बायकोचा छळ सोसणार्‍या त्रस्त नवरोबांनो... तुमच्यासाठीच आहे हा आगळावेगळा आश्रम!!

          घराघरांत परंपरेने चालणारा स्त्रियांचा छळ, त्यातून त्यांच्या संसाराची होणारी नासधूस, त्यांची सहनशीलता, आजपर्यंत हे सगळं आपण पाहात आलोय. पण प्रत्यक्षात यापैकी किती स्त्रियांवर खरोखरच अन्याय होत असतो, हाही एक संशोधनाचा विषय आहे. असं आम्ही का म्हणतोय ते तुम्ही ही बातमी वाचून समजू शकता -  (पुरुषांनो जरा वाचा : बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे)

          औरंगाबादमध्ये गेल्या १९ नोव्हेंबरला एक अनोखा आश्रम सुरू झालाय. त्याचं नाव आहे 'पत्नी पीडीत पुरुष आश्रम'. नावावरुन थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल. या आश्रमाचा उद्देश आहे पत्नीच्या छळापासून पुरूषांना वाचवणे. हा आश्रम भारत फुलारे नावाच्या एका माणसानं चालू केलाय.

"भारतात फक्त स्त्रियांसाठी कायदे बनवले गेले आहेत. त्यांचा गैरफायदा स्त्रियांकडून घेतला जातोय. पुरूषांना घराबाहेर काढलं जातंय, त्यांच्यावर अत्याचार होतोय." असं ते सांगतात. आणि याविरूद्ध पुरूषांना लढता यावं यासाठीच हा आश्रम चालवला जातोय. इथे आलेल्या पीडित पुरूषांना कायद्याच्या मार्गाने लढायला शिकवलं जातं, रोजगारासाठी वेगवेगळी कामे शिकवली जातात. या आश्रमात सद्या ९ पिडीत लोक आहेत आणि ४०० पेक्षा जास्त लोक या आश्रमाला मदत करत आहेत. इतकंच नाही, तर असंच एक पुरुष सांत्वन केंद्र उत्तर कर्नाटकातही चालू झालं आहे.

         विचित्र वाटत असला तरी हा विषय तितकाच गंभीरही आहे. कायद्याचा गैरफायदा घेऊन स्त्रियांकडून पुरूषांचा मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याची प्रकरणं हल्ली दिसून येत आहेत. दुसरीकडे सामाजिक प्रतिष्ठेपोटी पुरूषांकडून या अन्यायाची वाच्यता करण्याचं टाळलं जातं. त्यामुळे आता पत्नीपिडीत पुरूषांच्या अशा संघटना आणि केंद्रे तुमच्या शहरात दिसू लागली तर आश्चर्य वाटायला नको...