एका बेघर माणसाला ओरिओ बिस्कीट देणे पडले 'इतके' महागात!! नक्की काय प्रकरण होतं हे?

तुम्ही कधी कोणावर प्रँक केला आहे का? प्रँक म्हणजे सोप्प्या भाषेत खोड्या काढणे. अशा खोड्या काढून व्हिडीओ तयार करण्याचा नवीन ट्रेंड आलाय राव. युट्युबवर फक्त Prank सर्च करून पाहा. भरपूर व्हिडीओ सापडतील.
मंडळी, प्रत्येक मस्करी ही आपल्या एका मर्यादेत राहायला हवी नाही तर मस्करीची कुस्करी होते. या युट्युबरला तर याचा चांगलाच अनुभव आला आहे.

मंडळी, कांगहुआ रेन नावाच्या या युट्युबरने स्पेनच्या बार्सिलोना भागात एका बेघर माणसाला ओरिओ बिस्कीट दिलं होतं. यात खोडी अशी होती की त्याने बिस्कीटच्या मधल्या, क्रीमच्या जागी टूथपेस्ट भरली होती.
मंडळी, हा प्रँक सगळ्या प्रँक्सचा आजोबा आहे. एप्रिल फुल करण्यासाठी ओरिओ प्रँक आजही वापरला जातो. गंमत म्हणजे दरवेळी लोक फसतात पण.
हे सगळं सामान्य नागरिकांच्या बाबतीत ठीक आहे, पण एका गरीब आणि बेघर माणसासोबत जेव्हा अशी मस्करी केली जाते तेव्हा त्याचे परिणाम गंभीर ठरतात.हे
सगळं घडलं २०१७ साली. कांगहुआ रेनने या एका व्हिडीओच्या जोरावर लाखभर पैसे कमावले आणि व्हिडीओ व्हायरल होऊन त्याला प्रसिद्धी पण मिळाली. स्पेन पोलिसांनी मात्र त्याला बेड्या ठोकल्या. नुकतंच तो दोषी आहे हे सिद्ध झाल्यावर त्याला जन्माची अद्दल घडेल अशा शिक्षा झाल्या आहेत.

त्याला १५ महिन्यांची कैद आणि २२,३०० डॉलर्स (१५,४६,००० रुपये) दंड भरण्याची शिक्षा झाली आहे. यापैकी कैदेतून तो सुटू शकतो. कारण स्पेनच्या कायद्याप्रमाणे जर एखादी व्यक्ती पहिल्यांदा कायदा मोडत असेल आणि अहिंसक गुन्ह्यात अडकलेली असेल व त्याचबरोबर २ वर्षापेक्षा कमी वर्षांची शिक्षा झाली असेल तर त्या व्यक्तीची कैद माफ होते.
मंडळी, या दोन शिक्षा सोडल्या तर त्याच्यावर तब्बल ५ वर्षांची सोशल मिडिया बंदी आणण्यात आली आहे. या ५ वर्षात तो सोशल मिडीयावर कोणतंही अकाऊंट वापरू शकणार नाही.
मंडळी, कांगहुआ रेनला जेव्हा आपल्या कृत्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, “लोकांना अशाच गोष्टी आवडतात”.
तर मंडळी, कांगहुआ रेनला झालेली शिक्षा बरोबर वाटते का?? तुमचं मत द्या !!
आणखी वाचा :
ओरिओ डे: आजच्या खास दिवशी जाणून घ्या ओरिओचा खोटानाटा इतिहास नक्की काय आहे..