computer

जेव्हा वाघीण एका वाघासाठी स्वतःच प्राणीसंग्रहालयात येते!

"प्रेम" ही सर्वस्व देणारी आणि सर्वस्व हिरावूनही घेणारी भावना! माणसं प्रेमासाठी वाट्टेल त्या थराला गेल्याची बरीच उदाहरणं आपण आजूबाजूला बघत असतो. परंतु एखादी वाघीण एका वाघाच्या प्रेमात आंधळी झाल्याचं ऐकलं आहे का? ओरिसात एका वाघीण वाघाच्या प्रेमात आंधळी होऊन जंगलातल्या अमर्याद स्वातंत्र्याचा त्याग करून स्वतःहून तो वाघ राहत असलेल्या प्राणीसंग्रहालयात दाखल झाली होती!

29 जुलै हा जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. लोकांमध्ये वाघांच्या संवर्धनात जागरूकता निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. २०१०च्या सेंट पीट्सबर्गमध्ये झालेल्या "टायगर समिट"मध्ये याची घोषणा झाली होती. यावर्षी म्हणजेच २०२० च्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वाघांच्या बाबतीत चांगली बातमी शेअर केली! त्यांनी म्हंटलंय की भारतामध्ये आता जगातल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघांचा अधिवास आहे! विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली होती, परंतु आज प्रयत्नपूर्वक संवर्धनाने त्यांची संख्या वाढवण्यात आपल्याला यश आलं आहे. भारतात हे चार वर्षांचं उद्दिष्ट अगदी कमी कालावधीत झाल्याची बातमी आम्ही यापूर्वी तुम्हांला सांगितलीच होती.

२०२० च्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमीत्त अनेकांनी वाघाचे अतिशय देखणे आणि आकर्षक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. भारतीय वनसेवेतील अधिकारी संदीप त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या स्टोरीने मात्र सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं!

श्रीयुत त्रिपाठी यांनी कनान नावाच्या जंगली वाघिणीची एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली. १९६७ साली ही वाघीण जंगलातला आपला अधिवास सोडून चक्क एका प्राणीसंग्रहालयात राहायला आली होती! प्राणीसंग्रहालयात तिचं येण्याचं कारण होत तिथे राहत असलेला एक वाघ! पाच दशकांपूर्वी प्रदीप नावाच्या एका वाघासाठी तिने आपल्या जंगलाचा त्याग केला आणि ती प्राणीसंग्रहालयात उडी मारून राहायला आली!

श्रीयुत त्रिपाठी लिहितात,"यादिवशी आपण कनानच्या अद्वितीय प्रेमाचं स्मरण करूया, जिने प्रदीप नावाच्या वाघासाठी जंगलातल्या स्वातंत्र्याचा त्याग करून प्राणीसंग्रहालयात उडी घेतली!"

दुर्दैवाने प्रदीपने तिला स्वीकारलं नाही कारण त्याच्याकडे आधीच एक जोडीदारीण होती! आयएफएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकदा निवड केल्यानंतर वाघीण इतर दुसऱ्या कुठल्याही वाघाला नंतर आयुष्यभर निवडत नाही. त्या साग्रहालयातला कनान चौक तिच्या प्रेमकहाणीच्या चिरंतन आठवणींना उजाळा देतो!

श्रीयुत संदीप त्रिपाठी यांनी कनान चौकातला एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत त्या चौकातला एक बोर्ड पर्यटकांना कनानची स्टोरी सांगताना दिसत आहे. "४ जानेवारी १९६७ रोजी चांडका जंगलातील कनान नावाची वाघीण एका वाघाकडे आकृष्ट झाली आणि जंगलातल्या स्वातंत्र्याचा त्याग करत ती प्राणिसंग्रालयात राहायला आली!"

आश्चर्य म्हणजे या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली! २०१३ मध्ये याच प्राणिसंग्रालयात एक वाघ अचानकपणे राहायला आला!!

 

लेखक : सौरभ पारगुंडे

सबस्क्राईब करा

* indicates required