेच ती त्याच्या प्रेमात होती, याचा कोणताच पुरवा नाही. रझियाला बंदी बनवल्या नंतर तिचा लहान भाऊ मौजुद्दिन बहराम शाह याने दिल्लीच्या तख्तावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

रझियाने आपला नवरा अल्तुनियाच्या मदतीने आपल्या भावाकडून आपले राज्य परत मिळवण्यासाठी त्याच्याशी युद्ध करण्याची तयारी केली. पण या युद्धात त्यांचा पराभव झाला. दोघांनी दिल्लीला जाण्याचे नियोजन केले. पण वाटेतच काही लुटारू टोळ्यांनी त्यांना लुबाडून त्यांची हत्या केली. इतिहास तज्ञांच्या मते तिच्या भावानेच लुटीचा बहाणा करून तिला मारून टाकले. ऑक्टोबर १२४० मध्ये तिचा मृत्यू झाला.

मुलेच वंशाचा दिवा असतात, तीच घराण्याचे नाव उज्वल करतात. मुली म्हणजे परक्याचे धन अशा संकुचित विचारांच्या लोकांना रझियाचे हे चरित्र नक्कीच विचार परिवर्तन करण्यची प्रेरणा देईल. भारतातील पहिली आणि शेवटची मुस्लीम महिला शासक अशा संकुचित चौकटीत तिला बंदिस्त करण्यापेक्षा एक धर्मनिरपेक्ष, प्रजाहितदक्ष आणि शूर शासक म्हणून तिचा गौरव करणे जास्त उचित ठरेल.

मेघश्री श्रेष्ठी

-------------------------

आजच्या काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. पण प्राचीन काळी संस्कृतीच्या जोखडात बांधले गेले असतानाही त्यांनी आपलं वेगळेपण जपलं होतं. जगभरातील संस्कृतीत स्त्रियांना “सेकंड सेक्स” म्हणून हिणवण्यात आलं, दुय्यम स्थान देऊन त्यांना नाकारण्यात आलं असलं तरी देशोदेशींच्या पुराणकथांमध्येही लढवय्या आणि जाँबाज स्त्रियांची वर्णनेही आढळतात. या सर्व रणरागिणींनी पुरुषी वर्चस्वाला दुर्लक्षित करून आपली छाप निर्माण केली.  या मालिकेत आपण अशाच काही रणरागिणींच्या कथा घेऊन आलो आहोत.  

अतुलनीय योद्धा आणि जन्म-मृत्यूच्या पलिकडे गेलेली आयरिश देवता-स्काहा!!

एका दमात सात शीर छाटणारी, २००० सैनिकांविरुद्ध ३०० सामुराईंसोबत युद्ध जिंकणारी तोमयो गोझेन!!

देशभक्ती आणि पराक्रमांमुळे अवघ्या १९व्या वर्षी जिवंत जाळली गेलेली आणि मरणोत्तर संतपद बहाल झालेली- जोन ऑफ आर्क!!

बलाढ्य रोमन सत्तेची गुलामी झुगारून युरोप ते इजिप्तपर्यंत साम्राज्यविस्तार करणारी राणी झिनोबिया!

लवकरच भेटूया या मालिकेतल्या इतर रणरागिणींना. 

 

सबस्क्राईब करा

* indicates required