computer

वर्दीतल्या दुर्गा: खुद्द दाऊदच्या बहिणीवर जरब बसवणाऱ्या आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर!!

भारताच्या इतिहासात शूर महिलांविषयी अनेक कथा आहेत. महिलांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी समाजाचे नियम बदलले. महिलांनी कायदा आणि सुव्यवस्था क्षेत्रात जेव्हा उडी घेतली तिथेही पुरुषांच्या बरोबरीने कामगिरी करत मोठ्या पदापर्यंत झेप घेतली. पोलीस म्हणजे फक्त पुरुष अशी ओळख काही स्त्रियांनी त्यांच्या कामगिरीने बदलून टाकली आहे. अनेक महिला पोलीस आज पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्या निर्भीड होऊन भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवत आहेत. भारतात आयपीएस अधिकारी पदावर काम करणाऱ्या अनेक महिला अधिकारी आहेत.

अधिकरी पद म्हणजे खुर्चीवर बसणे आणि इतरांना ऑर्डर देणे एवढेच नाही. तर कठीण प्रसंगी कठोर निर्णय घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखणे हेही खूप आव्हानात्मक काम आहे. लाखो तरुण दरवर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात, पण फार थोडजण यात यशस्वी होऊन या पदावर पोहोचतात. आयपीएस पदावर पोहोचायला यूपीएससी बरोबरच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आजपासून आपण या लेखमालिकेत भारतातील काही धाडसी महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी ओळख करून घेऊयात. या अधिकाऱ्यांची कामगिरी वाचून तुम्हालाही त्यांना एक कडक सॅल्युट मारावासा वाटेल.

 

डॉ. मीरा चड्ढा बोरवणकर

IPS अधिकारी मीरा बोरवणकर या लेडी सुपरकॉप नावाने प्रसिद्ध होत्या. त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. अत्यंत धाडसी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी पोलिसदलात अनेक महत्त्वाच्या योजना यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. यांच्या कामगिरीविषयी लिहायचे तर एक मोठे पुस्तक होईल. पण थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊयात.

मीरा या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिल्का असल्याने बोरवणकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले. त्यांनी १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना शिक्षणाची खूप आवड होती, म्हणून २००९ साली काम करत असतानाच पुणे विद्यापीठातून Organizational Management या विषयात डॉक्टरेट पूर्ण केली. खरंतर त्यांच्या वडिलांना मीरा यांनी पोलीस दलात येऊ नये असे वाटत होते. पण मीरा यांचा पोलीस दलात काम करायचेच हा निर्णय ठाम होता. IPS बनल्यानंतर त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली ज्यात मुंबईतील त्यांचे काम विशेष होते.

मुंबईत तेव्हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीची दहशत होती. पण मीरा बोरवणकर यांनी सूत्रे हातात घेतली तेव्हा त्यांनी तेथील माफियाराज संपवण्याच्या कामात मोठा वाटा उचलला. मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तसेच छोटा राजन टोळीच्या अनेक सदस्यांना त्यांनी पकडून तुरुंगात पाठवले. त्यांना अनेक धमक्या आल्या, पण त्यांनी माघार घेतली नाही. दाऊदची बहिण हसीना पारकर मीरा यांना खूप घाबरत असे. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेकडे एक बातमी आली होती की दाऊदची बहीण हसीना भावाच्या नावावर वसुली करत आहे. एक दिवस अशी तक्रार घेऊन एक महिला आली. पण एफआयआर लिहीत असताना तक्रार करणारी महिला अचानक गायब झाली. मीरांनी त्या महिलेचा खूप तपास केला. दाऊदच्या बहिणीला ही बातमी मिळाली. त्यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा यांची भीती वाटायला लागली. नंतर एक रेकॉर्डिंग मीरांपर्यंत पोहोचले. त्यात हसीनाचा आवाज होता, ती म्हणत होती, "या मीरा बोरवणकरची लवकरात लवकर बदली करा". मुंबईत अंडरवर्ल्डवरील कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली.

मुंबई जेलमध्ये पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला फासावर लटकावले त्यावेळी मीरा बोरवणकर महाराष्ट्र राज्याच्या एडीजीपी (जेल)-ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर होत्या. परदेशी पळून गेलेल्या मोस्ट वॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह इतरही काही गुन्हेगाराचे भारताकडे प्रत्यार्पण करवून आणण्यात त्यांचा मोठा हात होता.

मीरा यांचे जळगांवमधील कामही खूप महत्वाचे ठरले. १९९४ साली शाळा-कॉलेजच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे सेक्स रॅकेट उघडकीला आणले. त्यावेळी त्या सेक्स रॅकेटमुळे जळगावात हंगामा झाला होता. सर्वसामान्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. शाळा-कॉलेजमधून मुलींना उचलून या व्यवसायात जबरदस्तीने ढकलले जात होते. मीरा यांनी मोठ्या हुशारीने रॅकेटच्या सूत्रधारांना पकडून तुरुंगात टाकले. या त्यांच्या कामगिरीने त्यांचे खूप कौतुक झाले आणि त्यांना प्रसिद्धी मिळाली.

मीरा यांच्या कर्तव्याचा अजून एक किस्सा आहे. तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी संजय दत्तला थोडाही दिलासा दिला नाही. सेलेब्रिटी आहे म्हणून कोणतीही विशेष सवलत त्याला दिली नाही. त्यांना संजय दत्तला बाहेरून डबा येत असल्याची माहिती मिळाली. मग एक दिवस संजय काय करत आहे हे पाहण्यासाठी त्या अचानक येरवडा तुरुंगात गेल्या. त्यांच्या चालकालाही त्यांनी याबाबत कळू दिले नाही. अचानक त्यांनी येरवडा तुरुंगाकडे मोर्चा वळवला. जिथे संजय दत्त होता तिथे थेट गेल्या. तिथे अनेक पुस्तकं, पटकथा आहेत असे त्यांना दिसले. संजयला त्याबद्दल जाब विचारला. तसेच तुरुंगातीलच जेवण घ्यायचे असा दम भरला. संजय दत्तने ओळख काढण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले, "तुम्ही पंजाबी आहात का? फजिल्काच्या आहात का?" तेव्हा मीरा यांनी त्याला सुनावले, "मी तुरुंग महानिरीक्षक होते तेव्हा माझ्या निगराणीतच अजमल कसाब आणि याकूब मेमनला फाशी दिली, एवढी ओळख पुरेशी आहे"

अशा आहेत आपल्या लेडी सुपरकॉप डॉ. मीरा चड्ढा बोरवणकर. मीरा ऑक्टोबर २०१७ मध्ये निवृत्त झाल्या. सध्या त्या मुंबईत राहतात. त्यांचे पती अभय बोरवणकर हे निवृत्त IAS आहेत. डॉ. मीरा यांच्या कामगिरीला सलाम.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required