चहात मेलामाइन ? जाणून घ्या खरं काय आणि खोटं काय ?

एका सुप्रसिध्द चहाच्या ब्रँडमध्ये मेलामाइन आढळून आल्याची चर्चा सध्या समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात व्हायरल झालेली आहे. हे सत्य आहे की असत्य आहे की व्यावसायिक मत्सरातून इतर चहा उत्पादकांचा बदनामीचा कट आहे हे थोड्या दिवसातच उघडकीस येईल. पण सामान्य माणसांच्या मनात हे मेलामाइन काय प्रकरण आहे याची उत्सुकता आहे. आजच्या आपल्या लेखात जाणून घेऊ या मेलामाइन म्हणजे काय? ते शरीराला घातक आहे का? असे काही यापूर्वी भारतात घडले आहे का? यासंबंधी काही कायदा अस्तित्वात आहे का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे इथे आहेत!
मेलामाइन काय आहे ?
नायट्रोजनचे प्रमाण अधिक असणारे हे एक सेंद्रिय रसायन आहे. आपल्या घरात असलेली मेलामाइनची भांडी याच पदार्थापासून म्हणजे मेलामाइन फॉर्माल्डीहाइड पासून बनवलेली असतात.
दूधात मेलामाइन का मिसळले जाते?
दूधात पाणी मिसळले तर प्रत्येक लिटरमागे प्रथिनाची मात्रा कमी होते आणि दूध भेसळयुक्त आहे हे उघडकीस येते. प्रथिने मोजण्यासाठी दूधात नायट्रोजन किती आहे ते तपासले जाते. यासाठी अॅनालीटीकल केमेस्ट्रीची ' जेडाल्स मेथड' वापरली जाते. मेलामाइन दूधात सहज मिसळते. जेडाल्स मेथड फक्त नायट्रोजन मोजत असल्याने मेलामाइनमुळे नायटोजनचे प्रमाण वाढवले गेले आहे हे उघडकीस येत नाही. त्याच कारणाने भेसळ करणारे मेलामाइन वापरतात.
मेलामाइन हे विष आहे का ?
मेलामाइन मानवी शरीरासाठी विष आहे का ? किंवा किती प्रमाणात सेवन केले तर ते विष ठरू शकते याबद्दल काही सांख्यीकी प्रमाण उपलब्ध नाही. उंदरांवर केलेल्या काही प्रयोगात ते विषारी आहे याचे पुरावे आहेत. जनावरांना देण्यात येणार्या अन्नात मेलामाइनचे प्रमाण जास्त असेल तर मुतखडे, मूत्राशयाला सूज येणे असे परीणाम आढळतात. मानवी शरीरावर काय परीणाम होतो याचा अभ्यास अ़जूनही झालेला नाही.
FSSAI चे प्रमाणीकरण काय आहे ?
भारतात एखादा खाद्यपदार्थ खाण्यास योग्य किंवा अयोग्य आहे हे Food Safety and Standards Authority of India ही संस्था ठरवते. त्यांच्या मानांकनाप्रमाणे बाळांना देण्यात येणार्या तयार अन्नात (बेबी फूड) मध्ये १ मिलीग्राम तर इतर अन्नामध्ये २.५ मिलीग्राम मेलामाइन असले तरी ते आक्षेप घेण्यासारखे नाही.
भारतात दूधामध्ये मेलामाइन मिसळल्याचे आढळते का ?
आपल्या देशात दूधात पाणी मिसळणे हाच भेसळीचा सर्वमान्य शिरस्ता आहे त्यामुळे मेलामाइन भेसळीचे अजूनतरी उघडकीस आलेले नाही. डिटर्जंट पावडर, युरीया यांची भेसळ बर्याच वेळा झालेली दिसून येते. मेलामाइनची किंमत रुपये १२५ प्रती किलो असल्यामुळे ही भेसळ होत नाही.
म्हणजे मेलामाइनची भेसळ असली तरी जीवाला धोका नाही असे समजायचे का ?
नाही असे बिलकुल नाही. सांख्यिकी पुरावा नाही याचा मेलामाइन निर्धोक आहे असा अर्थ होत नाही. २००८ साली चीनमध्ये दूधाची भु़कटीमध्ये इतक्या मोठ्या भेसळ केली गेली होती की त्यामुळे सहा बालकांचा मृत्यू झाला होता आणि ५०००० हून अधिक बालकांवर वैद्यकीय इलाज केले गेले होते. या प्रकरणात दोषी आढळलेल्या सनलू कंपनीच्या दोन अधिकार्यांना २००९ साली फाशी देण्यात आली.
तर वाचकहो, ही झाली प्रश्न उत्तरे पण आपल्या अन्नाबद्दल सतर्क राहणे ही आता काळाची गरज झाली आहे असे तुम्हाला वाटत नाही का ?
आणखी वाचा :
जगातली सर्वात मोठी डेअरी - आरे डेअरीच्या स्थापनेमागची कथा, कुरघोड्या आणि राजकारण!!