computer

जगातून नामशेष झालेले १० खाद्यप्रकार!!

जसे विविध प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तसेच असे अनेक खाद्यप्रकारही हळूहळू दुर्मिळ होत चालले आहेत. या खाद्यप्रकारांत अनेक फळे, भाज्या आणि मांसाचे पदार्थ येतात. हे पदार्थ सध्या दिसत नाहीत किंवा जवळपास नामशेष झालेले आहेत. आज आपण फक्त इतिहासात उरलेल्या आणि सध्या उपलब्ध नसलेल्या १० खाद्यपदार्थांची माहिती करून घेऊयात.

१. ॲन्सॉल्ट पेअर

नावावरुनच कळते की हे एक फळ आहे. हे सामान्यपणे मिळणाऱ्या पेअरपेक्षा थोडेसे वेगळे आहे. १८६३ मध्ये फ्रान्समधल्या अँजर्स येथे प्रथम याची लागवड करण्यात आली होती. या फळातला मऊ स्वादिष्ट गर, तसेच याची गोड चव आणि सुगन्ध हा इतर फळापेक्षा याला वेगळा बनवतो. या फळाला सर्वोत्कृष्ट चवदार फळ म्हणून ओळखले जायचे.
१९१७च्या द पियर्स ऑफ न्यूयॉर्क या पुस्तकात हेन्ड्रिकने या फळाचे खूप कौतुक केले आहे. त्याचे वर्णन बटरी या शब्दाने केले आहे. परंतु जशी व्यावसायिक शेतीची वाढ झाली तसे या फळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष झाले. इतर पेअरपेक्षा याला जागा आणि वेळ जास्त लागत होता म्हणून शेतकऱ्यांनी यासाठी वेळ न घालवता इतर फळझाडे लावली आणि अधिक उत्पन्न मिळवले. हळूहळू अनसॉल्ट पेअर बाजारात दिसेनासे झाले आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीस ते गायब झाले.

२. कबूतर (passenger pigeon)

लोक कबुतर खात होते हे वाचल्यावर आश्चर्य वाटेल. पण शतकानुशतके मानवांनी प्रवासी कबुतराची मेजवानी केलेली आहे. अमेरिकेतल्या सेनेकाच्या लोकांसाठी हा अन्नाचा महत्त्वाचा स्रोत होता. ते त्याला जाहगोवा किंवा “मोठी भाकरी” असे म्हणत. या पक्ष्याचे चवदार मांसच याच्या ऱ्हासाचे कारण ठरले. उत्तर अमेरिकेत याची खूप मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली. तसेच त्याकाळच्या अन्नाच्या कमतरतेमुळेही यांना मारण्यात आले. १८०० च्या सुरुवातीच्या काळात त्यांची संख्या ३ अब्ज वरून १९०० पर्यंत कमी झाली. शेवटचे passenger pigeon १९१४ साली अमेरिकेच्या ओहायोमधल्या सिनसिनाटी प्राणीसंग्रहालयात मरण पावले.

३. ऑरोच

१०,००० वर्षांपूर्वी जेव्हा मानवाने शेती नुकतीच सुरू केली होती , त्या सुरुवातीच्या काळात आहारात प्राणी खाल्ले जायचे. तेव्हा प्राण्यांची शिकार व्हायची. ऑरोच म्हणजे गाईसारखी प्रजात होती. या गायी आकाराने बऱ्याचश्या मोठ्या पण आधुनिक गायींपेक्षा दुबळ्या होत्या. ज्युलियस कॅझरच्या म्हणण्यानुसार त्या आकारात हत्तीपेक्षा लहान होत्या. १७ व्या शतकात पोलिश जंगलात शेवटच्या ऑरोचचा मृत्यू झाला. रोगराईमुळे ही प्रजाती कमी होत गेली आणि शेवटी नष्ट झाली. ऑरोचचे मांस अधिक रसदार आणि चवदार होते असे सांगितले जाते.

४. सिल्फियम

सुमारे ४८० ते ४३५च्या दशकात सिल्फियम वनस्पती ही मसाल्यासारखी वापरली जायची. म्हणजे अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी सिल्फियम वनस्पतीच्या देठाचा वापर व्हायचा. प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांमध्ये या वनस्पतीचे औषधी उपयोग होत होते. सिल्फियम वनस्पतीचे देठ भाजीप्रमाणे शिजवून खाल्ले जात असे. तर त्याचा रस काढून, वाळवून वेगवेगळ्या पदार्थांवर मसाला म्हणून किसून टाकला जात असे.
असे म्हणतात ही वनस्पती एक प्रभावी गर्भनिरोधक म्हणून काम करायची. याचे बी हृदयाच्या आकाराचे होते. या वनस्पतीचे औषधी उपयोग पाहून मागणी झपाट्याने वाढत होती. पण तितक्या प्रमाणात याची लागवड करण्यात आली नाही. असे म्हणतात शेवटची एक सिल्फियम वनस्पती रोमन सम्राट नीरोला भेट म्हणून देण्यात आली होती.

५. स्टेलरची समुद्री गाय (STELLER’S SEA COW)

या प्राण्याचे नाव गायीचे असले तरी हा एक समुद्रात आढळणारा समुद्री जीव आहे. १७४१ साली जर्मन निसर्गशास्त्रज्ञ जॉर्ज विल्हेल्म स्टेलर यांनी बेरिंग समुद्रातील कमांडर बेटांभोवती हा प्राणी शोधून काढला. म्हणून याचे नाव स्टेलरच्या नावावरून ठेवण्यात आले. या गायीची लांबी जवळजवळ ३० फूट होती. समुद्री गायीची शिकार करून त्याचे मांस खाल्ले जायचे. हे मांस थोडेसे खारट असे, पण खूप चविष्ट होते. याची कातडी लेदर आणि तेल काढायला वापरले जायची. ते तेल दिवे लावण्यात वापरले जायचे. १७६८ पर्यंत याची शिकार केल्याची उदाहरणे आहेत. नंतर हे नामशेष झाले.

६. मॅमथ

इ. स. २००० च्या आधी वूली मॅमथ मांस हे पूर्वजांच्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक होता. "मॅमथ” या शब्दाचा अर्थ “विशाल” असा होतो. मॅमथ हे बहुधा आफ्रिकन हत्तींच्या आकाराचे असावेत. त्यांचे कान आजच्या हत्तींपेक्षा लहान होते. हे हिमयुगात अस्तित्वात होते आणि थंड वातावरणात राहत होते. थंड वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या अंगावर भरपूर केस होते. मॅमथ शाकाहारी होते. त्यांच्या नामशेष होण्याचे मुख्य कारण होते तंटे आणि बदलते वातावरण. तसेच त्यांची शिकारही खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

७. तालियाफेरो सफरचंद (TALIAFERRO APPLE)

ही एक सफरचंदाची जात आहे. थॉमस जेफरसनने अमेरिकेत मोंटिसेलो येथे तालियाफेरो सफरचंदाची लागवड केली. १८१४ मध्ये आपल्या नातवाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी या फळाचा उल्लेख केला होता. ते म्हणतात की हे फळ लहान आहे, पण याची चव अतिशय उत्कृष्ट आहे. या सफरचंदाचे सायडरच फार चविष्ट होईल. असे मानले जाते की तालियाफेरो सफरचंद मूळ बागेसह हरवले आणि ते परत कोणाला मिळाले नाही. परंतु अजूनही या सफरचंदाची जात सापडेल अशी आशा अनेक जण बाळगून आहेत.

८. ग्रेट ऑक AUK

ग्रेट ऑक ही पक्ष्याची प्रजात आहे. जीवाश्म पुराव्यावरून असे दिसते की निएंडरथल्स म्हणजे सुमारे ४०,००० वर्षांपूर्वीची युरेशियामध्ये राहणाऱ्या जमातीचे लोक १००,००० वर्षांपूर्वी शेकोटीवर या पक्ष्यांना शिजवत होते. हे पक्षी फारसे लांब उडत नसत, त्यामुळे त्यांची शिकार करणे सोपे होते. शिकरीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे १९ व्या शतकाच्या मध्यात ही प्रजाती नष्ट झाली. बिओथुक Beothuk म्हणजे आताच्या कॅनडातील लोक पुडिंग बनवण्यासाठी ऑकची अंडी वापरत.

९. प्राचीन बायसन(गवा)

बायसन अँटिकसला "प्राचीन बायसन" ही म्हटले जाते. हे दहा हजार वर्षांहुन अधिक काळ उत्तर अमेरिकन खंडातील सर्वात मोठे शाकाहारी प्राणी होते. अमेरिकन लोक अन्नासाठी प्राचीन गव्यांवर अवलंबून होते. प्राचीन गव्याचे शिजवलेले मांस हा जेवणातील मुख्य पदार्थ होता. १९व्या शतकात अमेरिकन गवे नामशेष होण्याआधी प्राचीन गवे जवळजवळ १०,००० वर्षांपूर्वी मरण पावले.

१०. जुने कॉर्निश फुलकोबी (OLD CORNISH CAULIFLOWER)

जुनी कॉर्निश फुलकोबी ही चवीसाठी प्रसिद्ध नव्हती. पण तिचा एक फायदेशीर गुणधर्म होता. ही वनस्पती रिंगस्पॉट नावाच्या विनाशकारी वनस्पती विषाणूला प्रतिरोधक म्हणून काम करत होती. रिंगस्पॉट विषाणूमुळे इतर वनस्पतींचे खूप नुकसान व्हायचे म्हणून कॉर्निश फुलकोबीचा उपयोग व्हायचा. परंतु १९४०च्या दशकात युरोपियन भाजी उत्पादकांनी जुन्या कॉर्निश फुलकोबीच्या जागी फ्रेंच जाती आणण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये जुन्या कॉर्निश फुलकोबीची प्रजाती जवळजवळ नष्ट झाली. याचाच वाईट परिणाम असा झाला की रिंगस्पॉटने ब्रिटनच्या काही प्रदेशांमध्ये फुलकोबीची पिके नष्ट केली.

फक्त हे दहा पदार्थच नाही, पण असे नामशेष झालेले इतर अनेक खाद्यपदार्थ असू शकतात. पण या दहा पदार्थांची नावे आजच्या पिढीने ऐकलीदेखील नसतील. बदल हा निसर्गनियम आहे, कोणजाणे आजच्या आपल्या खाद्यपदार्थांपैकी पुढच्या शतकात काय शिल्लक असेल आणि काय नसेल!

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required