या कारणांमुळे यवतमाळमध्ये झालाय १८ शेतकऱ्यांचा मृत्यू..

एकीकडे मुंबई मध्ये चेंगराचेंगरीत २२ जणांचा बळी जात असताना दुसरीकडे अशाच एका घटनेने अनेकांचा बळी जात होता. मात्र ह्या घटनेकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. हे मृत्युकांड एकाच वेळी घडलं नाही त्यामुळे असेल, किंवा या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत.. असो.

यवतमाळ जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीन पिकांवर किडींचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं आहे. यावर उपाय म्हणून साहजिकच शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. पण याच कीटकनाशकांनी किड्यांच्या जागी या शेतकऱ्यांचाच बळी घेतला आहे. यावर्षी कपाशीच्या पिकाची उंची वाढली आहे.. त्यातच  एकाच वेळी दोन ते तीन औषधांचा एकाचवेळी वापर केल्यानेही कीटकनाशक अत्यंत उग्र स्वरूपाचे झाले होते. अशा विषारी औषधातील घटक श्वसनावाटे फवारणी करणाऱ्याच्या फुप्फुसात जाऊन ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. दुर्दैव म्हणजे एकट्या यवतमाळ मध्ये १८ जणांचा यात मृत्यू झालाय. विषबाधा झालेल्या रुग्णांनी रुग्णालय ओसंडून वाहत आहेत.

( कपाशीवर पडलेला रोग-    स्रोत)
या घटनेला जबाबदार असलेली कारणे :

१. अधिक नफा मिळवण्यासाठी कीटकनाशक विक्रेत्यांनी औषधे जास्त प्रमाणात वापरण्यास शेतकऱ्यांना उकसावले, याचा परिणाम म्हणजे भरमसाठ विषारी औषधांचा वापर झाला. औषधांचा वापर करण्याचे गणित ठरलेले असताना भरमसाठ वापर झालाच कसा हा प्रश्न इथे उद्भवतो.

२. दुसरं कारण म्हणजे शेतकरी आतापर्यंत देशी पंपाच्या साहाय्याने कीटकनाशक फवारणी करायचे. पण आता त्यांना भुरळ पडली चीनी बनावटीच्या फवारणी यंत्राची. या यंत्रामुळे फवारणी दहापटीने जलद होते.  पण आधीच विषारी औषधाचं प्रमाण जास्त झालेलं असताना चीनी फवारणी यंत्राने हे विषारी घटक दहापट जास्त जलद गतीने हवेत मिसळण्यास मदत केली.

३. तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे कीटकनाशकांचा किती प्रमाणात वापर करावा आणि फवारणी यंत्र कसे वापरावे याचे ज्ञान शेतकऱ्यांना कोणीच देले नाही. असे विषारी घटक हाताळताना घ्यावयाची काळजी शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे घेतली गेली नाही आणि पुढचा सारा प्रकार घडला. शेतकरी प्रशिक्षण किती महत्वाचं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आलं.

याशिवाय कापसाच्या बीटी बियाणांवर कीड पडत नाही असा दावा केला जात असताना कीड पडून कीटकनाशक फवारणी करण्याची वेळ आलीच कशी असाही एक प्रश्न पडतो. कारण काहीही असो, यात शेकडो जीव मरणाच्या दारात पोहोचले हे उघड वास्तव आहे.


आधीच अनेक संकटे असताना हे मानवनिर्मित नवे संकट बळीराजाचा बळी घेत आहे. याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required