computer

जगातल्या १० महागड्या इमारती...किंमत जाणूनच आपले डोळे पांढरे होतील!!

जगात अनेक दैदिप्यमान व भव्यदिव्य कलाकृतींची आणि वास्तूंची उभारणी होत राहाते. त्यामध्ये स्पर्धा तर असतेच पण त्यातली कलाही तितकीच महत्त्वाची असते. काही वस्तू शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास सांगतात तर काही मॉडर्न वास्तुकलेचा नमुना म्हणून नावाजल्या जातात.  मात्र जिथे सामान्य माणसासाठी एक छोटसं घरदेखील स्वप्नवत असतं तिथं अब्जावधी रुपयांच्या इमारती मोठ्या डौलाने जगभर उभारलेल्या आहेत. आज या लेखामध्ये आपण जगातील सर्वात महागड्या अशा इमारतींबद्दल माहिती घेणार आहोत

10) प्रिन्सेस टॉवर, दुबई.

या इमारतीची किंमत १५४ अब्जांहून अधिक आहे. ही इमारत जगातील सर्वात उंच रहिवासी इमारत आहे. तशी ही दुबईमधील सर्वात उंच दुसऱ्या क्रमांकाची इमारत आहे. अर्थातच पहिली इमारत ही "बुर्ज खलिफा" आहे. या इमारतीचे बांधकाम २००६ ला चालू झाले होते. या इमारतीमध्ये ७६३ रेसिडेन्शिअल फ्लॅट्स आहेत आणि या इमारतीमध्ये ९५७ पार्किंग युनिट्स आहेत. तसेच या इमारतीमध्ये एकूण १३ लिफ्ट्स असल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेतलेली आहे.

9) सिटी ऑफ ड्रीम्स, मकाऊ, चीन

 या इमारतीची किंमत सुमारे १७० अब्ज रुपये आहे.   ही इमारत जगात अविस्मरणीय अशा गेमींगच्या अनुभवासाठी प्रसिध्द आहे. या इमारतीमध्ये एकूण ३७ मजले आहेत. या इमारतीमध्ये कॅसिनो म्हणजे जुगार खेळण्याची यंत्रेही आहेत. २००९ मध्ये या इमारतीचे अनावरण करण्यात आले होते. या इमारतीमध्ये अनेक प्रकारचे हॉटेल्स, थिएटर्स, कॅसिनो तसेच शॉपिंग सेंटर्स आहेत.

8) विनीटीयन मकाऊ, मकाऊ चीन

या इमारतीची किंमतही जवळपास १७० अब्ज रुपयांइतकी आहे. ही इमारत ३९मजली आहे. २८ ऑगस्ट २००७ ला ही इमारत सर्वांसाठी खुली करण्यात आली. या इमारतीमध्ये जगातला सर्वात मोठा जुगार व्यवसाय म्हणजेच कॅसिनो चालविण्यात येतो.

7) वींन रिसॉर्ट लास वेगास

या इमारतीची किंमत १९१ अब्ज रुपये आहे.   ही इमारत ४५ मजली आहे आणि जगातले सर्वात मोठे रेस्टॉरंट या इमारतीमध्ये आहे. या इमारतीमध्ये अनेक प्रकारचे सोहळे राजेशाही पद्धतीने साजरे केले जातात.

6) वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क

या इमारतीची किंमत सुमारे २७० अब्ज आहे. या इमारतीमध्ये एकूण १०४ मजले बांधण्यात आलेले आहेत. ही न्यूयॉर्क मधली सर्वात उंच इमारत असल्यामुळे तिला "फ्रीडम टॉवर" असेही म्हटले जाते. 

5) कॉस्मोपॉलिटन ऑफ लास वेगस

या इमारतीची किंमत २७७ अब्ज रुपये आहे. ही इमारत केवळ ५२ मजली आहे. येथे अनेक प्रकारचे जगप्रसिद्ध हॉटेल्स व थिएटर्स चालविले जातात.

4)इमिरेट्स पॅलेस, अबुधाबी

या इमारतीची किंमत जवळपास २७७ अब्ज रुपये आहे.  जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महाग हॉटेल या इमारतीमध्ये आहे. या इमारतीतल्या हॉटेलमध्ये अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जातात. या हॉटेलमध्ये अबुधाबीमधील शासकीय पाहुणे राहतात. या इमारतीमध्ये एकूण ३०२ खोल्या आहेत तसेच अनेक प्रकारचे स्वीट्स ही इथे आहेत.

3) रेसोर्टस वर्ल्ड, सेंटोसा, सिंगापूर

या इमारतीची किंमत ३५० अब्ज एवढी असून या इमारतीमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचे  सर्वात मोठे कॅसिनो चालविले जाते. या इमारतीमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओतर्फे चालविण्यात येणारे थीम पार्क ही चालविले जाते. या थीम पार्कमध्ये जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आकर्षक थीम आहेत.

2) मरिना बे स्टँड सिंगापूर

या इमारतीची किंमत 390 अब्ज रुपये आहे.  या इमारतीमध्ये जगातील सर्वात महागडे हॉटेल वसविण्यात आलेले आहे. या हॉटेलचे अनावरण २३ जून २०१० ला करण्यात आले होते. या इमारतीमध्ये जवळपास ५५ मजले आहेत. या इमारतीमध्ये अनेक प्रकारचे स्विमिंग पूल ही तयार करण्यात आलेले आहेत.

1) अब्राज अल बैत, मक्का सौदी अरेबिया

या इमारतीची किंमत  फक्त 1065 अब्ज रुपये आहे.  १२० मजले असलेली ही इमारत जगातील सर्वात महागडी "स्काय स्क्रॅपर" इमारत म्हणून ओळखली जाते. या इमारतीचे बांधकाम २००४ मध्ये चालू करण्यात आले होते आणि आठ वर्षांनी या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.  ही इमारत जगातील सर्वात मोठे हॉटेल म्हणून ओळखले जाते. या इमारतीमध्ये जगातील सर्वात मोठे आणि उंच घड्याळ बसविण्यात आलेले आहे. या इमारतीमध्ये एक पाच मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तसेच इथे दोन "हेलीपोर्ट" ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

आता भारतीयांना घोटाळ्यांमध्ये असे मोठमोठे आकडे ऐकायची सवय झालीय, पण तुमच्या महितीस्तव सांगतो, एक अब्जामध्ये नऊ शून्य असतात, आणि ती रक्कम बरीच मोठी असते. असो, इतक्या महाग इमारतीत जाऊ तेव्हा जाऊ, आता तिथले फोटो पाहायला काय हरकत आहे??

 

लेखक : रोहित लांडगे.

सबस्क्राईब करा

* indicates required