computer

ओडीसात दुर्मिळ काळा वाघ आढळलाय... या काळ्या रंगाचं रहस्य जाणून घ्या!!

मध्यंतरी गोव्यात काळा चित्ता (Black Panther) दिसल्याची बातमी आली होती. त्याच्या काहीच दिवसांनी कर्नाटकच्या जंगलातील काळ्या चित्याचे अत्यंत सुंदर फोटो व्हायरल झाले होते. काळ्या चित्ता अत्यंत दुर्मिळ असल्याने तो कुठे दिसला की त्याची लगेच बातमी होती. आज आम्ही व्याघ्र प्रजातीतील अशाच एका दुर्मिळ प्राण्याची बातमी घेऊन आलो आहोत. काळ्या रंगाच्या वाघाची....हो, बरोबर वाचलं तुम्ही. काळ्या रंगाचा वाघ. तर कुठे आहेत हे काळ्या रंगाचे वाघ? 

भारतात ओडीसा राज्यात हे दुर्मिळ वाघ पाहायला मिळाले आहेत. ओडीसामधील सिम्लीपाल टायगर रिझर्व्हमध्ये फोटोग्राफर सौमेण बाजापेयी ह्यांना ह्या वाघाचे दर्शन झाले. पक्ष्यांचे फोटो पाहण्यात दंग असताना अचानक झुडुपातून हा वाघ आला. दोन सेकंद थांबला आणि पुन्हा निघून गेला. ह्या २ ते ३ सेकंदात बाजपेयी ह्यांनी काढलेल्या वाघाच्या फोटोंनी लोकांना आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला आहे.

ह्या वाघांमध्ये काळ्या रंगाचे पट्टे एकमेकाच्या अगदी जवळ असतात. ते इतके जवळ असतात की त्यांच्या कातडीला असलेली मूळ केशरी रंगाची छटा दिसून येत नाही.  ह्या वाघांचा आकार साधारण वाघांपेक्षा कमी असतो. ह्याचे कारण म्हणजे, जनुकांमधील दोष. 

काळ्या रंगाचे वाघ ही वाघांची एक पूर्णतः भिन्न जात नाहीये. ह्या वाघांना मेलॅनिस्टिक वाघ असेही म्हणातात. तर मेलॅनिस्टिक म्हणजे काय? मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंग ठरवण्यास कारणीभूत असते. मेलॅनिनचाच एक प्रकार म्हणजे युमेलॅनीन. प्राण्यांमध्ये युमेलॅनीन हे रंगद्रव्य त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेसाठी कारणीभूत ठरते. तर असे का होते? ह्याचे उत्तर आहे इनब्रीडिंग. इनब्रीडिंग म्हणजेच जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती. ह्या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दाट काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या ह्या वाघांची निर्मिती झाली आहे.

अभयारण्यातच साधारणतः हे वाघ आढळून येतात.१९९० साली प्रथम भारतात हा वाघ दिसला होता. वाढती मनुष्य वस्ती आणि जंगलांचा अभाव ह्यामुळे ह्या वाघांची सध्याची संख्या फक्त ७ ते ८ इतकीच आहे.

गोव्यात किंवा कर्नाटकातील काळा चित्ता आणि आता आढळलेला काळा वाघ हे प्राणी आजच्या लुप्त होत जाणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत एक आशेचा किरण घेऊन येत आहेत. ह्या प्राण्यांचं संगोपन आणि वाढ ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

 

लेखिका : स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required