१०० वर्षांपूर्वी या रोगाने घेतला होता तब्बल २ कोटी भारतीयांचा बळी!!

आजच्या काळात जसं स्वाईन फ्ल्यू धुमाकूळ घालत आहे तसंच आजपासून बरोबर १०० वर्षांपूर्वी अशाच एका रोगाने अनेकांचा बळी घेतला होता. मंडळी, हा रोग स्वाईन फ्ल्यूचाच भाऊ होता असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याचं नाव होतं ‘स्पॅनिश फ्ल्यू’. इन्फ्लुएन्झा ह्या रोगाच्या प्रकारातीलच हे दोन्ही प्रकार आहेत. आजच्या काळात कोणत्याही रोगापासून बचावासाठी आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. पण १९१८ साली आजच्यासारखं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. त्याकाळात ‘स्पॅनिश फ्ल्यू’मुळे जगभरात तब्बल ५ ते १० कोटी लोकांचा जीव गेला होता. एकट्या भारतातच जवळजवळ २ कोटी माणसांचा बळी गेला. या रोगाने जगाची २ ते ५ टक्के लोकसंख्या साफ केली होती.

स्रोत

१९१८ आणि १९१९ या दोन वर्षात तीनदा स्पॅनिश फ्ल्यूने जगाला हादरे दिले. सुरुवातीच्या २ वेळा आलेल्या लाटेने संपत आलेल्या पहिल्या महायुद्धावर मोठा परिणाम केला. या साथीच्या रोगाला विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध बळी पडले. दुर्बल रोगप्रतिकारकशक्ती, सततचं युद्ध, कुपोषण, अपुरी वैद्यकीय सेवा, अस्वच्छता, दळणवळणाची अत्याधुनिक साधनं इत्यादींमुळे जगभरात हा रोग अत्यंत जलद गतीने पसरला.

या फ्ल्यूला स्पॅनिश फ्ल्यू का म्हणतात?

स्रोत

असं म्हणतात की स्पॅनिश फ्ल्यूचा सर्वात पहिला बळी हा अमेरिकेच्या कंसास येथील अल्बर्ट गिट्चेल नावाचा सैनिक होता. मार्च १९१८ साली सैनिकी छावणीत त्याला स्पॅनिश फ्ल्यूचा संसर्ग झाला होता. लवकरच हा रोग अमेरिकापासून ते जर्मनी, फ्रांस, ब्रिटनपर्यंत पसरला. या रोगाचा सगळीकडे धुमाकूळ सुरु असताना सर्वात जास्त चर्चा झाली ती स्पेनमधल्या थैमानाची. स्पेनमध्ये या रोगाने एवढा जम बसवला की स्पेनचा राजा अल्फान्सो ‘तेरावा’ हा सुद्धा त्यातून सुटला नाही. याच कारणाने पुढे या अज्ञात फ्ल्यूला ‘स्पॅनिश फ्ल्यू’ म्हटलं जाऊ लागलं. शिवाय हा रोग जिथे जिथे पसरला, तिथे तिथे त्याला वेगवेगळी नावे मिळत गेली. पण जगभरात हा ‘स्पॅनिश फ्ल्यू’ म्हणूनच गाजला.

स्रोत

‘स्पॅनिश फ्ल्यू’ नाव पडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, जगातले प्रमुख देश युद्धात गुंतलेले असताना एकट्या स्पेननेच फक्त या महामारीचा अगदी तटस्थपणे लेखाजोखा मांडला होता. पुढे असाही समज झाला की स्पेनमधूनच या रोगाची सुरुवात झाली. पण तज्ञांनी याला खोटं ठरवलं. 

भारतात स्पॅनिश फ्ल्यू कसा आला ?

स्रोत

या रोगाची पहिली लाट जूनपर्यंत टिकून राहिली. या कालावधीत फार जीवित हानी झाली नाही. दुसऱ्या लाटेत (ऑगस्ट ते नोव्हेंबर) मात्र जगभरात कोटीच्या कोटी माणसं मारली गेली. दुसऱ्या लाटेतच हा रोग भारतात आला. युद्ध संपलं होतं. सैनिक आपापल्या घरी परतत होते. ब्रिटीशांच्या बाजूने लढणारे सैनिक जेव्हा मायदेशी परतले तेव्हा सोबत त्यांनी ‘स्पॅनिश फ्ल्यू’ आणला होता. उत्तर, पश्चिम, आणि मध्यभारतात माणसं आजारी पडू लागली. दक्षिण आणि पूर्वेकडील भागात याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. पुढे भारतात १९१८ ते १९१९ पर्यंत जवळजवळ २ कोटी माणसे मेली.

स्रोत

‘स्पॅनिश फ्ल्यू’चा परिणाम किती घातक होता की अमेरिकेत सरासरी जीवनमान १० वर्षापर्यंत घसरलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘वूड्रो विल्सन’ यांनासुद्धा स्पॅनिश फ्ल्यूची लागण झाली. १९१९ साली आलेल्या तिसऱ्या लाटेत मात्र ‘स्पॅनिश फ्ल्यू’चा जोर कमी झाला. तज्ञ म्हणतात की ज्याला रोगाची लागण झाली आहे, त्याचा लगेचच जीव गेल्याने हा संसर्गजन्य रोग पुढे जास्त पसरू शकला नाही. 

मंडळी, पहिल्या महायुद्धात स्पॅनिश फ्ल्यूने नि:पक्षपातीपणे शत्रुपक्ष आणि मित्रपक्ष दोघांच्याही कत्तली केल्या. ज्याचा परिणाम असा झाला की पहिलं महायुद्ध लवकर संपलं.

सबस्क्राईब करा

* indicates required