computer

निळ्या रंगाचा लोगो असलेलं मॅक्डॉनल्ड्सचं जगातलं एकमेव आउटलेट!!

फास्ट फूड म्हटले की सर्वात आधी आठवण होते ती मॅक्डॉनल्ड्सची आणि मॅक्डॉनल्ड्सचे नाव काढल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो मॅक्डॉनल्ड्स बाहेरील एमचा सोनेरी रंगाचा भला मोठा लोगो. मॅक्डॉनल्ड्सचे जाळे बहुतांश जगभर पसरले आहे आणि मॅक्डॉनल्ड्सच्या प्रत्येक आउटलेट बाहेर त्यांचा सोनेरी रंगाचाच लोगो लावलेला असतो. पण यालाही एक अपवाद आहे ते ॲरिझोनाचं सिडोना गाव. या गावातील मॅक्डॉनल्ड्सला जर तुम्ही भेट दि,ली तर त्याच्या बाहेर तुम्हाला तो मॅक्डॉनल्ड्सचा नेहमीचा सोनेरी रंगाचा लोगो दिसणार नाही. सिडोना मधील या मॅक्डॉनल्ड्सबाहेरचा लोगोचा रंग आहे आकाशी, फिकट निळा! 

पहिल्यांदा कुणालाही हा आकाशी रंगाचा मॅक्डॉनल्ड्सचा लोगो पाहिल्यावर थोडं आश्चर्य नक्कीच वाटतं, पण नंतर या अशा वेगळ्या लोगोची ही लोकांना गंमत वाटते. उलट मॅक्डॉनल्ड्सचा हा वेगळ्या रंगातील लोगो इथल्या पर्यटकांना जास्तच आकर्षक वाटतो. इथे येणारे पर्यटक अगदी आनंदाने या लोगो सोबत फोटो काढतात, पण प्रश्न हा आहे की सगळीकडे मॅक्डॉनल्ड्सचा लोगो हा सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचा असताना फक्त सिडोनामध्येच हा अपवाद का? तेच तर आम्ही या लेखातून सांगणार आहोत. 

सिडोना हे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील एक निसर्ग संपन्न शहर आहे. इथल्या पर्यावरणाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात. डोंगर, झरे, नदी, लाल खडक अशा निसर्गाच्या प्रत्येक रुपाची इथे मुक्त उधळण पाहायला मिळते. निसर्गाशी मिळतेजुळते घेण्याची परंपरा या शहराने आवर्जून जपली आहे. या शहरातील एकाही इमारतीचा रंग भडक किंवा निसर्गाच्या नैसर्गिक रंगावर मात करणारा नाही. या शहरात ज्या काही इमारती उभ्या राहतील त्या या नैसर्गिक रंगाशी जुळणाऱ्याच असाव्यात असा इथला एक नियमच आहे, असं म्हणा हवं तर. जास्त भडक रंग या शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात, असा इथल्या अधिकाऱ्यांचा समज आहे. मुळचा मॅक्डॉनल्ड्सचा सोनेरी रंग इथल्या लाल खडकांना आणि हिरावळीशी जुळणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच या शहराच्या महापौर आणि अधिकाऱ्यांनी मॅक्डॉनल्ड्सला देखील शहराचा हा नियम पाळण्याची सक्ती केली आणि मॅक्डॉनल्ड्सचा इथला लोगो आकाशी म्हणजे निसर्गाशी साधर्म्य असणाऱ्या रांगात रंगवण्यात आला आहे. 

सिडोना मधील मॅक्डॉनल्ड्सची ही ब्रँच १९९३ साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून या मॅक्डॉनल्ड्सचा लोगो याच रंगाचा आहे. पारंपारिक सोनेरी लोगो नसल्याचा तसा या मॅक्डॉनल्ड्सला खूप काही फरक पडलेला नाही. उलट यामुळे या मॅक्डॉनल्ड्सविषयी जास्तच उत्सुकता जागी होते. तसेही लोगोचा रंग बदलेला असला तरी मॅक्डॉनल्ड्सच्या चवीत मात्र काहीही फरक पडलेला नाही. मॅक्डॉनल्ड्सच्या बर्गरची चव इतरत्र जशी लागते तशीच ती इथेही आहे. या रंगाचा त्यांच्या सेवेवर आणि त्याच्या दर्जावर काहीच परिणाम झालेला नाही. 

उलट हा थोडा वेगळा लोगोही अनेकांना आवडत आहे. अनेक जण तर हा वेगळा लोगो पाहण्यासाठीच या मॅक्डॉनल्ड्सला भेट देत आहेत. काहीजण मुद्दाम या लोगोचे फोटो व्हायरल करत आहेत. टिकटॉक युझर्सनी तर हा लोगो बॅकग्राउंडला ठेवून व्हिडीओ देखील शूट केले आहेत. सिडोना शहराच्या सौंदर्यात या लोगोने चार चांद जोडले आहेत म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

शेवटी पर्यटक आणि खवय्ये तर चवीचं खाण्यासाठी येतात त्यांना लोगोच्या कलरशी काय देणंघेणं असणार आहे!

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required