रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घातलं म्हणून बसला ३.३३ लाख रुपयांचा दंड !!

मंडळी, लेखाचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असणार. रस्त्यावरच्या कुत्र्यांना खायला घातलं म्हणून लाखोंचा दंड कसा बसू शकतो ? ही विचित्र घटना खरंच घडली आहे. चला तर सविस्तर माहिती घेऊया.

कांदिवलीच्या ‘निसर्ग हेवन को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटी’ मध्ये एक नियम आहे. सोसायटीचा जो कोणी रहिवासी सोसायटीच्या आत रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालेल त्याला २,५०० रुपयांचा दंड बसेल. जर हा दंड नाही भरला तर त्या रकमेवर २१ टक्क्यांनी व्याज भरावा लागेल.
मंडळी, याच नियमामुळे सोसायटीतल्या दोघांना याचा भुर्दंड भरावा लागला आहे. नेहा दातानी यांनी सोसायटीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खाऊ घातलं होतं. या महिन्यात जेव्हा त्यांच्याकडे मेंटेनन्स बिल आलं तेव्हा त्यात ७५,००० रुपये दरमहा या हुशोबना मेंटेनन्स सोबत ३.६० लाखा भरायचे होते.
नेहा दातानी यांनी सांगितलं की सोसायटीने हा नियम जुलै २०१८ पासून लागू केला आहे. नोव्हेंबर मध्ये त्यांनी प्राणी हक्क संघटनेला बोलावून हा नियम बंद पाडला होता, पण थोड्याच दिवसांनी नियम पुन्हा एकदा लागू करण्यात आला.
केतन शाह या सोसायटीच्या आणखी एका सदस्यावर आधी ७,५०० रुपये मग ७५,००० रुपये दरमहा दंड भरण्याची वेळ आली होती.
सोसायटीच्या ९८ टक्के सदस्यांनी दंड भरण्याच्या बाजूने मत दिलं आहे. सोसायटीच्या चेअरमन यांनी म्हटलंय की बहुमत बघता हे नियम पाळणं बंधनकारक ठरतं.
भटक्या कुत्र्यांवर एवढा राग का ?
कुत्र्यांनी यांचं काय वाकडं केलंय असं तुम्हाला नक्कीच वाटलं असणार. त्याचंही उत्तर घ्या. सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे भटके कुत्रे सोसायटीच्या लोकांवर भुंकतात, लहान-थोरांना त्यांचा त्रास होतो. याखेरीज स्वच्छतेचा पण प्रश्न आहेच. सोसायटीच्या सदस्यांकडून आलेल्या तक्रारींनंतर हा नियम करण्यात आला.
तर मंडळी, सोसायटीचा हा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतो का ? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये द्या !!