computer

डोहाळेजेवण साजरे करण्याच्या ५ वेगवेगळ्या पद्धती

गर्भारपण म्हणजे एक उत्सवच. त्यातही डोहाळेजेवण साजरं करायचं म्हटलं की मैत्रिणी, आई-मावशा आणि सगळ्या काकूलोकांच्या उत्साहाला पूर येतो. हा प्रसंग साजरा करण्याच्या विविध पद्धती घेऊन आम्ही आज आलो आहोत. तुमच्याकडेही काही अशा हटके आयडियाज असतील तर त्याही आमच्यासोबत शेअर कराच. 

१. चांदण्यातलं डोहाळजेवण

टिपूर चांदणं,  एखाद्या गच्चीत रातराणीचा येणारा मंद सुगंध, नाजूक जुईच्या किंवा मोगर्‍याच्या शुभ्र दागिन्यांनी मढलेली भावी आई आणि न राहवून आपणही मोगर्‍याचे दगिने ल्यायलेल्या सख्या,  थंडगार आईस्क्रीम अन घरी केलेली हेल्दी चटपटीत भेळ!! 

अशा वेळेस हास्यविनोदाला पूर येऊन रात्र कधी संपेल हे कळायचंही नाही. 

२. दिव्यांचं डोहाळेजेवण

दिवे फक्त दिवाळीतच लावावे असा काही नियम नाही. उन्हाळ्यात तितकंसं सयुक्तिक नाही वाटणार, पण माघाच्या थंडीत असं डोहाळजेवण सर्वांनाच आवडेल. वीजेचे कृत्रिम दिवे मालवून घरभर मंद तेवणार्‍या पणत्या अन समया आणि हलकासा  येणारा अत्तराचा मंद सुवास मन प्रफुल्लित केल्याशिवाय राहणार नाही. होणार्‍या आईचं आणि त्यानिमित्ताने सर्व बाळगोपाळांचं म्हणजेच उद्याच्या दिव्यांचं औक्षणही व्हायलाच हवं.

३. स्पा आणि डोहाळेजेवण

थांबा, थांबा. स्पा मध्ये जाऊन जेवण करण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला नक्कीच देत नाही आहोत. पण कल्पना करा, अगदी जवळच्या मैत्रिणी , बहिणी आणि आई-मावशी-काकू असा छोट्याशा ग्रुपचा एकत्र स्पा प्रोग्रॅम करायला काय हरकत आहे. मस्तपैकी मसाज होऊन सुस्तावलेल्या शरीरांना एखाद्या छानपैकी रेस्तरांमध्ये  मेजवानी दिलीत तर असा दिवस खासा आठवणीत राहिल.  

फ्रेंडसमधल्या  चॅंडलरला जशी टब बाथ घेण्याची चटक लागली, तसंही इथेही होऊ  शकतं बरं..

४. समुद्रकिनार्‍यावरचं डोहाळेजेवण

मोठेपण विसरून केलेले वाळूचे किल्ले, समुद्राची गाज, पायांना गुदगुल्या करणारी मऊशार वाळू आणि अस्ताला चाललेला तो दिनकर... कल्पनाच किती भारी आहे.  सोबतीला सागरातला मेवा किंवा नेहमीचे यशस्वी चाट आयटम्स!! आयडिया फिट है बॉस!!

 

 

५. पारंपारिक डोहाळजेवण

नवीन पद्धती आल्या म्हणून भरजरी रेशमी साड्या नेसून ’कुणीतरी येणार येणार गं’ म्हणत हा प्रसंग साजरा करण्याची पद्धत मागे पडणार आहे थोडीच!!

डोहाळेजेवण कोणत्याही पद्धतीने करा. पण त्यात मैत्रिणी आणि सगेसोयरे असल्याशिवाय मजा नाही. गाण्याच्या भेंड्या, एकमेकांच्या नकला, हास्यविनोद हे सारे तर अशा सोहळ्यांचा आत्मा आहेत.  तुमच्याकडेही डोहाळॆजेवण साजरे करण्याचे अशा काही भन्नाट आयडियाज  असतील तर नक्की शेअर करा.