या लोकांनी वटपौर्णिमेच्या भीतीनं साजरा केला चक्क पिंपळमुंजा !! जाणून घ्या काय आहे हे प्रकरण!

मंडळी, माणसाने किती पत्नीपिडीत असावं ? तर याचं उदाहरण म्हणजे औरंगाबादमधले चक्क पिंपळाला फेऱ्या मारणारे हे त्रस्त पुरुष. पुढच्या सात जन्मी काय, तर सात दिवससुद्धा ही बायको नको म्हणून त्यांनी चक्क पिंपळाला फेऱ्या मारून धागा बांधला राव. हा कार्यक्रम वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पार पडला.
चला तर या आगळ्यावेगळ्या ‘पिंपळ मुंज पौर्णिमा’ बद्दल जाणून घेऊया...
वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांनी वडाला फेऱ्या मारायच्या आणि हाच पती सात जन्मी लाभाव म्हणून प्रार्थना करायचा सण. पण जर पुरुषांना ती पत्नी नको असेल तर त्यांनी काय करावं राव ? सात जन्माची अनलिमिटेड ऑफर त्यांना नाकारायची असेल तर ? याचं उत्तर औरंगाबादच्या या पुरुष मंडळीनी दिलंय भौ.
मंडळी, पिंपळाला फेऱ्या मारणारे हे पुरुष पत्नीपिडीत संघटनेचे कार्यकर्ते आहेत. वटपौर्णिमेच्या एक दिवस अगोदरच त्यांनी यमराजला साद घातली. यावेळी यमराजाला उद्द्येशून फलक देखील लावले होते. फलकावर लिहिलं होतं ‘यमराज, बायकोच्या त्रासापासून मुक्त करा’, ‘यमराज सात जन्म आम्हाला ही बायको नको’, ‘यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त करा’, ‘नवऱ्याला त्रास देणाऱ्या बायकांचा धिक्कार असो’ इत्यादी. शिवाय या पुरुषांनी फेऱ्या मारता मारता खास पत्नीमुक्तीचं गाणं सुद्धा गायलं.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या लोकांनी पिंपळाचंच झाडच का निवडलं? त्याच काय आहे ना, पिंपळाच्या झाडावर मुंजा राहतो म्हणतात. हा मुंजा म्हणजे भुताने तरी आमची प्रार्थना ऐकावी म्हणून त्यांनी पिंपळाभोवती पिंगा घातला. मुंजाला समर्पित या दिवसाला त्यांनी ‘पिंपळ मुंज पौर्णिमा’ असं नाव दिलंय.
मंडळी, या पत्नीपिडीत संघटनेबद्दल जाणून घेण्यासाठी आमचा ‘बायकोचा छळ सोसणार्या त्रस्त नवरोबांनो...तुमच्यासाठीच आहे हा आगळावेगळा आश्रम !!’ हा लेख जरूर वाचा.