हा शब्द जगभरात सारख्याच अर्थाने वापरला जातो, ओळखा पाहू कोणता?

जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक भाषा वेगळी आहे. इंग्रजी भाषा सोडली तर बाकीच्या भाषा आपल्याला समजतीलच असं नाही. (अपवाद फक्त मुंबईकरांचा) राव, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी एक असा शब्द आहे, जो जगभरात सगळेच उच्चारतात. आणि हा शब्द माणूस कोणताही असला तरी त्याला बरोबर समजतो बरं का.

हा शब्द आहे “हं”! (Huh !)

समोरचा जे बोलतोय ते समजत नाही तेव्हा आपण काय करतो? - “हं ?”,

जेव्हा समोरचा जे बोलतोय ते आपल्याला समजत असतं तेव्हा आपल्याकडून प्रतिक्रिया म्हणून काय निघतं? - “हं !!”

आपण जेव्हा गोंधळलेलो असतो तेव्हा सर्वात आधी काय येतं - “हं ?”

कधी कधी तर रागात सुद्धा ‘हं’ निघतो भाऊ. 

राव, आम्हाला माहित आहे, हे तुम्ही स्वतः करून बघत आहात. तेही चेहऱ्यावर एक्स्प्रेशन आणून. असो.

स्रोत

मंडळी, हा शब्द आपण रोजच्या जीवनात वापरतो पण त्याला तितकंसं महत्व देत नाही. (हा लेख वाचण्याआधी तुमच्या हे लक्षात आलं होतं का ?) भाषेवर अभ्यास करताना शास्त्रज्ञाचं लक्ष या शब्दाकडे गेलं. नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी यावर म्हटलंय, “ ‘हं’ शब्द जगभरात समान आहे. भाषा, संस्कृती कोणतीही असली तरी सगळीकडे हा शब्द समान रुपात येतो”

Mark Dingemanse या शास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासात म्हटलंय, “या शब्दाला उच्चारण्याची पद्धत जगभरात सारखीच आहे”. मार्कने ३१ बोलीभाषांवर अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला. खरंतर हा शब्द प्रतिक्रिया म्हणून उच्चारला जातो. त्यामुळे त्याला शब्द म्हणावा का असाही प्रश्न पडू शकतो. शास्त्रज्ञांनी याला शब्द असंच म्हटलंय, कारण या शब्दाचा जन्म नैसर्गिकरीत्या झालेला नाही.

स्रोत

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार हा शब्द फक्त प्रतिक्रिया म्हणून उच्चारला जात नाही, तर त्याला भाषेचे नियम लागू होतात. तुम्ही जसजसे मोठे होता तसे शब्द शिकत जाता. त्याच ओघात ‘हं’ सुद्धा आत्मसात केला जातो. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणानुसार त्याचा उच्चार तुम्ही शिकता.

तुम्ही गोंधळलेले आहात, तुम्हाला प्रश्न पडलेला आहे, तुम्ही सहमत आहात, इत्यादी प्रसंगात हा शब्द उच्चारला जात असल्याने तो जगभरातला एकमेव असा शब्द आहे जो समान आहे. मंडळी, एकप्रकारे या शब्दाने आपण जगाशी जोडले गेलो आहोत असंच म्हणावं लागेल.

 

आणखी वाचा :

डेडलाईन ही एकेकाळी खरोखरीची 'डेड'लाईन होती ?? जाणून घ्या डेडलाईन शब्दांमगाचा रंजक इतिहास !!

सबस्क्राईब करा

* indicates required