computer

कौन बनेगा करोडपतीचे विजेते आज काय करत आहेत?

कौन बनेगा करोडपतीने भल्याभल्यांना वेड लावले. त्यावर क्विझ गेम्सही निघाले.  अजूनही पुढचा सीझन जाहीर झाला की आपलं नशीब साथ देईल म्हणून लोक ’कौन बनेगा..’ला फोन करत राहतात. अगदीच काही नाही तर किमान अमिताभ बच्चनना जवळून पाहता येईल हा देखील हेतू असतोच. जाता-जाता काही पैसे मिळाले तर सोन्याहून पिवळंच, नाही का? तसंही या खेळात आपल्या जवळचं काही गमावण्यासारखं नसतं. मग  हा  गेम इतका पॉप्युलर झाला नसता तर आश्चर्यच वाटले असते!! 

’कौन बनेगा.."चे आजवर ८ सीझन्स झाले आहेत. पाहूयात आजवर हा खेळ कोण जिंकलं आणि आजच्या घडीला ते विजेते काय करत आहेत ते.. 

१. हर्षवर्धन नवाथे

हर्षवर्धन त्या वेळेस स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. करोडपती जिंकल्यानंतर स्पर्धा परीक्षा मागे पडल्या , पण तेव्हाच्या यशाची धुंदी त्यानी भरपूर अनुभवली. नंतर मात्र त्यांनी ती करोडपतीची रक्कम पुढल्या शिक्षणासाठी वापरली आणि युनायटेड किंगडममधून एम.बी.ए. ची डिग्री घेतली.

सध्या ते मुंबईला महिंद्रा कंपनीत  नोकरी करत आहेत. त्यांचं लग्न होऊन त्यांना दोन मुलंदेखील आहेत. आजही कुठे गेलं की लोक त्यांना करोडपती विजेते म्हणून ओळखतात.

रवि मोहन सैनी

'कौन बनेगा करोडपती' स्पर्धा जिंकली तेव्हा रवी  दहावीत होता. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी इतकी रक्कम जिंकूनही रवीने आपलं ध्येय जपलं आणि आज ते एक IPS ऑफिसर आहेत.

3. राहत तस्लीम

कौन बनेगा मध्ये येण्यापूर्वी राहत ही झारखंडमधल्या एका कर्मठ मुस्लिम घरातली मुलगी होती. तिला मेडिकलला जायचं होतं पण घरच्यांनी तिचं लग्न करून दिलं. लग्नानंतर भारतीय मुलींचं काय होतं आपल्याला माहीत आहेच. अभ्यासाची आवड असलेल्या राहतला 'कौन बनेगा...' साठी अभ्यास करणं खूप आवडलं. बक्षिसाच्या रकमेतून तिनं आपल्या मुलांच्या शिक्षणाची तरतूद केली आणि स्वत:साठी झारखंडामधल्या तिच्या गावात एक कपड्यांचं शोरूम उघडलंय. अर्थात तेही तिच्या घरच्यांना आवडलं नव्हतंच.

तिला बक्षीस म्हणून मिळालेल्या एक करोड रुपयांपेक्षा तिला या स्पर्धेदरम्यान मिळालेला आत्मविश्वास तिला जास्त महत्वाचा वाटतो. भारतीयांची मुलींना नेहमी दबावाखाली ठेवण्याची मानसिकता किमान अशा उदाहरणामुळे बदलेल अशी आशा करूयात.

4. सुशील कुमार

 

बिहारमधल्या एका गरीब कुटुंबातल्या सुशील कुमारने 'कौन बनेगा...'च्या पाचव्या सीझनमध्ये५5 करोड रुपये जिंकले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता. त्यांना ही रक्कम बरेच दिवस मिळाली नाही अशा बातम्याही तेव्हा गाजल्या होत्या. त्यांनी या रकमेचं नक्की काय केलं हे कुणालाच कधी सांगितलं नाही, पण इतक्या मोठ्या रकमेनं त्यांचं आयुष्य बदललं हे नक्की.

5. सनमीत कौर

*

सनमीत कौर ही ' कौन बनेगा ....'च्या सहाव्या सीझनची विजेती. तिची गोष्टही थोडीशी राहत तस्लीमसारखीच आहे. सनमीतकडे फॅशन डिझाईनची डिग्री असूनही तिच्या सासरच्यांना तिचं नोकरी करणं पसंत नव्हतं, तेही मुंबईत असून. मुली या अजब रसायनाने बनलेल्या असतात. जेव्हा त्या काही करायचं ठरवतात, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतात. सनमीतनेही हेच केलं आणि आधी टिफिन सर्व्हिस अन नंतर घरी मुलांचे क्लासेस घेणं चालू केलं. या क्लासेसमुळेच तिचा जनरल नॉलेजचा इतका अभ्यास झाला की ती पाच करोड जिंकणारी पहिली स्त्री ठरली.

या पाच करोडमधून तिनं मुंबईत स्वतःचं घर घेतलं आणि  मैत्रिणीसोबत 'फिर देसी फॅशन' नावाचं एक ब्युटिकही चालू केलं. आता ती फॅशन ब्युटिकमध्ये नाहीय पण ती एक यशस्वी उद्योजक आहे. गंमत म्हणजे तिच्या जुन्या विचारांच्या सासरच्या लोकांनाही आता तिचा अभिमान वाटतोय. 

 

6. ताज मोहम्मद रंगरेज़

 

 'कौन बनेगा ...'च्या सातव्या सीझनमध्ये एक करोड मिळवणारे ताज मोहम्मद पहिलेच विजेते होते. खरंतर त्यांना कंप्युटरही वापरता येत नव्हता पण प्रयत्नाने ते ही शिकून ते फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट राउंड जिंकले. त्यांना पाच करोड जिंकायची संधीही होती पण त्यांनी रिस्क न घेण्याचं ठरवलं. पेशाने शिक्षक असलेल्या ताज मोहम्मदनी एका करोडमध्ये किती शून्य असतील हा विचारही कधी केला नव्हता.

या एक करोडच्या रकमेनं ताजना खूप मदत झाली. पैशांअभावी ते आधी त्यांच्या अंध मुलीचं ऑपरेशन करू शकले नव्हते. आता मात्र ते शक्य झालं. इतकंच नव्हे, तर  त्यांच्या आसपासच्या दोन  अनाथ मुलींची लग्नं त्यांनी अगदी पोटच्या मुलीच्या लग्नासारखी चांगली थाटात करून दिली.

आजच्या घडीला ते राजस्थानामधल्या आपल्या खेड्यात आई, बायको आणि मुलीसोबत राहतात. अजूनही ते आपली शिक्षकाची नोकरी करतात आणि आयुष्यात अगदी खुश आहेत. 

7. अचीन निरूला और सार्थक निरूला

भारतीय टीव्हीच्या इतिहासात जिंकली गेलेली सर्वात मोठी रक्कम म्हणजेच ७ करोड ही अचीन आणि सार्थक निरूला या दोन भावांच्या नावावर आहे. 'कौन बनेगा...' जिंकल्यानंतर साहजिकच त्यांना खूप सारी स्थळं सांगून येऊ लागली. पण या दोन भावांनी या पैशांतून आपल्या आईच्या कॅन्सर रोगावर उपचार केले आणि आपला स्वतःचा बिझनेसही चालू केला.

 

सबस्क्राईब करा

* indicates required