जगातलं सर्वात श्रीमंत गाव : या गावाबद्दल वाचून सगळ्यांनाच हेवा वाटेल!

मंडळी, गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शेती करणारे लोक, छोटी छोटी घरं, गरिबी, अस्वच्छता आणि सेवासुविधांचा अभाव, असं बरंच काही तरळायला लागतं. पण एक गाव मात्र या सगळ्या परिस्थितीला अपवाद आहे. कारण या श्रीमंत गावात जवळपास प्रत्येकजण करोडपती आहे!!

हॉक्सी नावाचं हे गाव चीनमधल्या जियांग्सू प्रांतात आहे. या गावाच्या प्रवेशद्वारावरच हे गाव जगातील सर्वोत्कृष्ट असल्याचं लिहलंय आणि ते अगदी खरं आहे. या गावात फक्त २००० रहिवासी राहतात, पण इथं मिळणाऱ्या सुविधा मात्र एखाद्या मेट्रो सिटीलाही लाजवणार्‍या आहेत. गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात जवळपास ८५ लाख रूपये आहेत. सर्वांना राहण्यासाठी इथे एकाच प्रकारचे आलिशान आणि आकर्षक फ्लॅट बनवललेले आहेत आणि सोबत तब्बल २८ मिलीयन डॉलर्स खर्चून ७२ मजली भव्य इमारतही बांधलेली आहे. सामूहिक शेती आणि नोकरीच्या जोरावर इथे प्रत्येकजण महिन्याकाठी सरासरी १० लाखांचं उत्पन्न मिळवतो. सर्वात महत्वाचं म्हणजे गावातल्या अधिकृत नागरिकांसाठी शिक्षण, फ्लॅट, हेल्थ केअर, हेलिकॉप्टर टॅक्सी, आलिशान गाड्या, यासारख्या अनेक सुविधा अगदी फुकट दिल्या जातात! या गावात अनेक कंपन्यानी बस्तान बसवलंय आणि तिथं २०,००० हून अधिक प्रवासी कामगार काम करतायत. गावातील प्रत्येक नागरिक शेअरहोल्डरही आहे आणि या मोफत मिळणार्‍या लग्जरी सुविधांच्या बदल्यात ते भरपूर टॅक्सही भरतात.

स्त्रोत 

स्त्रोत

पण हे गाव काही आधीपासूनच इतकं श्रीमंत नाहीये मंडळी. अगदी गरीब असलेल्या या गावाला या उंचीवर नेण्याचा मान जातो वू रेनबाओ या व्यक्तीला. ते लोकल कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी होते. सामूहिक शेती आणि इंडस्ट्रीयल प्लॅनच्या जोरावर त्यांनी गावाला समृध्द केलं. गावातील जवळपास ९०% प्रॉपर्टी आजही त्यांच्याच कुटूंबियांकडे आहे आणि त्यांचा चौथा मुलगा आज या गावचा प्रमुख आहे.

स्त्रोत

पर्यटनासाठी इथं त्यांनी जागतिक दर्जाचं वर्ल्ड पार्कही बनवलंय. एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या गावचे अधिकृत नागरिक झालात तर तुम्हाला घर, नोकरी, गाडी, पैसा सगळं काही दिलं जाईल, पण तुम्हाला हे गाव सोडायचं असेल तर मात्र या सगळ्यावरही पाणी सोडावं लागेल. आहे ना गंमत!!