कथा राजेरजवाड्यांच्या: ग्वाल्हेरच्या खजिन्यानं टाटा स्टील कशी वाचवली? आणि हे सोनं आलं होतं कुठून??

टाटा उदयोग समूहात टाटा स्टील या कंपनीला अव्वल मानांकन आहे. हे साहजिकच आहे, कारण टाटांच्या उद्योग साम्राज्याच्या पायाभरणीची सुरुवात या कंपनीपासून झाली. टाटा स्टीलबद्धल अधिक माहितीसाठी आमचा "टाटा स्टील आणि स्वदेशी" हा लेख वाचायला विसरू नका.
टाटा स्टीलच्या इतिहासात तीन चमत्कार झाले. यापैकी तिसरा योगायोग एखाद्या चित्रपटात शोभेल असा आहे. आज ती चमत्कारकथा आम्ही खास बोभाटाच्या वाचकांसाठीच आणलीय!!
या कथेचा पहिला भाग साधारण सन १८००च्या दरम्यानच्या ग्वाल्हेरच्या सिंदीयांच्या किल्ल्यातल्या खजिन्यापासून सुरू होतो. तशा या खजिन्याबद्दल अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळतील. पण आधी आपण मुद्द्याच्या उपकथानकात जाऊ या !
सिंदीयांचे साम्राज्य म्हणजे माळवा प्रांत. तिथं "पग पग रोटी ,डग डग नीर" म्हणजेच, "पाऊल टाकू तिथे अन्न, खोदू तिथे पाणी" असं म्हटलं जातं असा या प्रांताचा महिमा आहे. त्याकाळी दसरा पार पडला की सिंदिया मुलूखगिरीसाठी ग्वाल्हेरच्या बाहेर पडायचे. मुलूखगिरी म्हणजे वसुली आणि राज्याच्या सीमा वाढवत राहणे. या काळात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने चांदी ,जवाहिर जमा व्हायचे. किल्ल्यात परत आल्यावर हा खजिना किल्ल्याच्या भिंती बुरुजात-बळदात कप्प्यात गुप्तपणे दडवला जायचा. या खजिन्याचा ठावठिकाणा फक्त सिंदीयांच्या कुटुंब प्रमुखालाच ठाऊक असायचा. यासाठी एक बीजक पद्धती ( बायनरी कोड) वापरली जायची. आपल्या मरणाच्या अंतिम क्षणी राजा आपल्या वारसाला ती सांगायचा. १८५७ च्या युद्धात सिंदिया ब्रिटिशांच्या बाजूने होते. त्यामुळे युद्धादरम्यान किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात द्यावा लागला. ब्रिटीशांना खजिन्याची माहिती नव्हती. पण किल्ला मात्र त्यांच्या ताब्यात होता. सरतेशेवटी १८८९ च्या दरम्यान किल्ला पुन्हा सिंदीयांच्या हाती परत आला. खजिना सुरक्षित होता. पण, जिवाजीराव सिंदिया एक दिवस अचानक मरण पावले आणि एक मोठी समस्या उभी राहिली. येणाऱ्या वारसाला म्हणजे माधवराव सिंदियाना खजिन्याची बीजक मिळालीच नाहीत.
माधवराव सिंदिया (स्रोत)
यानंतर अनेक वर्षे खजिन्याच्या शोधाची मोहीम सुरू होती. ब्रिटिशांनाही असा काही खजिना अस्तित्वात आहे अशी कुणकुण होतीच. त्यामुळे ते ही हा खजिना मिळवण्याच्या मागे होते. अधूनमधून एखाद्या भिंतीत खजिना मिळायचा. पण संपूर्ण खजिना काही केल्या सापडेना. लॉर्ड मेयो या ब्रिटीश अधिकाऱ्याने बराच प्रयत्न करून आणखी काही खजिना मिळवला. पण तरीही बराच भाग अज्ञातच होता. कर्नल बनर्मन यानेही यासाठी अथक प्रयत्न केले होते.
विसाव्या शतकापर्यंत पूर्ण खजिना अजून हाती लागला नसला तरी बराचसा खजिना मिळवण्यात सिंदियाना यश आलं होतं. काय नव्हतं या खजिन्यात? हिरे, माणिक, मोती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी! लाखो चांदीची नाणी आणि सोबतच सापडलेल्या सोन्याची किंमत त्याकाळी ६.२ कोटी होती.
ग्वाल्हेरचा किल्ला (स्रोत)
या कालखंडात सिंदियाना एक पारशी गृहस्थ भेटले. त्यांचे नाव होते एफ. इ. दिनशॉ. दिनशॉ स्वत: प्रचंड श्रीमंत होते. मालाडमध्ये त्यांची २४०० एकर जमीन होती. दिनशॉ महाराजांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होते. बीजक पद्धतीला कंटाळलेल्या महाराजांना दिनशॉनी एक सल्ला दिला. पण त्याची कथा नंतर कधीतरी बोभाटाच्या वाचकांसाठी देऊ.
फ. इ. दिनशॉ (स्रोत)
तर, १९०५ सालची गोष्ट आहे. साकची नावाच्या गावात टाटा स्टीलची फॅक्टरी सुरू झाली होती. या फॅक्टरीची कथा बोभाटाच्या या लेखात वाचा. १९१४ साल उजाडलं आणि पहिल्या महायुध्ददाची सुरुवात झाली. टाटांच्या पोलादाची मागणी वाढली. उत्पादन वाढलं, पण खेळतं भांडवल कमी पडायला लागलं. पैसे उभे करण्यासाठी टाटांचा दुसरा पब्लिक इश्यू बाजारात आला. पण त्या इश्यूत पैसेच जमा होईनात. युद्ध नुकतंच संपल्यामुळे बाजारात पैशांची चणचण होती. जर इश्यू फेल गेला तर टाटा स्टील बंद होण्याची भीती निर्माण झाली हाती. टाटांनी आपले दागिने, विशेषत: हिऱ्याचे दागिने गहाण ठेवले होते. ही बातमी दिनशॉना कळली आणि त्यांनी सिंदियाना एक सल्ला दिला. ’खजिन्यातले सर्व सोने वितळून विकून टाका आणि आलेल्या पैशातून टाटा कंपनीच्या पब्लिक इश्यूत गुंतवणूक करा."
टाटा स्टीलचा इश्यू एका चेकमध्ये, म्हणजे चार लाख स्टर्लिंग पौंडामध्ये फुल्ल झाला. १९६० साली हे शेअर विक्री करेपर्यंत सिंदिया टाटा स्टीलचे सिंगल लार्जेस्ट शेअर होल्डर होते. सिंदीयांच्या सोन्याने टाटांचे संकट टळले. इथे ही कथा संपते. पण ग्वाल्हेरच्या खजिन्याचा हा शेवट नव्हता. ती कथा बोभाटावर नंतर कधीतरी!!