आता व्हाट्सॲपवरून पण पैशांचा व्यवहार करता येणार....पण त्यापूर्वी ही बातमी वाचायलाच हवी !!
व्हाट्सॲपवर फोटो, विडिओ, डॉक्युमेंट्स, लिंक्स सगळं सगळं पाठवता येतं. या कारणानं इतर मेसेंजर ॲप्स मागे पडून व्हाट्ससप लोकांमध्ये अतिप्रिय आहे. आजवर या माध्यमातून आख्खा माणूस आणि पैसे वगळता बरंच काही पाठवता येत होतं. आता मात्र व्हाट्सॲप वापरून तुम्हा-आम्हांला पैसेही पाठवता येणार आहेत.
भारतात ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू करायची असेल तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची(NPCI) रितसर परवानगी घ्यावी लागते. व्हाट्सॲपला अशी परवानगी मिळाली आहे. व्हाट्सॲपदेखील आता यूपीआय आधारित पेमेंट सुविधा देऊ शकणार आहे.
गुगल पे, फोन पे सारख्या कंपन्यांचे मात्र यामुळे धाबे दणाणेल हे निश्चित. व्हाट्सॲपचे भारतात आजच्या घडीला ४०कोटी ऍक्टिव्ह युझर्स आहेत. सुरुवातीला २ कोटी युझर्सना पेमेंट सुविधेचा लाभ घेता येईल.
भारतात "व्हाट्सॲप पे" चे बीटा व्हर्जन २०१८पासून सुरू आहे. पण त्याचे फक्त १० लाख युझर्स आहेत. १ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण भारतात ही सेवा सुरू होऊ शकणार आहे. NPCIने यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहारावर एकूण व्यवहाराच्या 30 टक्क्यांचा नियम लावला आहे. म्हणजे देशभरात जेवढ्या रकमेचे व्यवहार होतील, त्यापैकी फक्त ३० टक्के एखाद्या कंपनीद्वारे होऊ शकतील. या क्षेत्रातली मक्तेदारी टाळण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
हे सर्व नियम वगैरे सगळं ठीक आहे. पण हळूहळू करत व्हाट्सॲप पे देशात सुरू होण्याचा मार्ग भारतात सुकर होऊ पाहत आहे हे ही नसे थोडके.




