२६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या संविधान दिनाचा इतिहास !!

मंडळी, २६ नोव्हेंबर ही तारीख आपल्याला आठवते ती मुंबई वरील हल्ल्याची तारीख म्हणून. पण भारताच्या इतिहासात या दिवसाचं आणखी एका गोष्टीमुळे महत्व आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी रोजी संविधान अंमलात आले मग २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस का साजरा केला जातो? प्रश्न पडला ना ? चला जाणून घेऊया संविधान दिनाचा इतिहास.
मंडळी, ९ डिसेंबर, १९४६ पासून संविधान लिहिण्याचं काम सुरु झालं. सुरुवातीला संविधान समितीचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा मग पुढे ११ डिसेंबर, १९४६ साली डॉ. राजेंद्रप्रसाद समितीचे अध्यक्ष झाले. या समितीत १९ उपसमित्या होत्या तर २९९ (९ महिला) सदस्य होते. त्यातील महत्वाच्या अशा मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
अशारीतीने भारताचं संविधान लिहिण्यास सुरुवात झाली. २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवसांनी भारतीय संविधानाची बांधणी पूर्ण झाली. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान समितीने स्वीकारला. त्यानंतर संविधान डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
मंडळी, तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असणार की २६ नोव्हेंबर ही तारीख संविधान दिन म्हणून का निवडण्यात आली. पण २०१५ पर्यंत हा ‘दिवस राष्ट्रीय कायदा दिन’ म्हणून साजरा केला जात होता. २०१५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने या दिवसाला अधिकृतरीत्या ‘संविधान दिन’ म्हणून घोषित करण्यात आले.
मंडळी, तुम्हाला एक प्रश्न पडला का ? जर २६ नोव्हेंबर, १९४९ साली संविधान लिहून पूर्ण झाले होते, तर मग २६ जानेवरी, १९५० पासून संविधान अमलात का आले? संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन वेगवेगळे का? मंडळी जास्त विचार करू नका आमच्या खालील लेखात या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आहे. वाचायला विसरू नका !!!
प्रजासत्ताक दिन म्हणून '२६ जानेवारी, १९५०' या तारखेची निवड का झाली ? माहित आहे का ?