फोटोशूटमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचे मॉडेलिंग करिअर असे चालू झाले आहे!
सोशल मीडियाला कुणी कितीही नावे ठेवली तरी यामुळे सर्वसामान्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, हे मान्य करावे लागेल. सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि रात्रीत फेमस झाले अशा लोकांची मोठी यादी आता तयार झाली आहे. कच्चा बदाम हे गाणे रिल्सच्या माध्यमातून लोकांपुढे आले आणि या गाण्याच्या गायकाला लोकांनी शोधूनही काढले.
केरळ येथील बंदवागन येथील ६० वर्षांच्या मम्मीका यांची कथा पण काहीशी अशीच आहे. वयाच्या ६० वर्षांपर्यंत मजुरी करणारे मम्मीका आज एक मॉडेल म्हणून फेमस झाले आहेत. थ्री पीसमध्ये गॉगल घालून हातात ऍपलचा फोन घेऊन फोटोत दिसणारा हा माणूस मजुरी करतो हे चुकूनही कोणी म्हणणार नाही.
मम्मीका हे आपले रोजंदारीवर काम करणारे सर्वसामान्य मजूर आहेत. कधी स्वतःच्या लुक्सकडे लक्ष द्यावे हा विचारही त्यांच्या मनात आला नाही. रोजचे काम सुरू असताना त्यांच्यावर एकेदिवशी प्रसिद्ध फोटोग्राफर शरीक वायलील यांची नजर पडली. त्यांनी त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला. या फोटोत ते विनायकन या हिरोसारखे दिसत होते. हा फोटो चांगलाच वायरल झाला.
आता शरीक यांनी मम्मीका यांचा मेकओव्हर करायचे ठरवले. शरीक यांच्या वेडिंग सुट कंपनीसाठी त्यांनी त्यांचे फोटो काढायचे ठरवले होते. मेकअप आर्टिस्टकडून त्यांचा मेकअप करवून घेतला. या सर्व तयारीनिशी त्यांचे फोटोशूट झाले, त्यातले मम्मीका तरुणांना लाजवेल इतके चार्मिंग दिसत होते.
मम्मीका यांचे आता इन्स्टाग्रामवर पेजसुद्धा आहे. हे पेज आता हळूहळू चांगलेच फॉलोअर्स जमा करत आहे. मम्मीका यांचे आयुष्य आता १८० अंशात बदलले आहे. इथून पुढे आपल्याला मॉडेलिंगचा एका प्रयत्न करायचा आहे असे ते सांगतात. आपल्याकडे जुने लोक सांगतात की कधी कुणाचे दिवस बदलतील सांगता येत नाहीत. मम्मीका यांचे पण आता असेच दिवस बदलले आहेत.
उदय पाटील




