त्याने सामोसे विकण्यासाठी चक्क गुगलची नोकरी सोडली ? कोण आहे हा तरुण ?

मंडळी, सामोसे विकणाऱ्याने गुगलच्या नोकरीचे स्वप्न बघावे यात काही नवल नाही पण गुगल मध्ये नोकरी करणाऱ्याने चक्क सामोसे विकण्यासाठी नोकरी सोडावी हे मात्र काही वेगळंच आहे. आम्ही कोणतीही गम्मत करत नाहीये राव. गुगल मध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने खरंच सामोसे विकण्यासाठी नोकरी सोडली आहे. चला तर त्याला भेटूया.
या तरुणाचं नाव आहे मुनाफ कपाडिया. त्याने एमबीए केलं आहे. एमबीए पूर्ण झाल्यावर तो अमेरिकेला गेला आणि त्याने गुगल मध्ये नोकरी मिळवली. काहीकाळ नोकरी केल्यानंतर गुगलचा भरगच्च पगार सोडून तो भारतात परतला. त्याला या नोकरीपेक्षा वेगळं काही तरी करायचं होतं.
भारतात आल्यानंतर त्याने स्वतःचं हॉटेल सुरु केलं. या हॉटेलचं नाव ठेवलं ‘दी बोहरी किचन’. तसा त्याला हॉटेलचा कोणताही अनुभव नव्हता. अनुभव नसताना त्याने गुगलची नोकरी सोडली हे खरच आश्चर्यकारक आहे.
हॉटेल चालवण्यात त्याने आपल्या आईची मदत घेतली. त्याच्या आईला कुकिंग शोज बघण्याची आवड होती. याच आवडीमुळे त्यांच्या हाताला चांगली चव होती. मुनाफने चक्क आईलाच शेफ म्हणून काम दिलं. याचा त्याला मोठा फायदा झाला. आईकडून टिप्स घेऊन त्याने हॉटेल मध्ये वेगवेगळ्या डिश तयार केल्या. यामध्ये सर्वात प्रसिद्द होता ‘मटन सामोसा’. पाहता पाहता त्याच्या हॉटेलची भारतभर चर्चा होऊ लागली.
आज मुनाफ या हॉटेलच्या माध्यमातून ५० लाखापर्यंतची कमाई करत आहे. त्याचे सामोसे पंचतारांकित हॉटेल्स आणि बॉलीवूडच्या सेलिब्रिटीज मध्ये प्रसिद्ध आहेत.
मंडळी, मुनाफने आपली सर्व हकीकत एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली आहे. त्याने स्वतःच म्हटलंय की मी सामोसे विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली.
आणखी वाचा :
समोश्याच्या पोटात दडलाय इतका मोठा इतिहास...वाचा समोसा भारतात आला तरी कसा !!