पुरुषांनो जरा वाचा : बायकोकडून मार खाण्यातही भारतीय सबसे आगे! 

       भारतातील पुरूषप्रधान संस्कृतीचा टेंभा घराबाहेर वाघ बनून दिमाखात मिरवणाऱ्या, आणि त्याचवेळी घरातल्या सौभाग्यवतीसमोर उंदीर बनणार्‍या समस्त नवरेमंडळीसाठी एक दिलासादायक (आणि थोडीशी लज्जास्पदही) बातमी आहे. मी दिलासादायक इतक्यासाठीच म्हटलं, कारण या बातमीमुळं तुम्हाला जरा हायसं वाटेल की या जगात आपण एकटेच 'तसे' नाही आहोत.


          बातमी अशी आहे की नवर्‍याला मारझोड करण्यात भारतीय महिलांचा जगात तिसरा नंबर लागतो!! बातमी एकतर कटू आहे. पण तेवढीच ती खरीही आहे. कारण हा युनायटेड नेशन्सने केलेला सर्व्हे आहे. हे सर्वेक्षण त्यांनी कौटुंबिक न्यायालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि आकडेवारीच्या आधारावर केलं आहे. आपल्या सोबत बायकोचा मार खाण्यात जगात अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत ती इजिप्शियन आणि ग्रेट ब्रिटनची मर्द मंडळी. 

             आपल्या नवर्‍याला मारण्यासाठी बायका किचनमधलं साहित्य, पिना, चपला, बेल्ट, उशा इ. साहित्य वापरतात हेही त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर आश्चर्याची बाब आहे तर ही आहे की घटस्फोट घेणार्‍या महिलांपैकी ६६% महिला या स्वतःच आपल्या नवर्‍याचा छळ करत असतात! 

             एवढं असूनही इथे सर्वांना फक्त स्त्रियांचा होणारा छळच दिसतो. हो ना? कारण आपली बायको आपला छळ करते असं चारचौघात सांगून कोण बापडा आपलं हसं करून घेणार आहे?